|| सुहास जोशी

संघटना मग ती कोणतीही असो, त्यामध्ये मधल्या फळीतल्यांपैकी एखाददुसरी अशी खास व्यक्ती असते. त्याचे सारे प्रयत्न हे काहीही करून वरच्या फळीत किंबहुना संघटनेचा प्रमुख होण्याच्या दिशेने सुरू असतात. त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. अगदी खालच्या फळीतल्या लोकांनी करायची कामंदेखील ते करत असतात. संकटांना थेट भिडायला त्यांना आवडत असते. अगदी जिवावर बेतले तरी बेहत्तर, पण जाणीवपूर्वक आव्हानं घ्यायची आणि यशस्वी व्हायचे अशी त्यांची जिद्द असते. त्यांच्या या जिद्दीमुळे सतत काहीना काही तरी घडत असते. केवळ रोजचे काम ढकलायचे हे त्यांना पटत नसते. अशा जिद्दीची माणसं जर अमली पदार्थाच्या व्यवसायात आणि राजकारणात एकाच वेळी असतील तर त्या दोन्ही ठिकाणी आणि परिणामी त्या देशात काय होऊ  शकेल याची कल्पनाच केलेली बरी. पण हे सारं प्रत्यक्षात घडतं ते अमली पदार्थाचे गोदामच म्हणावे अशा मेक्सिकोत. अमली पदार्थाच्या व्यवसायातील एका डॉनची ही कथा नेटफ्लिक्सवरील ‘एल चॅपो’ या सिरीजमध्ये अगदी थेटपणे मांडण्यात आली आहे.

‘एल चॅपो’ हा अमली पदार्थाच्या व्यवसायातील एका कार्टेलमध्ये (गटामध्ये) मधल्या स्तरावर काम करणारा गुंड. पण त्याला मोठे व्हायचे असल्यामुळे तो समांतररीत्या काही हालचाली करत असतो. त्यापैकीच एक म्हणजे तो मेक्सिको-अमेरिकेच्या सीमेच्या खाली भूगर्भात थेट सीमापार जाणारा बोगदाच खणतो. ज्यायोगे अगदी कमीतकमी वेळात विनासायास अमली पदार्थ अमेरिकेत पोहोचवता येतील अशी त्याची योजना असते. तो ज्या कार्टेलमध्ये काम करत असतो त्याच्या प्रमुखाला काही ही योजना आकर्षक वाटत नाही. मग तो थेट या व्यवसायातील सर्वोच्च डॉनकडे म्हणजेच पाब्लो एस्काबोरकडे जाऊ न त्यालाच ही ऑफर देतो. आणि ७२ तासांत हे काम करून दाखवतो. त्यामुळे साहजिकच त्याचा दबदबा वाढतो. आणि कालांतराने तो स्वत: एका छोटय़ा गटाचा दादा होतो. दुसरीकडे सरकारदरबारी शासक पक्षात मधल्या पातळीतील एक सचिव -कानोडरे- अशीच वर जायची धडपड करत असतो. एका प्रकरणात तो मुत्सद्दी चाल खेळतो आणि थेट पक्षाचा मुख्य सचिव व राष्ट्राध्यक्षांचा सल्लागार होतो.

पण या दोघांची पूर्ण सत्ता मिळवायची इच्छा पूर्ण झालेली नसते. त्यामुळे ते अजूनही बऱ्याच हालचाली करत असतात. ‘एल चॅपो’ हा थेट हल्ला करणारा, तर कानोडरे हा मुत्सद्दीपणे पण अगदी भेदक अशा हालचाली करणारा. दोघेही त्यांच्या वरच्या माणसाला कसं खाली खेचता येईल हेच पाहत असतात. दोन्ही बाबी दिसताना स्वतंत्र असल्या तरी त्यांचा कायम एकमेकांवर परिणाम होत असतो. मेक्सिकन सरकार हे अमली पदार्थाच्या व्यापारापुढे हतबल तर असतेच, पण त्याच वेळी या व्यापारातून होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे अंतर्गतरीत्या पोखरलेले असते. प्रत्येक वेळी अमली पदार्थ व्यावसायिक आणि राजकारणी हे दोन्ही घटक एकमेकांवर कुरघोडी करत असतात. कानोडरेच्या सल्ल्यामुळे अमली पदार्थाच्या एका मोठय़ा दादाची सुटका होते आणि हा दादाच मग इतर कार्टेलमध्ये अंतर्गत कुरबुरी वाढवू लागतो. त्यातच एल चॅपोच्या एका सहकाऱ्याच्या कुटुंबीयांची हत्या होते. तर एल चॅपो जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावतो आणि दुसऱ्याच अडकतो.

‘एल चॅपो’ या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये या साऱ्या घडामोडी होतात. हा सारा खेळ सत्तेचाच असतो. कारण पैसा हवा तेवढा असतो. पण अनियंत्रित सत्ता हे आकर्षण काही वेगळेच असते. आणि तेच या दोघांना हवे असते. पण अशा वेळी आजूबाजूचे घटक टपलेलेच असतात. मग ते एक प्रकारचे गँगवॉरच ठरते.

मेक्सिकोतील अमली पदार्थाच्या व्यवसायावर अनेक चित्रपट, सिरीज आजवर आल्या आहेत. काही प्रमाणात त्यातील कथानकाचा साचा साधारण सारखाच असतो. पण येथे जो संघर्ष आहे तो मात्र काहीसा वेगळ्या प्रकारचा आहे. येथे कारणीभूत आहे ती या दोन पात्रांची जिद्द. येनकेनप्रकाराने त्यांना आपले ध्येय गाठायचे आहे. त्यामुळे ते शांत बसत नाहीत. पाटर्य़ा करत नाहीत की पैसे उडवत नाहीत. त्यांना काहीही करून आजूबाजूच्यांना संपवायचे असते आणि सर्वोच्च पदावर जायचे असते. याच विषयाशी साधम्र्य असणाऱ्या इतर कथानकांशी याची तुलना होणे साहजिक आहे. पण कथेतील या जिद्दीच्या सूत्रामुळे या सिरीजमध्ये वेगळीच गंमत आहे. ही गंमत दिग्दर्शकाने नेमकी पकडली आहे.

बाकी या लोकांचे हावभाव, त्यांचे कपडे, आलिशान बंगले, गाडय़ा या साऱ्या बाबी आता नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यात फार काही वेगळे असे नावीन्य राहिलेले नाही. पण एल चॅपोमध्ये कथासूत्र पकडून ठेवण्यात संकलकाचा खूप मोठा वाटा आहे. दोन थेट संबंध नसलेल्या पण त्याच वेळी या समांतर बाबीतून काही तरी तिसरेच घडणार असते तेव्हा ती उत्सुकता ताणायची प्रक्रिया संकलनातून चांगली प्रभावी ठरताना दिसते. ‘नार्कोज’ या सिरीजबरोबरच ‘एल चॅपो’ या सिरीजमुळे नेटफ्लिक्सने हा सारा प्रेक्षकवर्ग त्यांच्याकडे वळवण्यात चांगलेच यश मिळवले आहे.

  • एल चॅपो
  • ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स
  • सीझन – पहिला