निर्माती एकता कपूर वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. त्याचसोबत एकता कपूरच्या वेब सीरिजदेखील त्यातील बोल्ड कथानकांमुळे कायम वादात सापडतात. एकता कपूरने तिच्या नव्या वेब सीरिजमुळे पुन्हा एकदा वाद ओढावून घेतला आहे. एकता कपूरवर यावेळी पोस्टर चोरीचा आरोप करण्यात आला आहे.

अल्ट बालाजी निर्मित ‘हिज स्टोरी’ या तिच्या नव्या वेब सीरिजचं पोस्टर एकताने शुक्रवारी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या वेब सीरिजचं टीझरदेखील रिलिज करण्यात आलं आहे. समलैंगिक संबंधावर आधारित या वेब सीरिजचं पोस्टर एकताने कॉपी केल्याचा आरोप करत नेटिझन्सनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

2015 सालात आलेल्या ‘लव्ह’ या सिनेमाचे कला दिग्दर्शक आणि फिल्म मार्केटिंग स्ट्रेटजिस्ट जहान बक्शी यांनी एकता वर त्यांचा सिनेमा ‘लव्ह’च पोस्टर कॉपी केल्याचा आरोप केला आहे. सिनेमाचं पोस्टर ट्विट करत त्यांनी म्हंटलं आहे, “अल्ट बालाजी जरा सांगा तुम्ही योग्य आहात का?, जर तुम्हाला कुणी पोस्टर डिझाइन करणारा हवा असेल तर सांगा,मी तुमची मदत करू शकतो. मी विश्वासाने सांगतो की हे महाग नाही आहे.”

पुढे जहान बक्शी यांनी सांगितलं की ‘लव्ह’ या सिनेमाचं पोस्टर टॉक पिजन कंपनीने तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. “हे तयार करण्यासाठी आम्ही महिने घालवले होते. एखाद्या इंडी सिनेमासाठी भरपूर वेळ आणि पैसा खर्च करणं सोपं नसतं. तरीही जो स्टुडीओ एखादं पोस्टर आरामात डिझाइन करु शकतो ते दुसऱ्याचं काम चोरत आहेत. हे खूप दु:खद  आहे.” तर ‘लव्ह’ सिनेमाचे दिग्दर्शक सुधांशू सरिया यांनीदेखील टीका केली आहे.

सोशल मीडियावर ‘महारानी’चा धुमाकूळ; हुमा कुरेशीच्या लूकला चाहत्यांची पसंती

पोस्टर चोरीची ही पहिलच वेळ नाही या आधी ‘द मॅरीड वुमन’ या सिनेमाच्या पोस्टरवरूनही वाद निर्माण झाला होता. एकताच्या हिज स्टोरी’ मध्ये एका साधारण कुटुंबातील पुरुषाते समलैंगिक संबंध आणि त्यानंतर त्याच्या पत्नीला बसलेला धक्का, कुटुंबासमोर उभे राहिलेले प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेला तणाव हे कथानक पाहिला मिळणार आहे.