सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडला विश्वविजयाचा मान मिळाला आहे. तर न्यूझीलंडला वर्ल्डकप स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. या रंजक सामन्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सर्वच स्तरातून इंग्लंडवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर न्यूझीलंडच्या खेळाचं विशेष कौतुक केलं जात आहे. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा मागे नाहीत.

करण जोहरपासून, अनुराग कश्यप, वरुण धवन, रितेश देशमुख अशा बऱ्याच सेलिब्रिटींनी ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावांचं आव्हान दिलं होतं. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करत इंग्लंडचा डाव २४१ धावांवर संपुष्टात आणला होता. सामना टाय झाल्याने वर्ल्डकप फायनलमध्ये पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळविण्यात आली. इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये १५ धावा केल्या. विशेष म्हणजे प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही सुपर ओव्हरमध्ये १५ धावा केल्या. त्यामुळे आयसीसीच्या नियमांनुसार अखेर इंग्लंडला सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या मुद्द्यावर विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे अगदी पैसा वसूल सामना रंगल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

‘माझं संपूर्ण कुटुंब सामना पाहण्यासाठी जागं होतं,’ असं वरुण धवनने म्हटलं. तर इंग्लंडची कुंडली आणि न्यूझीलंडचा खेळ भारी होता, असं ट्विट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने केलं. दुसरीकडे अनुराग कश्यपने क्रिकेटच्या नियमांबाबत ट्विट केलं. ‘मूर्खासारख्या नियमांमुळे इंग्लंड विजयी ठरला पण न्यूझीलंड खरा विजेता आहे,’ असं तो म्हणाला.