News Flash

बच्चेकंपनीची धमाल..

बच्चेकंपनीला घेऊन अनेक चित्रपट मराठीत झळकले आहेत, झळकत आहेत. दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपटही बच्चेकंपनीची धमाल आणि दिग्दर्शकाची कमाल या पठडीतला चांगला

| November 16, 2014 06:42 am

बच्चेकंपनीला घेऊन अनेक चित्रपट मराठीत झळकले आहेत, झळकत आहेत. दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपटही बच्चेकंपनीची धमाल आणि दिग्दर्शकाची कमाल या पठडीतला चांगला चित्रपट म्हणता येईल. मुलांमध्ये असलेली निरागसता आणि परिस्थितीची rv11जाणीव झाल्यावर त्यांचे जाणतेपणाने वागणे हा चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. पंढरपुरात घडणारी ही गोष्ट असल्यामुळे जाता जाता सूक्ष्मपणे दिग्दर्शकाने भाष्य करण्याचाही प्रयत्न केला आहे.
पंढरपुरात राहणारे ज्ञानेश-झेंडू आणि त्यांची आई व आजी यांचे कुटुंब. बेताचीच आर्थिक परिस्थिती असली तरी ज्ञानेश-झेंडूच्या शिक्षणात त्यांच्या आईने खंड पडू दिलेला नाही. कुटुंबावर आर्थिक संकट येते आणि ज्ञानेश-झेंडूची आवडती एलिझाबेथ सायकल विकायला लागू नये म्हणून या संकटावर आपल्या परीने मुले मात करण्याचा प्रयत्न करतात याभोवती संबंध चित्रपटाची गुंफण केली आहे.
आपल्या देशात अनेक तीर्थक्षेत्रांच्या भोवती त्या गावाचे  अर्थकारण, तिथला समाज, संस्कृती बांधली गेली आहे असे प्रकर्षांने जाणवते. पंढरपूर हेही तीर्थक्षेत्र त्यापैकीच एक आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वारकरी तसेच अनेक लोक विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. एकादशीच्या आधी दोन दिवस अनेक लोक अनेक छोटेमोठे व्यवसाय करून आपले पोट भरतात. दिग्दर्शकाने ज्ञानेश-झेंडूची गोष्ट सांगताना जाता जाता पंढरपुरात त्या दोन-तीन दिवसांत काय काय घडते, घडू शकते हे दाखविण्याचा प्रयत्न ठळकपणे न करता सूक्ष्मपणे केला आहे, असे जाणवते.
चित्रपटाच्या शीर्षकामुळे प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेले कुतूहल प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून नेते आणि अवघी ९० मिनिटे प्रेक्षकाला हा चित्रपट खिळवून ठेवतो एवढे मात्र नक्की. ज्ञानेश, त्याची बहीण झेंडू, ज्ञानेशचे वर्गमित्र गण्या, महादवे, नामदेव, कल्पेश हे सगळे मिळून एलिझाबेथ सायकल विकायला लागू नये म्हणून त्यांच्या परीने प्रयत्न करतात. लहान मुले परिस्थितीची जाणीव झाल्यावर कशी आपोआपच जाणतेपणाने वागतात, ज्ञानेशची अडचण लक्षात घेऊन त्याचे वर्गमित्र त्याला मनापासून कशी मदत करतात हे दाखविताना लेखक-दिग्दर्शकांनी ‘पाहा आम्ही कसे दाखवितो बच्चेकंपनीचा सिनेमा’ असा कोणताही आव न आणता लहान मुलांच्या कलाने, त्यांच्या तोंडी चपखल बसतील अशा पद्धतीचे संवादलेखन हे चित्रपटाचे बलस्थान आहे. कथेचा जेवढा जीव आहे तेवढय़ाच कालावधीचा चित्रपट करण्याच्या लेखक-दिग्दर्शकांच्या कौशल्याला दाद द्यावी लागेल. उगीचच गाण्यांचा भडीमार, अतिरंजितपणाला संपूर्णपणे फाटा देत केवळ मुलांचे वागणे-बोलणे, त्यातून नकळतपणे त्यांची विचार करण्याची पद्धत, धमाल करण्याची तऱ्हा, छोटय़ा छोटय़ा गोष्टी करताना त्यात मिळणारा आनंद हे पाहताना प्रेक्षकही रमून जातात. विशेष म्हणजे ज्ञानेश उंच झाला नसल्यामुळे एलिझाबेथ ही सायकल तो चालवू शकत नाही. पण कुठेही जाताना ती सायकल तो बरोबर घेऊन जातो. वारीत टिळा लावण्याचे काम करणाऱ्या आपल्या मित्राला तो सायकलीलाही टिळा लावण्यास सांगतो. सायकल ही मुलांच्या व्यक्तिरेखेसारखीच चित्रपटात व्यक्तिरेखा म्हणून दाखवली आहे.बच्चेकंपनीला घेऊन चित्रपट करताना त्यांच्याकडून नैसर्गिक अभिनय करवून घेण्याचे कौशल्य दिग्दर्शकाने पहिल्या चित्रपटाप्रमाणेच या दुसऱ्या चित्रपटातही दाखविले असून त्यालाही दाद द्यायला हवी.
 ज्ञानेशच्या भूमिकेतील श्रीरंग महाजन यानेच फक्त बालकलाकार म्हणून यापूर्वीही अभिनय केला आहे. परंतु, झेंडूच्या भूमिकेतील सायली भंडारकवठेकर, गण्याच्या भूमिकेतील पुष्कर लोणारकर, महादेवच्या भूमिकेतील चैतन्य बडवे, कल्पेशच्या भूमिकेतील चैतन्य कुलकर्णी या सगळ्याच बच्चेकंपनीने आपल्या सहजाभिनयाची चुणूक दाखवली आहे. ज्ञानेशच्या आईच्या भूमिकेतील नंदिता धुरी यांनीही उत्तम अभिनय केला आहे. उत्तम पटकथेला संगीत-पाश्र्वसंगीत आणि छायालेखनाची उत्तम साथ, अप्रतिम संवाद यामुळे प्रेक्षक रंगून जातो हे खरे. बच्चेकंपनीबरोबरच मोठय़ांनाही भावेल असा हा चित्रपट आहे. बच्चेकंपनीची धमाल आणि दिग्दर्शकाची कमाल अशा स्वरूपाचा हा चित्रपट नक्कीच आहे.
एस्सेल व्हिजन प्रस्तुत
एलिझाबेथ एकादशी
निर्माते – नीतीन केणी, निखिल साने, मधुगंधा कुलकर्णी
दिग्दर्शक – परेश मोकाशी
कथा – मधुगंधा कुलकर्णी
पटकथा-संवाद –  मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी
छायालेखन – अमोल गोळे
संगीत – आनंद मोडक
पाश्र्वसंगीत – नरेंद्र भिडे
संकलन – अभिजीत देशपांडे
कलावंत – श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, पुष्कर लोणारकर, नंदिता धुरी वनमाला किणीकर, चैतन्य बडवे, दुर्गेश बडवे, चैतन्य कुलकर्णी, अश्विनी भालेकर, अनिल कांबळे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 6:42 am

Web Title: elizabeth ekadashi a children performed marathi cinema
टॅग : Marathi Cinema
Next Stories
1 फुल ऑफ सर्किट्स!
2 अभिजात ‘गर्म हवा’ पुन्हा नव्या रूपात झळकला
3 ‘कलेसाठी कोणतीही बंधने नसवीत’
Just Now!
X