परिनिरीक्षण मंडळाच्या ‘६८ दिवसां’च्या निर्बंधाने नव्या चित्रपटांचे प्रदर्शन रखडले

कोणताही चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी परवानगी हवी असेल तर चित्रपट किमान ६८ दिवस आधी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे पाठविलाच पाहिजे, या नियमाशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला गेल्याने डिसेंबरमध्ये एकाही हिंदी वा मराठी चित्रपटाचे प्रदर्शन होणार नसल्याचे उघड झाले आहे. ‘पद्मावती’ चित्रपटाला मंडळाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही आणि त्याचे कारणही मंडळाने स्पष्ट केलेले नाही. मात्र ‘पद्मावती’वरून देशात सुरू असलेल्या वादंगांच्या पाश्र्वभूमीवर मंडळाने या नियमाचीही ढाल वापरल्याने ‘पद्मावती’सह सर्वच चित्रपट रखडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनावर ‘आणीबाणी’ लादली गेल्याची भावना चित्रपट वर्तुळात व्यक्त होत आहे.

गेली अनेक वर्षे चित्रपटाचे प्रदर्शन आठवडय़ाभरावर आले असताना तो मंडळाकडे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाठवला जातो. अनेकदा प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला किंवा एखाद्दुसरा दिवस आधी मंडळाचे प्रमाणपत्र निर्मात्यांच्या हातात पडते. हिंदीतही अनेक ‘बिग बजेट’ चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा निश्चित असल्या तरी प्रत्यक्ष चित्रीकरण आणि त्यानंतर ‘पोस्ट प्रॉडक्शन’चा भार आटोपता आटोपता चित्रपट अखेरच्या क्षणी मंडळाकडे पोहोचतो. अनेक वर्षे ही प्रक्रिया राजरोस सुरू असताना अचानक ‘पद्मावती’ चित्रपटासंदर्भात निर्माण झालेल्या वादामुळे ‘६८ दिवस आधी’ हा नियम पुढे करत बोर्डाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना तूर्तास कात्रीत अडकवले आहे. मात्र या नियमाचा फटका फक्त ‘पद्मावती’ चित्रपटालाच नाही तर या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘टायगर जिंदा है’ या सलमान खानच्या बिग बजेट चित्रपटापासून अंकुश चौधरीच्या ‘देवा’ या मराठी चित्रपटापर्यंत सगळ्यांनाच बसला आहे.

‘पद्मावती’चे प्रदर्शन पुढे गेल्यामुळे त्या जागी आता कपिल शर्माची मुख्य भूमिका असलेला ‘फिरंगी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र गेले महिनाभर मंडळाच्या प्रमाणपत्रासाठी तगादा लावून थकलेल्या या चित्रपटाला प्रदर्शनाची तारीख लांबवावी लागत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडून संमत होण्यासाठी वेळ लागल्यामुळे प्रदर्शनाची तारीख २४ नोव्हेंबरवर गेली. मात्र अजूनही हा चित्रपट मंडळाकडून प्रमाणित न झाल्याने १ डिसेंबर ही प्रदर्शनाची नवीन तारीख तरी गाठता येते का, याबाबत निर्मात्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे.

‘पद्मावती’ पुढे ढकलल्याने फरहान अख्तर-रितेश सिधवानी यांची निर्मिती असलेल्या ‘फुकरे २’ या सिक्वलपटाला आणि ‘टायगर जिंदा है’ या दोन्ही चित्रपटांना फायदा होणार होता. ‘फुकरे २’ आधी १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. त्याची तारीख ८ डिसेंबर करण्यात आली असली तरी प्रदर्शनाभोवती या नियमामुळे प्रश्नचिन्ह उमटले आहे. ‘पद्मावती’ला या नियमानुसार वागवण्याचा निर्णय मंडळाने घेतला तर तोच नियम ‘टायगर जिंदा है’ चित्रपटालाही लागू करावा लागेल. त्यामुळे सलमानचाच काय डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांना कुठलाच चित्रपट पाहता येणार नाही, अशी भीती चित्रपट वर्तुळात व्यक्त होत आहे.

६८ दिवसांचा हिशेब..

चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर कालमर्यादेचा तक्ता देण्यात आला आहे. त्यानुसार; अर्जाची छाननी (७ दिवस), परिनिरीक्षण समिती नियुक्ती (१५ दिवस), अध्यक्षांना अहवाल (१० दिवस), निर्मात्याला माहिती देणे (३ दिवस), मंडळाने सुचविलेल्या बदलांनुसार नवी प्रत निर्मात्याने देणे (१४ दिवस), बदल अमलात आल्याची खातरजमा (१४ दिवस), प्रमाणपत्र वितरण (५ दिवस) यानुसार एकूण ६८ दिवसांची ही कालमर्यादा आहे. हा नियम १९५२च्या सिनेमॅटोग्राफ कायद्याच्या कलम ४१नुसार लागू आहे. म्हणजेच, जर चित्रपटात कोणताही बदल नसेल तर ३५ दिवसांत प्रमाणपत्र मिळू शकते.

अरे ‘देवा’!

१ डिसेंबरलाच ‘पद्मावती’ या चित्रपटाबरोबर अंकुश चौधरीची मुख्य भूमिका असलेला ‘देवा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आठवडाभरापूर्वीच हा चित्रपट मंडळाकडे पाठवण्यात आला आहे. पण सध्या मंडळाने सगळ्याच चित्रपटांचे परिनिरीक्षण नियमानुसारच करण्याचा पवित्रा घेतल्याने ‘देवा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतही गोंधळ निर्माण झाला असल्याचे चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले. हा चित्रपट मंडळाच्या सदस्यांना कधी दाखवणार, प्रमाणपत्र कधी मिळणार, याबद्दल मंडळाकडून कुठलीही माहिती देण्यात येत नसल्याने चित्रपटाचे प्रसिद्धी कार्यक्रमही ठप्प झाले आहेत.