भट कॅम्पमध्ये तयार झालेला दिग्दर्शक असा शिक्का असल्याने थरारपट असूनही ‘एक व्हिलन’चे संगीत उत्तम असावे याकडे मोहित सुरीने बारकाईने लक्ष दिले आहे. वास्तविक  ‘आशिकी २’मुळे या दिग्दर्शकाकडून थरारपटाचा विषय कसा हाताळला असेल आणि खासकरून कलावंतांची फळी चांगली असल्यामुळे त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु, या अपेक्षा फक्त रितेश देशमुखने पूर्ण केल्या आहेत; परंतु दिग्दर्शक म्हणून चित्रपट खूप खिळवून ठेवणारा करता आलेला नाही.
गुरू हा अनाथ तरुण आपल्या आई-वडिलांच्या हत्येचा बदला घेतो आणि गुन्हेगारीकडे वळतो. प्रचंड असंतोष त्याच्या मनात कायम खदखदत राहतो. मरणाची भीती नष्ट होते. कारण जगण्याचे कारण, उद्देश त्याला मिळत नाही. पण आयेशा भेटते आणि त्याचे आयुष्य नवे वळण घेते. चित्रपटाला आणखी एक समांतर कथानक असून त्यात राकेश महाडकर मराठी मध्यमवर्गीय तरुण दाखविण्यात आला आहे. मध्यमवर्गीय जगण्यातील घुसमट, नोकरीत अपयश, बायकोसह सतत सर्वाची बोलणी खाण्याचे प्रसंग यामुळे कातावलेला राकेश नकळत हिंस्र बनतो. आयेशा-गुरू-राकेश असा हा त्रिकोण असला तरी प्रेमत्रिकोण नाही. यातला खलनायक कोण हे चित्रपट उलगडून सांगतो.
प्रत्येक प्रेमकथेत एक खलनायक असतोच अशी या चित्रपटाची ‘टॅगलाइन’ असल्यामुळे त्या टॅगलाइनला अनुसरून पडद्यावर कथानक उलगडते. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असली तरी गुरू हा मनाने अतिशय चांगला आहे असे दाखवले आहे. मूळ कोरियन चित्रपटाचे बॉलीवुडीकरण केल्याशिवाय प्रेक्षकांना रुचणार नाही, अशी जणू खूणगाठ बांधली असल्यामुळे हा थरारपट अधिक गुंतवून ठेवण्यात अपयशी ठरला आहे. भट कॅम्पमधील असल्याने दिग्दर्शकाला कारागिरी उत्तम जमली आहे. धक्कातंत्र, फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करून गोष्ट उलगडून सांगण्याचा प्रयत्न, त्याला छायालेखन आणि उत्तम संगीताची साथ लाभली आहे.
तेरी गलियाँ, जरूरत आणि हमदर्द ही गाणी श्रवणीय आहेत. प्राची देसाईचे आयटम साँग, वृद्ध व्यक्तींचे लग्न जमविणे वगैरेसारखा तद्दन फालतू भाग असे बॉलीवूड मसाला गाष्टींचा भडिमार या चित्रपटातही आहेच. त्यामुळे नवे काही पाहायला मिळेल ही अपेक्षा फोल ठरते.
गुरूच्या भूमिकेतील सिद्धार्थ मल्होत्रा उंच, धिप्पाड असल्यामुळे पडद्यावर ‘अँग्री यंग मॅन’ दिसतो. पण त्याला गुरू ही भूमिका अजिबात पेललेली नाही हे जाणवते. रितेश देशमुख, त्याचा वावर, त्याचा अभिनय हा चित्रपटात विलक्षण प्रभावी ठरला आहे. श्रद्धा कपूर अजून नवीन आहे, त्यामुळे वेगळ्या छटा असलेली आयेशा ही व्यक्तिरेखा तिला चांगली साकारता आलेली नाही. रितेश देशमुखने डोळ्यांतून खुनशीपणा चांगला दाखविला आहे. आतापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीतील विनोदी भूमिकांच्या बाहेर जाऊन त्याने केलेल्या प्रयत्नांमुळे इथून पुढे त्याला वेगळ्या पद्धतीच्या भूमिकांसाठी विचारणा होऊ शकेल इतकी छाप राकेश या भूमिकेद्वारे पाडण्यात रितेश देशमुख यशस्वी ठरला आहे.
संगीत आणि धक्कातंत्र यामुळे पुढे काय होणार, याची उत्कंठा प्रेक्षकाला वाटते; परंतु खलनायकाचा चेहरा दिसल्यानंतरही बॉलीवूड मसालापटासारखा चित्रपट सुरू राहतो त्यामुळेही कंटाळा येतो. रितेश देशमुखने आपल्या प्रतिमेबाहेर पडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा-श्रद्धा कपूर ही जोडी प्रेक्षकांना आवडू शकेल. आयेशाला एक असाध्य आजार झालाय आणि मरण्यापूर्वी तिला आपल्या असंख्य इच्छा पूर्ण करायच्या आहेत. त्या इच्छा तिने एका डायरीत लिहिल्या आहेत. गुरू तिच्या बऱ्याच इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतो. त्यानंतर तिचे चांगल्या डॉक्टरकडून उपचारही करवून घेतो. मग तिला जगातला कुठला असाध्य आजार झालाय तो बराही होतो म्हणे. आता हा आजार कुठला झालाय ते लेखक-दिग्दर्शकाने अखंड चित्रपटात प्रेक्षकाला कळू दिलेले नाही. आयेशाच्या चेहऱ्यावर आजार झाल्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. प्रत्येक प्रेमकथेत कुणीतरी खलनायक असतोच अशी टॅगलाइन असलेला हा चित्रपट त्या टॅगलाइननुसार पडद्यावर साकारत जातो. रेमो फर्नाडिसने साकारलेला गुंड टोळीचा म्होरक्या काय किंवा एकामागून एक घडणाऱ्या हत्यासत्राची तड लावणारा पोलीस अधिकारी या दोन्ही व्यक्तिरेखा विनोदी ठरतात. कथानकात त्यांना कोणतेही स्थान नाही. एखादी हत्या घडल्यानंतर त्याचा सुगावा लावण्यासाठी पोलीस कोणती कार्यपद्धती वापरतात, वगैरे काहीही हा पोलीस अधिकारी करीत नाही. फक्त फालतू संवाद म्हणून भाव खाण्याचा प्रयत्न करतो. असा भोंगळपणा केल्यामुळे चांगली संकल्पना असलेला हा चित्रपट प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात कमी पडतो.
एक व्हिलन
निर्मात्या – एकता कपूर, शोभा कपूर
दिग्दर्शक – मोहित सुरी
लेखक – तुषार हिरानंदानी, मिलाप मिलन झवेरी
छायालेखक – विष्णू राव
संकलक – देवेन मुरुडेश्वर
संगीत – अंकित तिवारी, मिथुन, सोच (बॅण्ड)
कलावंत – श्रद्धा कपूर, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, आम्ना शरीफ, कमाल आर. खान, शाद रंधावा, रेमो फर्नाडिस.