बलात्काराच्या गुन्ह्यात अडकलेला ‘नागिन ३’ फेम अभिनेता पर्ल वी पुरीला अनेक सेलिब्रिटी पाठिंबा देताना दिसून येत आहेत. यात सगळ्यात आधी एकता कपूरचं नाव घेतलं जातंय. अशातच एकता कपूर आणि पिडीत मुलीच्या आईमध्ये झालेल्या कथित संभाषणाची एक ऑडिओ क्लिप लीक झालीय. या ऑडिओ क्लिपमध्ये दोघीही याच प्रकरणासंबंधीत बोलत आहेत. एकता कपूरची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली. एकता कपूरनंतर आता अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने या प्रकरणात उडी घेतलीय.

व्हायरल होतेय ऑडिओ क्लिप
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एकता कपूर पिडीत मुलीच्या आईला सर्वांसमोर सत्य सांगण्यासाठी आग्रह करताना दिसून येतेय. अभिनेता पर्लवर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं यात मुलीची आई बोलत असल्याचे ऐकायला मिळते. “या सगळ्या प्रकरणात मुलीचं नावं खराब केलं जातंय. सोबतच पर्लवरही याचा परिणाम होतोय, असं एकता कपूर स्पष्टपणे म्हणते. “या ऑडिओ क्लिपमध्ये सदर मुलीच्या आईने अनेक मोठे खुलासे केले आहेत. तसंच यात पर्लला अडकवलं जात असल्याचं देखील यावेळी मुलीच्या आईने सांगितलं.

मुलीच्या कस्टडीबाबत सुरू आहे प्रकरण
एकता कपूरची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने पुढे येत नवा खुलासा केलाय. तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. यात तिने लिहिलं, “मी तुम्हाला काही व्यक्तींचा परिचय करून देते…या व्यक्तीचं नाव आहे अनिल दोंदे आणि महिला एकता शर्मा एक अभिनेत्री आहेत. अनिल दोंदे हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी अभिनेता पर्ल पुरीवर ५ वर्षाच्या मुलीचं शोषण केल्याचा आरोप केलाय. त्यांचं म्हणणं आहे की, हे सगळं ‘बेपनाह प्यार’ या मालिकेच्या सेटवर घडलं, याला २ वर्षापूर्वी बालाजी टेलीफिल्म्सने प्रोड्यूस केलं होतं. अनिल आणि एकता शर्मा हे दोघेही वेगळे झाले आहेत आणि आता ते मुलीच्या कस्टडीसाठी भांडत आहेत.

पती-पत्नीच्या भांडणाचं आहे हे प्रकरण
अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने या प्रकरणात आणखी माहिती देताना सांगितलं, “गेल्या दोन वर्षापासून मुलगी तिचे वडील अनिल दोंदेसोबत राहतेय. पत्नी एकता शर्मा विरोधात तक्रार दाखल करताना त्यांनी सांगितलंय की मुलीची आई एकता शर्मा ही मुलीला घेऊन सेट्सवर जात असे आणि तिथे मुख्य भूमिकेतले अभिनेते तिचं शोषण करत असत. ही मुलगी तिच्या आईसोबत सुरक्षित नाही.” यापुढे दिव्याने लिहिले, “ही जी कथा रचण्यात आली आहे यासाठी अनिल दोंदेला फिल्मफेअर बेस्ट स्क्रीनप्ले अवॉर्ड मिळाला पाहीजे.”

दिव्या म्हणाली, ” एफआयआरमध्ये पर्लचं नावच नाही”
यापुढे दिव्याने लिहिलं, “आता पोलिसांनी पर्लला अटक केली आहे…मला हे जाणून घ्यायचंय, जेव्हा २०१९ मध्ये हा गुन्हा दाखल झाला होता, तेव्हा का नाही पोलिसांनी पर्लला अटक केली ? कारण यात स्पष्टपणे लिहिलंय की जेव्हा मुलीचं शोषण झालं तेव्हा ती तिच्या आईसोबत होती. एफआयआरमध्ये पर्लचं नाव कुठेच नाही. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये मुलीची आई स्पष्टपणे बोलतेय की मुलीच्या वडिलांची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही. त्याने एकता शर्माला कित्येकदा शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केलाय. तिच्याकडे याचे अनेक पुरावे सुद्धा आहेत. तिने स्पष्टपणे सांगितलं की यात पर्लचा काही दोष नाही आणि सेटवर असा कोणताच प्रकार झालेला नाही.”