अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी बिहार पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्याच्या आधारावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मनीलॉण्डरिंगचा गुन्हा नोंदविला आहे. बिहार पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यामध्ये सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिहा चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांवर सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.

ईडीने बिहार पोलिसांच्या एफआयआरचा अभ्यास करून पीएमएलए कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेतला. बिहार पोलिसांच्या एफआयआरमध्ये चक्रवर्ती, तिचे कुटुंबीय आणि अन्य सहा जणांची नावे असून त्यांच्याविरुद्ध ईडीने गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी चक्रवर्ती आणि अन्य काही जणांना लवकरच चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता आहे.

सिंह कुटुंबाकडून दडपण?

वांद्रे येथील निवासस्थानी सुशांतसोबत राहणाऱ्या सिद्धार्थ पिठानी याने रियाविरोधात बिहार पोलिसांना जबाब देण्यासाठी सिंह कुटुंबाकडून दडपण आणण्यात आल्याची तक्रार वांद्रे पोलिसांत केली आहे. २२ जुलैला सुशांतची बहिणी मितू सिंह, नातेवाईक ओपी सिंग आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून रिया, तिच्या खर्चाबाबत अनेक प्रश्न विचारले. यापैकी ओपी सिंग यांनी २७ जुलैला पुन्हा संपर्क साधून रियाविरोधात बिहार पोलिसांना जबाब देण्याबाबत दडपण आणले, अशी तक्रार सिद्धार्थने ईमेलद्वारे वांद्रे पोलिसांकडे केली आहे.

‘सत्याचा विजय होईल’

ईडीने रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर रियाने चित्रफितीद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. माझा देवावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मला न्याय मिळेल याची खात्री आहे. प्रसिद्धीमाध्यमांमध्ये माझ्याविषयी  चुकीची माहिती प्रसिद्ध केली जात आहे. पण मला खात्री आहे की सत्याचा विजय होईल, अशा शब्दांत रियाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून सुरू  झालेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे  चौकशीची मागणी केली आहे. टाळेबंदीच्या काळात सुशांतसिंहच्या घरी पार्टी झाली, त्या पार्टीला कोण कोण उपस्थित होते याची चौकशी करावी, असे ते म्हणाले.