मुंबई : ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत अभिनेत्री कंगना राणावत हिने एका पत्रकारावर केलेल्या आरोपातून झालेल्या वादविवादाचा प्रकार हा दुर्दैवी होता, या प्रकाराबद्दल आपल्याला खंत वाटते, असे सांगत निर्माती एकता कपूर हिने एका निवेदनाद्वारे माफी मागितली आहे. या वादविवाद प्रकरणानंतर ‘एण्टरटेन्मेंट जर्नालिस्ट्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संघटनेने अभिनेत्री कंगना राणावत आणि निर्माती एकता कपूर यांच्यावर बहिष्कार टाकत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. एकता कपूरने माफीचे निवेदन दिल्यानंतर ते स्वीकारल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे, मात्र कंगनाने अजूनही माफी मागितली नसल्याने तिच्यावरचा बहिष्कार कायम ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटातील गाण्याचे प्रकाशन करण्याच्या निमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता, त्याला उत्तर देण्याऐवजी त्याने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटाची जाणूनबुजून बदनामी केल्याचा आरोप कंगनाने केला. या वेळी या दोघांमध्ये सुरू झालेला वाद इतका वाढला की, अखेर एकता कपूर आणि राजकुमार राव यांनी उपस्थितांची माफी मागत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र कंगनाने पत्रकारावर नाहक आरोप क रत उगाचच वाद निर्माण केला. त्यामुळे तिने आणि निर्माती एकता कपूरने याप्रकरणी माफी मागावी. तोवर त्यांच्यावर सगळ्या माध्यमांवरून बहिष्कार टाकण्यात आला असल्याचे ‘एण्टरटेन्मेंट जर्नालिस्ट्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संघटनेने जाहीर केले.