वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा एक अविस्मरणीय क्षण, कारण या दिवशी आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आनंदाचे केंद्रबिंदू आपणच असतो. प्रत्येक जण हा क्षण आपल्या आवडी व आर्थिक कुवतीनुसार साजरा करतो. काही मंडळी मोठमोठय़ा हॉटेलमध्ये जंगी पार्टी करून आनंद साजरा करतात, तर काही जण एखाद्या अनाथाश्रमातील मुलांना भेटवस्तू देऊ न आपला आनंद व्यक्त करतात. विनोदी अभिनेत्री ‘एलन डी – जनरस’ने वाढदिवस साजरा करण्याची एक अनोखी पद्धत निवडली. तिने आपल्या प्रेक्षकांना तब्बल १ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स भेट देऊन आपला ६०वा वाढदिवस साजरा केला.

‘द एलन डी – जनरस शो’ या कार्यक्रमात एलन विविध क्षेत्रांतील सेलेब्रिटी मंडळींच्या मुलाखती घेते. गेली १४ वर्षे सुरू असलेली ही मालिका आज जगातील सर्वात लोकप्रिय मुलाखत मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते; परंतु गेल्या तीन वर्षांत एलनने मुलाखतीचे पारंपरिक स्वरूप बदलून काही नवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान तिने कार्यक्रमाच्या माध्यमातून गरजूंना मदत करणारी ‘अ‍ॅक्ट्स ऑफ गुड’ ही मोहीम सुरू केली. २६ जानेवारी २०१८ रोजी आपल्या ६०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने ‘अ‍ॅक्ट्स ऑफ गुड’ या मोहिमेत सामील झालेल्या तब्बल ४०० समाजसेवकांना ‘द एलन डी – जनरस शो’चे आमंत्रण दिले आणि त्यांचे विविध अनुभव जाणून घेत त्यांच्याबरोबर आपला वाढदिवस साजरा केला. तसेच अलीकडे प्रचलित झालेल्या नवीन रूढीनुसार उपस्थित सर्व शुभेच्छुकांना तिने १ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या भेटवस्तू म्हणून दिले. हे पैसे सर्व प्रेक्षकांत सम प्रमाणात वाटले गेले. निर्माते अँडी लेसनर यांच्या मते प्रत्येकाला किमान २५०० अमेरिकी डॉलर्स भेट मिळाले. 

एलनच्या मते आजवर हजारो डॉलर्सचा चुराडा करून तिने आपले आनंदाचे क्षण साजरे केले आहेत; परंतु या कार्यक्रमादरम्यान काही समाजसेवकांच्या मुलाखती घेतल्यानंतर आपली चूक तिच्या लक्षात आली आणि ज्या समाजाने तिला भरभरून दिले त्या समाजातील गरजू लोकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे हे लक्षात घेत तिने ‘अ‍ॅक्ट्स ऑफ गुड’ ही मोहीम सुरू केली आहे.