अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेमुळे अन्यायाला वाचा फुटत असून इंडस्ट्रीतील धक्कादायक नावं समोर येत आहेत. गायक कैलाश खेर, आलोक नाथ, अभिनेता रजत कपूर, दिग्दर्शक साजिद खान, सुभाष घई यांच्यावरही लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप झाले. बॉलिवूडमध्ये सुरु झालेल्या या #MeToo च्या वादळामुळे सगळेच सावध झाले आहेत. भविष्यात आपल्यावरही असे काही आरोप होऊ नये यासाठी अभिनेता इम्रान हाश्मीने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

निर्मात्यांसोबत चित्रपटाचा करार करताना इतर नियमांसोबतच लैंगिक शोषणाला आळा घालणाऱ्या नियमांचा समावेश करण्याचं इम्राननं ठरवलं आहे. याविषयी वकिलांशी चर्चादेखील सुरु असल्याचं त्याने सांगितलं आहे. अनेक क्षेत्रातील कंपन्यांच्या कंत्राटात हे नियम असतात. परंतु आतापर्यंत एकाही चित्रपट निर्माती कंपनीने याची अंमलबजावणी केली नाही. #MeToo मोहिमेमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता ही नियमावली करणं काळाची गरज असल्याचं इम्रानने म्हटलं.

वाचा : नागराजच्या ‘नाळ’चा टीझर आहे या हॉलिवूडपटातील दृश्याची कॉपी?

इतर कलाकार या नियमाविषयी विचार करो किंवा न करो पण किमान माझ्या कंपनीत पुरुष आणि महिला कलाकारांच्या हिताच्या दृष्टीने हे नियम असतील असंही तो म्हणाला. इम्रानच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.