बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने ‘पवित्र रिश्ता’ या एकता कपूरच्या मालिकेत काम केले होते. आता एकताने ट्विटरद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

एकता कपूरने ट्विटमध्ये ‘सुशांत तू फार चुकीचे पाऊल उचललेस… एका आवड्यामध्ये सगळं काही बदललं. हे फार चुकीचं आहे’ असे म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.

छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतसोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेला ११ वर्षपूर्ण झाल्यामुळे निर्माती एकता कपूरने ट्विट केले होते. या ट्विटमध्ये एकताने सुशांत सिंहची मालिकेसाठी कशी निवड झाली हे सांगितले होत. त्यावर सुशांतने रिप्लाय देत मी तुमचा कायम आभारी आहे असे म्हटले होते.

आणखी वाचा : ‘हा’ ठरला सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट

२००९मध्ये ही मालिका प्रदर्शित झाली होती. दाक्षिणात्य मालिका Thirumathi Selvam वर आधारित पवित्र रिश्ताची निर्मिती करण्यात आली होती. या मालिकेने सुशांतला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. तसेच त्यावेळी ही मालिका ही हिट ठरली होती. तसेच काही दिवसांनंतर सुशांतने या मालिकेतूव काढता पाय घेतला. त्याने नंतर २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.