देशाच्या शिक्षणव्यवस्थेतील गुन्ह्यांवर भाष्य करणारा चित्रपट अभिनेता इमरान हाश्मी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘चीट इंडिया’ असे या चित्रपटाचे नाव असून इमरान त्याचा सहनिर्माता आहे. ‘गुलाब गँग’चे दिग्दर्शक सौमिक सेन इमरानच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

सहनिर्मात्यांसोबतचा फोटो पोस्ट करत इमरानने इन्स्टाग्रामवर चित्रपटाची घोषणा केली. ‘गेल्या काही दिवसांत मी वाचलेल्या पटकथांपैकी ‘चीट इंडिया’ची पटकथा दमदार आहे. यामध्ये मी साकारत असलेली भूमिका माझ्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट असेल,’ असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले. त्याचबरोबर पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही त्याने सांगितले.

वाचा : भविष्यात हिनाचे तोंड पाहण्याची माझी इच्छा नाही- शिल्पा शिंदे

चित्रपटासंदर्भात दिग्दर्शक सौमिक सेन म्हणाले की, ‘सध्याच्या स्पर्धात्मक परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तणावाखाली असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि भारतीय तरुणांसाठी हा चित्रपट आहे.’ इमरान हाश्मी फिल्म्स, टी सीरिज, आणि एलिप्सिस एंटरटेन्मेंट निर्मित ‘चीट इंडिया’मध्ये इमरानसोबतच आणखी कोणाच्या महत्त्वाच्या भूमिका असतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.