भारतीय नाट्यसृष्टीत क्रांतीकारी बदल घडवणारे ज्येष्ठ नाटककार इब्राहिम अलकाझी यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र फैसल अलकाझी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली. त्यांचा जन्म १९२५ मध्ये झाला होता. वयाच्या ९५ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय रंगभूमीची व्याख्या बदलणारे नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक कलाकार त्यांनी घडवले आहेत. १९६२ ते १९७७ या १५ वर्षांच्या कालावधीत ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक होते. १९४० च्या दशकात ते मुंबईत आले आणि अल्पावधीतच एक उत्तम अभिनेते म्हणून परिचित झाले. आज वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

अलकाझी जेव्हा मुंबईत होते तेव्हा त्यांनी भारतीय रंगभूमीची ओळख ही शेक्सपिअर आणि ग्रीक नाट्यकृतींशी घडवली. या कलाकृती भारतीय रंगमंचावर आणल्या. त्यामुळे भारतीय रंगभूमीचा कायापालट होण्यास मदत झाली .ग्रीकच्या शोकांतिका, शेक्सपिअर, हेन्रिक इसबे, ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग या नाटककारांची नाटकं त्यांनी भारतीय रंगभूमीवर आणली. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी एनएसडीतल्या संचालक पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर दिल्लीत जाऊन त्यांनी आर्ट हेरिटेज सुरु केलं. आर्ट हेरिटेजमध्ये त्यांनी त्यांच्या कलाकृती, फोटो आणि पुस्तकं ठेवली होती. अलकाझी यांचे वडील सौदी अरेबियातले तर आई कुवेतमधली होती. अलकाझी यांना नऊ भावंडे होती. त्यांचं बालपण पुण्यात गेलं. फाळणीनंतर अलकाझी यांचं कुटुंब पाकिस्तानात गेलं. मात्र अलकाझी यांनी इथेच राहण्याचा निर्णय घेतला. सुलतान बॉबी पदमसी यांचा नाटक ग्रुप त्यांनी जॉईन केला होता.

उत्कृष्ट संगीत, प्रकाश योजना, नेपथ्य यांची त्यांना उत्तम जाण होती. उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक तर ते होतेच. लंडनच्या रॉयल अॅकेडमी ऑफ आर्ट्समधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. विविध प्रतिभा त्यांच्या अंगी होत्या. ते उत्तम चित्रकार होते, उत्तम फोटोग्राफर होते. अंधायुग सारखं नाटक रंगमंचावर आणून त्यांनी नाट्यसृष्टीची परिभाषाच बदलली. प्रत्येक कलाकाराने समोर बसलेल्या प्रेक्षकाचा आदर केला पाहिजे आणि उत्तम अभिनय करायचा असेल तर शिस्त पाळली पाहिजे या मताचे ते होते.