रवींद्र पाथरे  

हिंदी चित्रपटांच्या सीक्वेल्सची आपल्याला चांगलीच सवय आहे. आता मराठीतही ‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या निमित्ताने तो ट्रेण्ड रुजू पाहतो आहे. पण मराठी नाटकाचा- ‘वाडा’ नाटय़त्रयी हा अपवाद वगळता- सीक्वेल निघाल्याचं ऐकिवात नाही. फार पूर्वी ‘चाहूल’ या प्रशांत दळवी लिखित नाटकाचा सीक्वेल असल्याचा दावा करत ‘कळा या लागल्या जीवा’ हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. परंतु खरं म्हणजे ते ‘चाहूल’चीच प्रतिआवृत्ती होतं. मराठी रंगभूमीवरील सीक्वेल नाटकांच्या या अभावास छेद देत एक नवं सीक्वेल रंगमंचावर अवतरलं आहे : ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’! मात्र, त्याचा कर्ताकरविता आधीच्या नाटकापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे : नव्या पिढीचा लेखक-दिग्दर्शक अद्वैत दादरकर! या सीक्वेलचं कथाबीज जरी इम्तियाझ पटेल यांचं असलं, तरी अद्वैत दादरकरांनी ‘सुयोग’ निर्मित (श्रीरंग गोडबोले लिखित व मंगेश कदम दिग्दर्शित) आणि प्रशांत दामले-कविता लाड या जोडीने गाजवलेल्या ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाशी त्याची छान नाळ जुळविली आहे. म्हटलं तर ‘एका लग्नाची गोष्ट’चा हा पुढचा भाग आहे म्हणा किंवा स्वतंत्रपणेही या नव्या नाटकाचा आस्वाद आपण घेऊ शकतो. सुखद आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही ‘पुढची गोष्ट’ही आधीच्या नाटकाइतकीच धम्माल रंगली आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

लग्नाला साधारण १५-२० वर्षे झाल्यावर नवरा-बायकोच्या नात्यात एक साचलेपण येतं. लग्नाच्या वेळची भावनिक-मानसिक असोशी कमी झालेली असते. दोघंही संसार, करीअर, मुलांचं संगोपन या चाकोरीत व्यस्त असतात. मुलं आता मोठी झालेली असल्यानं त्यांचं विश्व वेगळं झालेलं असतं. तशात बायको नोकरी न करता नुसतीच गृहिणी असेल तर तिला या काळात पोकळी जाणवू लागते. चाळीशी-पंचेचाळीशीच्या या वयात नवरा आपल्या नोकरीधंद्यात गुरफटलेला असतो. बायकोला एव्हाना तो गृहीत धरायला लागलेला असतो. नात्यातील समंजसपणातून हे झालं असेल तर त्याचा बाऊ होत नाही. पण.. पण तसं नसेल तर मात्र मोठाच बखेडा उभा राहू शकतो. त्यात पुन्हा दोघांपैकी कुणी एकजण (सहसा बायकोच!) अति संवेदनशील असेल तर ताणलेल्या  या नात्यात विस्फोट होऊ शकतो. या वास्तवाला सामोरं जाणारं हे नाटक आहे. पण हे सारं मांडलं गेलंय ते धम्माल हास्यविनोदाच्या कॅप्सुलमधून!

‘एका लग्नाची गोष्ट’मधील मनोज-मनिषाच्या लग्नाला आता वीस वर्षे लोटलीत. तो एका पर्यटन कंपनीत बडय़ा हुद्दय़ावर आहे. कंपनीचं लक्ष्य (टार्गेट) गाठण्याच्या तसंच खुशालचेंडू सहकाऱ्यांच्या काम न करण्याच्या ताणामुळे आणि ट्रॅफिक जॅम वगैरेसारख्या बाह्य़ ताणतणावांनी मनोज चिडचिडा झालेला आहे. घरी आल्यावर ही सारी टेन्शन्स काढण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे बायको.. मनिषा! मनिषा त्याला समजून घ्यायचा खूप प्रयत्न करते. मात्र तिच्या सहनशीलतेलाही मर्यादा असते. अशात तिची घटस्फोटित बहीण मालती या आगीत आणखीन तेल ओतायचं काम करत असते. ती मनिषाला मनोजपासून घटस्फोट घेण्याचा सल्ला देत असते. एकदा तर लग्नाचा वाढदिवसही मनोज साफ विसरतो आणि मनिषाने वाढदिवसाची तयारी केलेली असताना आपल्या चिडचिडीनं तिच्या उत्साहावर विरजण घालतो.

दुसऱ्या दिवशी त्याला त्याची चूक कळून येते. तो ऑफिसमधील ‘हॅपी गो लकी’ वृत्तीच्या पुरुचा याबाबतीत सल्ला घेतो. पुरु त्याला संसारातील रोमान्स पुन्हा प्रज्ज्वलित करायचा असेल तर एखाद्या फटाकडय़ा तरुणीशी ‘अफेअर’ करायचा सल्ला मनोजला देतो. वर त्याला त्याची पी. ए. असलेल्या कश्मिराशीच तू अफेअर का करत नाहीस, म्हणून भरीसही घालतो. घरातली गाडी (बायको) नीट चालवायची असेल तर एक चपळ ‘अ‍ॅक्टिव्हा’ही (तरुण प्रेयसी) सोबत असण्याची विवाहित पुरुषाला गरज आहे, हे तो मनोजला पटवून देतो. मनोज आधी तर त्याचा हा प्राणघातक सल्ला साफ धुडकावून लावतो. परंतु पुरुचं ऑफिसमधील लोकप्रियतेचं गारुड तो प्रत्यही अनुभवत असल्याने नंतर त्याला त्याच्या अनुभवी सल्ल्यात तथ्य असल्याचं वाटू लागतं.

..आणि मनोज ‘अ‍ॅक्टिव्हा’ घ्यायचं मनावर घेतो.

मनोज-मनिषाच्या संसारातला हरवलेला रोमान्स परत येतो का? की ‘अ‍ॅक्टिव्हा’मुळे मनोजच्या गाडीलाच अपघात होतो? पुढे नेमकं काय घडतं, हे प्रत्यक्ष नाटकात बघणंच उचित ठरेल.

नाटकाच्या प्रारंभीच मनिषा एक गोष्ट स्पष्ट करते : ‘या नाटकात दाखवलेल्या गोष्टी घरच्या आघाडीवर ‘ट्राय’ करून बघायच्या असतील तर ते ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर कराव्यात. कारण यातले स्टंट्स हे प्रशिक्षित स्टंट्समननी केलेले आहेत!’

या धोक्याच्या इशाऱ्यामुळे सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.

लेखक-दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांना लेखन-दिग्दर्शन या दोन्ही गोष्टी सहजी हाताळता येतात आणि त्यांत समतोलही साधता येतो, हे या नाटकानं सिद्ध केलं आहे. ‘एका लग्नाची गोष्ट’चा सीक्वेल करणं हे येरागबाळ्याचं काम नोहे. त्यातही आधीच्या यशस्वी नाटकाहून तो अधिक हास्यस्फोटक करणं, हे तर त्याहून कर्मकठीण. परंतु अद्वैत दादरकर यांना ही सिद्धी साध्य झाली आहे. गाडी आणि स्पेअर अ‍ॅक्टिव्हा ही तर भन्नाटच कल्पना आहे. वर गंमत अशी की, याबाबतीत जे काही घडतं ते प्रेक्षकांना विश्वासात घेऊनच! उघडपणे! त्यामुळे खरं तर नाटकातलं धक्कातंत्राचं मायलेज स्वत:हून गमावण्याची शक्यता होती. परंतु हा धोका त्यांनी बुद्धय़ाच पत्करलेला आहे. आणि तरीही नाटक प्रेक्षकाला खिळवून ठेवतं. एवढंच नव्हे तर काही प्रसंगांत अस्वली गुदगुल्या करून प्रचंड हशेही वसूल करतं. फक्त एक गोष्ट ते करते तर नाटकातील समस्येची गांभीर्याची किनार कायम राहती. ते म्हणजे मालती या पात्राला हास्यास्पद करून त्यांनी त्याचं प्रयोजनच संपवलं आहे. मालती हे पात्र घटस्फोटामुळे जगण्याबद्दल कडवट झालेलंच ठेवलं असतं तर यातली मध्यमवयीन जोडप्यांची समस्या उपहासगर्भतेमुळे अधिक खुलली असती. ते न झाल्यानं नाटक रंजनाच्या अतिरिक्त डोसापायी प्रेक्षकानुनयाकडे झुकतं. नाटकात मांडलेली समस्या हास्यास्पद नक्कीच नाही. तिच्याकडे हसतखेळत पाहणं वेगळं आणि तिला हास्यास्पद बनवणं वेगळं. अर्थात चार घटका निव्वळ मनोरंजन करवून घेण्यासाठी आलेल्यांना यात काही खटकणार नाही म्हणा. मनिषाने प्रेक्षकांत उतरून त्यांच्याशी घरगुती संवाद साधत ठेवण्याचं यातलं तंत्र छान आहे. प्रेक्षकाला या ना त्या प्रकारे हसवायचंच असा विडा उचललेला असल्यानं प्रयोगात एकही क्षण रेंगाळलेला जात नाही. यातले काही पंचेस तर बौद्धिक विनोदाचा आनंद देणारे आहेत. त्याबद्दल अद्वैत दादरकरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच.

प्रसन्न वृत्तीच्या या नाटकाची जातकुळी ओळखून प्रदीप मुळ्ये यांनी त्यास साजेसं नेपथ्य केलं आहे. पूर्वीच्या ‘लग्ना’तली ‘ही परी अस्मानीची’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही गाणी यातही वापरल्यानं स्मरणरंजनाचा श्रवणीय आनंद देतात. प्रशांत दामले ती गातातही छान. त्याकरता जुन्या नाटकातील गीतकार, संगीतकार आणि नृत्य-आरेखक यांना धन्यवाद द्यायला हवेत. यात आणखीन एक नवं गाणं घालण्यात आलं आहे. तेही सुश्राव्य आहे. तांत्रिक बाबींत कसलीच कसूर नाहीए.

प्रशांत दामले (मनोज) यांची विनोदाची जाण विलक्षण आहे हे आता सिद्धच झालेलं आहे. त्यांच्या काही जागा तर प्रेक्षकांनीही पाठ झालेल्या आहेत. तरीही ते यात धमाल आणतात. त्यांचा निरागस बेरकीपणा फर्मास. क्रिया-प्रतिक्रिया आणि प्रतिक्षिप्त क्रियांचा हा खेळ ते मस्त रंगवतात. कविता लाड-मेढेकर यांची मनिषाही खूप गोड आहे. मनोजला उंदराला मांजरानं गमतीत खेळवावं तसं खेळवण्यातली मजा त्यांनी छान दाखवलीय. अतुल तोडणकर यांनी पुरुचा गुलछबूपणा पुरेपूर एन्जॉय केलाय. कश्मीरा झालेल्या प्रतीक्षा शिवणकर यांच्याकडे विलक्षण बोलका चेहरा आहे. त्यांनी म्युझिकली करताना जे केलं आहे ते, ज्याचं नाव ते. विनोदाच्या नाना परीही त्यांनी चोख आत्मसात केल्या आहेत. अन्य कलाकारांनीही आपापली कामं चोख केली आहेत.

एक प्रचंड हास्यस्फोटक, रंगतदार नाटक पाहण्याचा आनंद लुटायचा असेल तर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ अनुभवायलाच हवी.