इंजीनिअर किंवा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा थप्पा मिळवण्यासाठी जो काही गैरकारभार चालतो, कशाप्रकारे डमी विद्यार्थांना परीक्षेसाठी बसवलं जातं, हे सगळं आगामी ‘चीट इंडिया’ या चित्रपटातून समोर येणार आहे. देशाच्या शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचारावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात इमरान हाश्मी मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर इमरानच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.

‘उपरवाला दुआ कबूल करता है, मै सिर्फ कॅश लेता हूँ’,’ असं म्हणणारा इमरान परीक्षांमध्ये डमी विद्यार्थ्यांना बसवून श्रीमंत मुलांकडून पैसे उकळत असतो. श्रीमंत मुलांकडून पैसे घेऊन काही गरीब गरजू विद्यार्थ्यांचे खिसे भरले तर मी काय चुकीचं केलं, असाही प्रश्न तो विचारतो. इमरान या चित्रपटाचा सहनिर्माता असून ‘गुलाब गँग’चे दिग्दर्शक सौमिक सेन यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

वाचा : वाळूशिल्पातून कपिल-गिन्नीला लग्नाच्या शुभेच्छा

चित्रपटासंदर्भात दिग्दर्शक सौमिक सेन म्हणाले की, ‘सध्याच्या स्पर्धात्मक परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तणावाखाली असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि भारतीय तरुणांसाठी हा चित्रपट आहे.’ इमरान हाश्मी फिल्म्स, टी सीरिज, आणि एलिप्सिस एंटरटेन्मेंट निर्मित ‘चीट इंडिया’ हा चित्रपट पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.