बॉलिवूड जगत हे सिनेमांसाठी जेवढं ओळखलं जातं तेवढंच ते प्रेम कहाणी आणि ब्रेकअप यांच्यामुळेही या झगमगत्या दुनियेचं अनेकांना कुतुहल राहिलं आहे. १४ फेब्रुवारी हा जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. याच प्रेमाच्या दिवशी एक अशी व्यक्ती जन्माला आली जिने संपूर्ण भारताला आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेमात पाडलं. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला अर्थात मुमताझ जहन नेहलवी होती. बॉलिवूडमध्ये एक वेगळी छाप पाडणाऱ्या अभिनेत्रीचे वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी हृदयाला छिद्र असल्यामुळे निधन झाले होते. मधुबाला यांच्या आकस्मित मृत्यूमुळे त्यांना हॉलिवूडच्या मर्लिन मन्रो, जूडी गरलॅण्ड, कॅरोल लोम्बार्ड आणि मीना कुमारी यांच्या पंक्तीत जाऊन बसवले.

दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडण्याआधी त्या प्रेमनाथ यांच्या प्रेमात होत्या. पण धर्मामुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही. प्रेमनाथ यांनी लग्नानंतर धर्म बदलण्याची मागणी केली होती. पण मधुबाला यांनी ती मान्य केली नाही. याच कारणामुळे मधुबाला आणि प्रेमनाथ यांचे लग्न होऊ शकले नाही.

यानंतर तराना सिनेमाच्या सेटवर दिलीप कुमार आणि मधुबाला यांची पहिली भेट झाली होती. या सिनेमानंतर त्यांनी संगदिल, अमर आणि मुघल- ए- आझम सिनेमात एकत्र काम केले. दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे ९ वर्षांचे नाते होते. दोघांनी साखरपुडाही केला होता. पण साखरपुड्याचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही.

मधुबाला यांच्या वडिलांसोबत असलेल्या मतभेदामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दिलीप कुमार यांनी मधुबालाशी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना कोर्टाची पायरी देखील चढावी लागली होती. मधुबालाच्या वडिलांनी दिलीप कुमार यांनी आपल्या मुलीला फसविल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता.