News Flash

कुटुंबकल्ला

दिवंगत आईची जुनी दैनंदिनी आणि पित्याचा तरुणपणातील फोटो यांच्यासोबत हे दोघे ज्या घरात दाखल होतात, तेथे खळबळ माजते.

|| पंकज भोसले

भारतीय लोक फक्त लग्नसोहळ्यात व्यग्र असतात असा अपसमज तयार होणारे चित्रपट दोन हजारोत्तर काळात इथल्या फॉर्म्युलेबाज दिग्दर्शकांसह पाश्चिमात्य चित्रकर्त्यांनीही बऱ्यापैकी तयार केले आहेत. अवाढव्य कुटुंब, लग्न-वरात आणि त्यात फक्त आणि फक्त वाजणाऱ्या पंजाबी संगीताचा मारा यांच्यापलीकडे विविधतेने नटलेल्या चित्र-विचित्र संस्कृतीचा गंधही नसलेल्या या चित्रपटांचा कथाजीव मर्यादित घटकांभोवती फिरताना दिसतो. मीरा नायर यांच्या ‘मॉन्सून वेडिंग’नंतर अशा सिनेमांची लाट कोणताही परिणाम न करता ओसरली. पण परदेशस्थ चित्रकर्त्यांच्या नजरेतून भारतीयांची विवाहरम्य अवस्था पंजाबी बीट्सच्या तालावर दाखविण्याचे चुकले नाही. अन् भारतीय व्यक्ती परदेशात असतील तरी त्यांच्याकडे याच निकषांनी पाहण्याचे थांबले नाही. ब्रिटिश दिग्दर्शक जेसन विनगार्ड याच्या ‘इटन बाय लायन्स’ या चित्रपटात भारतीय वंशाचे कुटुंब असल्याने लग्नसोहळा आहे. मात्र त्याचे प्रमाण अगदीच चवीपुरत्या मिठासारखे असल्याने हा चित्रपट त्या ओळखीच्या पारंपरिक वाटांवरून न जाता विनोद निर्माण करण्यासाठी वेगळी आयुधे शोधण्याचा प्रयत्न करतो. ‘इटन बाय लायन्स’ सुरू होतो तो ब्रिटनमध्ये दोन वयात आलेल्या सावत्र भावांना वाढविणाऱ्या आजीच्या मृत्यूनंतर. या मृत्यूमुळे ओमर (अन्टोनिओ अखिल) आणि पायाने अधू असलेला पीट (जॅक कॅरोल) या दोन्ही भावांना नव्याने अनाथत्व प्राप्त होते. यापूर्वी लहानपणी त्यांच्या आई-वडिलांना आफ्रिकेतील जंगलात विचित्र अपघात झाल्यानंतर सिंहाने मारल्यानंतर या दोघांची जबाबदारी आजीने घेतलेली असते. आजीच्या मृत्यूनंतर एका नातेवाईकाकडून पीटला दत्तक घेण्याचा प्रस्ताव येतो. मात्र सावत्र असूनही एकमेकांशिवाय राहू शकत नसल्यामुळे हा प्रस्ताव बारगळतो. ओमर आपल्या आशियाई वंशाच्या खऱ्याखुऱ्या पित्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो, तेव्हा त्याच्यासोबत ब्लॅकपूल या शहरात जाण्यासाठी ठेवणीतल्या विनोदासह पीटदेखील हजर राहतो.

दिवंगत आईची जुनी दैनंदिनी आणि पित्याचा तरुणपणातील फोटो यांच्यासोबत हे दोघे ज्या घरात दाखल होतात, तेथे खळबळ माजते. कुटुंबात नुकत्याच सुरू होऊ पाहणाऱ्या विवाह सोहळ्याआधी हे आगंतुक पाहुणे घरातला एक भाग ठरविले जातात. आपल्या पित्याबाबत ओमरला नवा शोध लागतो. पण घटना इतक्या विचित्र घडू लागतात की कुटुंबात प्रचंड मोठा कल्ला निर्माण होतो.

इथल्या विनोदाची जातकुळी थोडी भिन्न प्रकारची आहे. दोन्ही सावत्र भावांचा आज्जीच्या घरी एकत्र वाढल्यामुळे नाते जपतानादेखील एकमेकांची खिल्ली उडविण्याचा स्वभाव सुटत नाही. पैकी सहानुभूतीप्रवण अपंग पीट हा भवतालच्या वस्तू लांबवण्याचा शिरस्ता पाळणारा ‘क्लेप्टोमॅनिक’ आणि अफाट विनोदबुद्धी असलेला चुरचुरीत मुलगा आहे. तर आयुष्यभर खऱ्या पित्याचे तोंड न पाहिलेला आणि नातेवाईकांचा गोतावळा न लाभल्याने बुजरा बनलेला युवक आहे. ब्लॅकपूल शहरामधील प्रचंड मोठय़ा शॉपिंग मॉलची मालकी असलेल्या आणि तीन पिढय़ा ब्रिटनमध्येच काढलेल्या पाकिस्तानी मलिक कुटुंबामध्ये शिरकाव झाल्यानंतर तो हरखून जातो. ‘खानदान को बदनाम किया, हमारी इज्जत मिट्टीमे मिला दी’ छापाच्या बुजुर्गाच्या अतिधोपट वाक्यांची येथे छान पेरणी केली आहेच. पण बेफिकिरी आयुष्य जगणाऱ्या ओमरच्या खऱ्याखुऱ्या पित्याच्या तोंडी ‘कुत्ता-कमिना’ या शिवीजोडीचा अर्थ भलताच सभ्य असल्याचा ठाम दावा करण्यात आला आहे. अनेक ब्रिटिश सिनेमांत दिसणाऱ्या भारतीय चेहऱ्यांपैकी नितीन गणात्रा, दर्शन जरीवाला यांच्याकडून मायदेशातील मातीशी नाळ किती घट्ट जुळलेली आहे, त्याचे उग्र प्रदर्शन येथे होते.

चित्रपट अत्यंत साधेपणाने नातेबंध, सांस्कृतिक सम्मीलनाची गोष्ट सांगतो. इथे जरी कुटुंबातील एका लग्नसोहळ्याची तयारी चाललेली असली, तरी यात त्यांचे तपशील जाणीवपूर्वक कमी ठेवण्यात आले आहेत. आयुष्यात कधीही स्थैर्य आणि कुटुंबसुख न लाभलेल्या ओमर आणि पीट यांना एकाएकी लाभलेल्या नात्यांच्या गुंत्यात आपले मैत्रबंधुत्व टिकविण्याची सत्त्वपरीक्षा निर्माण करण्यात आली आहे. अन् त्यातदेखील ही पोरे यशस्वी झाली आहेत.

या सिनेमा पाहण्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे या चित्रपटाचा दिग्दर्शक जेसन विनगार्ड याला ‘ब्रिटिश वेस अ‍ॅण्डरसन’ अशी उपाधी देण्यात आली आहे. साधारण कक्षेत न मावणाऱ्या कथा घेऊन बहुविध व्यक्तिरेखांच्या कलाबाजीने चित्रपट फुलविण्यात अमेरिकी दिग्दर्शक वेस अ‍ॅण्डरसन यांचा जबरदस्त हातखंडा आहे. ‘इटन बाय लायन्स’ची तुलना अ‍ॅण्डरसनच्या चित्रपटीय कौशल्याशी करता येऊ शकेल. अर्थात अ‍ॅण्डरसनचा सिनेमा माहिती असला किंवा नसला तरी इथल्या विनोद आस्वादामध्ये किंचितही फरक पडणार नाही. युवक आणि प्रौढांचे इथले वयसुलभ विनोद आणि शेवटाकडे लागणाऱ्या लग्नसोहळ्यातील पंजाबी बीट्सवर कलाकारांचे चालणारे नृत्य असा आपल्याला ओळखीचा मसाला यात पुरेपूर भरण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 10:45 pm

Web Title: eaten by lions mpg 94
Next Stories
1 Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात परतणार
2 …म्हणून ‘मिशन मंगल’च्या पोस्टरवर अभिनेत्रींपेक्षा अक्षयचा फोटो मोठा: विद्या बालन
3 अनुराग कश्यपला जीवे मारण्याची धमकी
Just Now!
X