व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार पटकावणाऱ्या दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याच्या ‘द डिसायपल’सह इतर आठ भारतीय चित्रपटांची बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे.

चित्रपटप्रेमींमध्ये दक्षिण कोरियातील बुसान आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अत्यंत मानाचा समजला जातो. हा महोत्सव २१ ते ३० ऑक्टोंबर या कालावधीत होईल. जगभरातील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आणि सांगता सोहळा रद्द करण्यात आला आहे. यावर्षी ९८ देशातील १९२ चित्रपट यात प्रदर्शित करण्यात येतील. व्हेनिस चित्रपट महोत्सवात चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘द डिसायपल’ चित्रपटाला ‘द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रि टीक्स’ अर्थात एफआयपीआरईएससीआय संस्थेचा इंटरनॅशनल क्रिटीक्स तसेच सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटासह अनंत महादेवन यांचा ‘बिटरस्वीट’, इमरान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेला ‘हरामी’, ‘कॅपटिव’ हा बंगाली चित्रपट, ‘ए अवर’, ‘मील पत्थर’, ‘मट्टो का सैकल’ आणि कन्नड भाषेतील ‘पिंकी एली’ या चित्रपटांची निवड बुसान चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे.