|| सुहास जोशी

माफियांच्या जगात शांतता कधीच नसते. सतत काही ना काही तरी घडतच असते. त्यातच जर एखाद्याला सर्वाचाच दादा व्हायचे वेध लागले असतील तर मग छोटय़ामोठय़ा सर्वाचीच फरफट सुरू होते. एखादा गट या दादाला स्वीकारायला तयार नसेल तर मग युद्धच सुरू होते आणि या युद्धाची युद्धभूमी ठरलेली नसते. अशा युद्धात कोणाचाही बळी जाऊ  शकतो. अगदी माफियांच्या घरापर्यंत ते जाऊन ठेपते. मग निव्वळ रक्तरंजित असेच याचे वर्णन करावे लागते. ‘एल चॅपो’ या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचे वर्णनदेखील असेच करणे योग्य ठरेल.

पहिल्या सीझनमध्ये चॅपोला स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करायची असते म्हणून धडपड सुरू असते; पण त्याच वेळी तो विरोधकांच्या खेळीमुळे तिसऱ्याच एका गुन्ह्य़ात तुरुंगात जातो; पण तरीदेखील त्याची सौदेबाजी करण्याची ताकद कमी झालेली नसते. तर शासकीय पातळीवर राष्ट्राध्यक्षांचा सल्लागार असणारा कानोडरेशी त्याची जवळीक याच वेळी साधली जाते. परिणामी काही काळानंतर का होईना, पण चॅपोला थेट शासकीय वरदहस्त लाभतो. या अभद्र युतीमुळे चॅपो तुरुंगातून पळतो. बाहेर पडल्यावर त्याचे पहिले काम असते ते म्हणजे स्वत:चे कार्टेल (गट) सुरू करणे. चॅपोच्या या कार्टेलचे नाव असते सिनालो कार्टेल; पण त्यामध्ये इतर छोटेमोठे गट सहभागी व्हायला राजी नसतात, तर दुसरीकडे सरकार बदलल्यामुळे कानोडरेदेखील सत्तावर्तुळाच्या बाहेर असतो. दोघेही सत्ताकेंद्र मिळवण्यासाठी एकत्रितपणे एक डाव आखतात आणि हा डाव चांगलाच यशस्वी होतो. सिनालो कार्टेल अस्तित्वात येते, कानोडरे थेट फेडरेल पोलिसांचा प्रमुख बनतो, तर या सर्वाची परिणती म्हणून शासकीय यंत्रणांचा वरदहस्त सिनालोवर कायमचा राहतो; पण तरीदेखील दोन तगडे कार्टेल सिनालोशी हातमिळवणी करत नसतात. त्यातूनच मग घनघोर युद्ध सुरू होते. उर्वरित दोन्ही कार्टेलही चांगलीच तगडी असतात. त्यांचीदेखील स्थानिक शासकीय यंत्रणांशी हातमिळवणी असते. त्यामुळे चांगलेच घमासान होत राहते. एकापाठोपाठ खून पाडले जातात. संपूर्ण वातावरण रक्तरंजित होऊन जाते.

‘एल चॅपो’ सीरिजचा हा दुसरा सीझन म्हणजे एकूणच अमली पदार्थाच्या माफियाविश्वातील घडामोडी या किती क्रूर आणि खुनशी पद्धतीने होतात त्याचे चित्र मांडतात. एल चॅपोला केवळ एकच ध्येय असते, ते म्हणजे अमली पदार्थाच्या माफियाचा सर्वोच्च दादा व्हायचे. त्यामुळे तो कोणतेही पाऊल उचलायला तयार असतो. सुरुवातीच्या काळात तो कष्ट करायला तयार असतो, तर आता हाती आलेली ताकद अतिशय क्रूरतेने वागवू लागतो. त्याच्या क्रूरतेला जोड मिळते ती कोणाचाही पत्ता कापण्याच्या त्याच्या विश्वासघातकी स्वभावाची. त्यामुळे त्याच्याशी सलगी करायला इतर कार्टेल तयार होत नसतात. चॅपोचे हे सारे चित्र प्रभावीपणे उभे करण्यात दिग्दर्शकाला चांगलेच यश आलेले आहे. त्याचबरोबर सत्तास्थानी कोणीही आले तरी या माफियातून मिळणारे पैसे सर्वानाच हवे असतात. त्यातूनच मग शासकीय यंत्रणांची सलगी वाढू लागणे हे ओघानेच येते. हे सारे अगदी थेटपणे मांडण्यात सीरिजकर्ते चांगलेच यशस्वी झाले आहेत असे म्हणता येईल.

संपूर्ण मालिका केवळ माफियांच्या विश्वाभोवतीच फिरत असल्यामुळे अशा वेळी त्या देशातील सर्वसामान्यांची परिस्थिती काय असू शकते यावर मालिकेत खूपच कमी भाष्य होते; पण दुसऱ्या सीझनमध्ये मात्र एक संपूर्ण भाग त्यावरच बेतलेला आहे. त्यातून होणारे भाष्य महत्त्वाचे आहे. एक शेतकरी ज्याची अफूची शेती चॅपोची माणसे बळकावतात, एक आई जी आपल्या अपहृत मुलीच्या शोधात चॅपोच्या प्रदेशात येते आणि एक तरुण मुलगा ज्याला पळवून आणले जाते आणि अमली पदार्थाचे व्यसन लावून कार्टेलमध्ये सामावून घेतले जाते अशा तिघांची कथा त्या एका भागापुरती का होईना पण त्या काळातील सर्वसामान्यांचे आयुष्य मांडते. हा भाग कथानकात मध्येच टपकल्यासारखा आला आहे, पण तो खूप परिणामकारकरीत्या मांडलेला असल्यामुळे पाहताना तसा अडथळा येत नाही हे नक्की.

पहिल्या सीझनपेक्षा या सीझनमधील सारा भर हा बंदुकींवरच अधिक आहे. त्यातच देशाची सेनादेखील याच कामात सहभागी होते. हे सारे एकूणच मेक्सिकोला असलेला अमली पदार्थाच्या व्यापाराचा विळखा स्पष्ट करणारे ठरते. खरे तर यातील अनेक सामाईक दुवे सर्वच राष्ट्रांमध्ये थोडय़ाफार फरकाने दिसत असतात. कुठे ते अगदीच कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्यासारखे असतात, तर कुठे गरजेप्रमाणे कमीजास्त होणारे. एल चॅपो ही एक वृत्ती असते. आपल्याकडेदेखील ती अनेक दादांमध्ये असते. त्यामुळे ‘एल चॅपो’ ही मालिका पाहताना आपणही असं काही तरी वेबच्या चौकटीत मांडू शकतो हे जाणवत राहते. मात्र सध्या तरी ते प्रयोग अजून पुरेसे पूर्ण होताना दिसत नाहीत.

  • एल चॅपो : सीझन दुसरा
  • ऑनलाइन अ‍ॅप-नेटफ्लिक्स