बॉलिवूड चित्रपटांसाठी २०२० हे वर्ष खास ठरणार आहे. बड्या बड्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे दृश्य दिसत आहे. या चित्रपटांमध्ये बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट ‘राधे’ तर दुसरीकडे बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचा समावेश आहे.

सलमान आणि अक्षयचे हे चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता ‘राधे’ आणि ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे सलमान खानचा ‘राधे’ आणि अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट एकाच दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे. ‘२०२० मध्ये ईदला सलमान खानच्या राधे विरुद्ध अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब चित्रपट असणार आहे’ असे ट्विट तरण आदर्श यांनी केले आहे.

सलमानच्या राधे चित्रपटात अभिनेत्री दिशा पटाणी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी सलमान आणि रणदीपने सुलतान चित्रपटात एकत्र काम केले आहे तर दिशा आणि जॅकी यांनी ‘भारत’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. सलमानने चित्रपट निर्माते सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री यांच्या सोबतचा फोटो पोस्ट करत चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याचे सांगितले आहे.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना २’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्स या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.