स्टार प्लस वाहिनीवर ‘एक भ्रम सर्वगुण संपन्न’ ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेचा दमदार लाँचिंगचा कार्यक्रम नुकताच पार पडला. अनोख्या पद्धतीने हा कार्यक्रम लाँच करण्यात आला. उदयपूरमधील हजार वर्ष पुरातन सास-बहू मंदिरात हा कार्यक्रम लाँच करण्यात आला. यावेळी मालिकेतील मुख्य अभिनेत्री श्रेणू पारिख उपस्थित होती.

सासू-सुनेच्या नात्याला समर्पित करणारं हे एकमेव मंदिर असल्याने निर्मात्यांनी इथे कार्यक्रम लाँच करण्याचा निर्णय घेतला. ही जागा फारशी कोणाला माहीत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करणं प्रसिद्धीसाठी योग्य असेल हे निर्मात्यांनी जाणलं. सासू-सुनेच्या नात्यावर आधारित बऱ्याच मालिका आजकाल पाहायला मिळतात. त्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी ही जागा उत्तम असल्याचं निर्माते म्हणतात.

या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये जान्हवी ही खलनायक सूनेच्या भूमिकेत आहे. आजपर्यंत मालिकेत ज्या पद्धतीने सूनेची भूमिका दाखवण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध जान्हवीची भूमिका आहे. मालिकेची कथा नेमकी काय आहे हे अद्याप स्पष्ट नाही.

‘एक भ्रम सर्वगुण संपन्न’ ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर २२ एप्रिलपासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. सुमित सोडानी हे या मालिकेचे दिग्दर्शक असून ‘सनी साइड अप फिल्म्स’ने निर्मिती केली आहे. यामध्ये श्रेणू पारिख आणि जैन इमाम मुख्य भूमिकेत आहेत.