‘शोला जो भडके दिल मेरा धडके… दर्द जवानी का सताये बढबढ के’ म्हणत सगळ्यांनाच साध्या सरळ नृत्याकडे आकर्षित करणाऱ्या भगवान दादांच्या जीवनावर आधारीत ‘एक अलबेला’ या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात भगवान दादांची भूमिका अभिनेता मंगेश देसाई साकारत असून त्यांनी आत्मसात केलेला भगवान दादांचा लूक, अभिनय आणि त्यांची नृत्यशैली याची चर्चा सिनेसृष्टीत सुरू आहे.

भगवान दादांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मंगेश देसाईने केलेली मेहनत चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे, या चित्रपटाचा अजून एक चर्चेचा विषय म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ‘एक अलबेला’च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. विद्या बालन चित्रपटात गीता बालींची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील विद्या बालनच्या लूकची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा आहे. टीझरच्या शेवटी विद्या बालनची एण्ट्री दाखविण्यात आली असून तिच्या भूमिकेबाबतची उत्कंठा आणखी ताणून धरण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर सरतांडेल यांनी केले असून हा चित्रपट २४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.