टेलिव्हिजन विश्वावर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या एकता कपूरचा ज्योतिष आणि अंकशास्त्रावर खूप विश्वास असल्याचं तुम्हाला ठाऊक असेलच. मेहनत, कामाप्रती असलेले समर्पण आणि निर्णयक्षमता यांसोबतच ज्योतिष आणि अंकशास्त्राचा आपल्या यशात मोलाचा वाटा असल्याचं एकता मानते. शाहरुख खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘टेड टॉक्स’ या कार्यक्रमात तिला बोलावण्यात आले असून एकताने मात्र एक वेगळीच मागणी निर्मात्यांपुढे ठेवली आहे.

‘मिड डे’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एका ज्योतिषाने एकताला कार्यक्रमात मोजून पाच मिनिटे आणि चाळीस सेकंदच बोलण्याचा सल्ला दिला आहे. यापेक्षा एकही मिनिट जास्त नाही किंवा कमी नाही. हा ठराविक कालावधी तिच्यासाठी योग्य असल्याचे मत ज्योतिषांनी व्यक्त केले आहे. तर एकतानेही त्यांचा सल्ला ऐकत ‘टेड टॉक्स’मध्ये ठराविक वेळ बोलणार असल्याचे म्हटले आहे. तिच्या या विचित्र मागणीवर शाहरुखचे काय म्हणणे असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

वाचा : वरुणही बोहल्यावर चढण्यास सज्ज?

ज्योतिष आणि अंकशास्त्रावर गाढ विश्वास ठेवणाऱ्या एकताच्या मालिकांची नावेही ‘क’ या अक्षराने सुरु झालेली पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे तिने निर्मिती केलेल्या चित्रपटांच्या नावांच्या स्पेलिंगमध्येही वेगळेपण स्पष्ट दिसून येते.