|| पंकज भोसले

एखाद्या सिनेमाचा फॉर्म्युला यशस्वी झाला की त्याच्या अनुकरणाचा फायदा करून घ्यायची जशी लाट येते, तशीच त्या फॉर्म्युल्याशी टोकाची फारकत घेऊन वेगळे ठसविण्यासाठीचे प्रयत्नही जोमात होतात.

दशकभरापूर्वी ‘हँगओव्हर’ नावाचा एक विनोदी चित्रपट हॉलीवूडमध्ये दाखल झाला होता. लग्नाळू मित्राला त्याच्या एकटेपणाच्या शेवटच्या दिवशी गाठून होणारी तीन-चार मित्रांची अंदाधूंद मद्यपार्टी आणि त्यानंतरचा गोंधळ निस्तरताना तयार होणारी अवघड परिस्थिती यांच्यावर तिरकस शैलीत तयार केलेला विनोद फारच गाजला. हॉलीवूडच्या आधीच्या बऱ्याच धोपट विनोदाच्या संकल्पनांना मोडणाऱ्या या सिनेमाचे ‘बॅचलरेट’ नावाचे स्त्रीवादी रुपडेही लगेच या फॉर्म्युल्याला वापरणाऱ्या लाटेमध्ये लोकप्रिय झाले. बॅचलरेटनंतर स्त्रियांच्या एकत्र भटकंतीच्या सिनेमांचे जोमदार पीक आले. (आपल्याकडेही दिल चाहता है चित्रपटाचे स्त्रीवादी रुपडे आले नाही. पण पॅन नलिन या दिग्दर्शकाच्या अँग्री यंग गॉडेसेसने उशिरा का होईना, पण भारतीय स्त्री स्वातंत्र्य संकल्पनांतील आजचा गोंधळ स्पष्ट केला.) ‘फन मॉम डिनर’, ‘गर्ल्स नाईट आऊट’ ही त्यातली अलीकडची काही उल्लेखनीय नावे.

या चित्रपटांच्या कथानकाचा लसावि काढला तर पुरुषामुळे, लग्नामुळे किंवा कुटुंब- मुलांमुळे स्वत:च्या जगण्याकडे कसे दुर्लक्ष झाले याचा पुनरुच्चार करणाऱ्या व्यक्तिरेखांची गर्दी असते. आयुष्य चांगले जगायचे कसे राहिले याची गोळाबेरीज करीत दोन-तीन दिवसांच्या मुक्तसंचारी पिकनीक, पार्टीत स्वैरोत्तम जगण्याचा कळस गाठणाऱ्या या स्त्रीया आपण स्त्री म्हणून जन्माला आल्याचा एखादा हुंदका अन् नंतर साऱ्या पुरुष जातीचा तिटकारा व्यक्त करतात. मग घटना अशा वळणांनी घडतात की चित्रपटाच्या शेवटी त्या व्यक्तिरेखांना आयुष्याच्या खऱ्याखुऱ्या तत्त्वज्ञानाचा वगैरे साक्षात्कार होतो.

गेल्या आठवडय़ात नेटफ्लिक्सने रिलीज केलेला एमी पोलर दिग्दर्शित ‘वाईन कण्ट्री’ आधी दाखला दिलेल्या स्त्रीपटांच्या रुजलेल्या फॉर्म्युल्याशी पूर्णपणे फारकत घेणारा विनोदी चित्रपट आहे. इथे पुरुषांविषयी तिरस्कार, आयुष्य कुटुंबात-कष्टांत अडकल्याबद्दलच्या हुंदक्यांचा फुंदका नाही किंवा चित्रपटाचा शेवट गाठेस्तोवर व्यक्तिरेखांना (अन् प्रेक्षकांनाही) मिळणारे तत्त्वज्ञानी बाळकडूही नाही.

‘अमेरिकेत सॅटरडे नाईट लाइव्ह’ मालिकेसाठी टिपेचे हास्यतुकडे लिहिणाऱ्या अन् रूढार्थानेही तगडय़ा असलेल्या लेखिकांचा ताफा एमी पोलर हिने यात व्यक्तिरेखा म्हणून वापरला आहे. विनोदकारणी अभिनेत्री म्हणून अ‍ॅमी पोलर हिचे नाव जितके मालिकांमधून लोकप्रिय आहे, तेवढेच माया रुडॉफ, रेचल ड्रॅच, अ‍ॅना गॅस्टेयर, पॉला पेल, एमिली स्पिव्ही, टीना फे यांचा टीव्ही शोज आणि चित्रपटांमध्ये फक्त तिरकस विनोदासाठी दबदबा आहे.  या साऱ्या पन्नाशीकडे झुकल्यामुळे शरीराच्या बरण्या झालेल्या तरण्या त्यांच्यातील एका मैत्रिणीचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आठवडय़ाच्या अखेरीस ‘नापा व्हॅली’त दाखल होतात. त्यांच्या तेथल्या दोनेक दिवसांच्या वास्तव्यकाळातील अ-रंजक घटना आणि त्यातून त्यांच्या विनोदाला आलेली धार असा सगळा फार अनियंत्रित आणि अकल्पित वळणांवरून चालणारा हा सिनेमा आहे.

चित्रपटाला कथा आहे ती अगदीच त्रोटक. जिवाभावाच्या वगैरे म्हणता येणार नाहीत, तरी एका पिझ्झा पार्लरमध्ये तीस वर्षांपूर्वी वेट्रेस म्हणून काम करून पुढे आपल्या करियच्या वेगवेगळ्या दिशा त्यांनी निवडल्या आहेत. वकुबानुसार ठिकठिकाणी योग्य पदांवर आरूढ असलेल्या या व्यक्तिरेखा आपल्या पिझ्झा पार्लरमधील आठवणींसह मैत्रीही घट्ट टिकवून आहेत. यातील अ‍ॅबी (पोलर) आपल्या या मैत्रिणींना नापा व्हॅलीमध्ये नेण्याची योजना आखते. एकीच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले आहे, दुसरीच्या आजाराच्या चाचण्या झाल्या आहेत, तिसरी चार मुलांच्या संगोपनामध्ये रमली आहे, तर चौथी नवऱ्याशी असलेल्या संबंधांची वीण क्षीण होत चालल्याच्या अवस्थेत आहे. पाचवी टीव्ही सिरीयलचे प्लॉट लिहिण्यात आणि लिहिलेले संवाद फोनवरून सुधारून घेण्यात गुंतलेली आहे. घटस्फोटिता असलेल्या अ‍ॅबीच्या सांगण्यानुसार इतर पाचही जणी नापा व्हॅलीत दाखल होतात. तिने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार त्यांच्या सुट्टीकालीन मौजमजेला आरंभ होतो. यात कोणत्याही धाडसी घटना घडत नाहीत. त्या हॉटेलात जातात. तेथे आपल्या पिझ्झा पार्लरमध्ये सातत्याने केले जाणारे समूहगान गातात. त्या व्हॅलीमध्ये फिरतात. वाईन्सच्या चवीवर चर्चा करतात. त्यानंतर एकमेकांशी गप्पा मारतात. रिबेकाच्या वाढदिवसानिमित्ताने एकत्र येण्यातून मिळणाऱ्या आनंदाबद्दल बोलतात. आर्ट शोजमध्ये फिरतात. आफाट पैसे देऊन कार्डद्वारे प्रत्येकीचे अंधकारमय असलेले भविष्य जाणून घेतात. वाईन पिऊन गमती करतात. अन् या प्रत्येक क्रियांमध्ये उस्फूर्त विनोदाच्या जागा शोधून काढतात. उदा. इथे दोघींच्या एका संवादामध्ये नाचायसाठी कोणती गाणी लावायची याची चर्चा सुरू असताना एकजात साऱ्या लोकप्रिय आणि चित्रपटांमध्ये वापरून गंजलेल्या गाण्यांना बाद ठरविले जाते. एका प्रसंगी अमली पदार्थ घेऊन आलेल्या मैत्रिणीचा विचार इतर पाचही जणी गमतीशीररीत्या थोपवून टाकत पुढल्या होऊ शकणाऱ्या गोंधळाला बाद करतात.

स्त्रीवाद छोटासा तुकडाही न आणता इथली गंमत अखंड सुरू राहते. या महिलांना मदतनीस म्हणून काम करणारा डेव्हन (जेसन श्वार्ट्झमन) याला अंमळही विनोदी कलाबाजी सादर करू न देण्याचा इथला प्रकार आणखी हसविणारा आहे. या सगळ्याच विनोदकारणींचे एकत्र असणे या चित्रपटाचे वेगळेपण स्पष्ट करणारे आहे. सदोदित तरण्या मनांच्या या बरण्यांचे विनोदातील डोंगराएवढे काम परिचित असेल, तर चित्रपटाचा आस्वाद आणखी वाढू शकेल. अन् त्याविषयी काहीच माहिती नसली, तरी विनोदाचा खूप वेगळा प्रकार म्हणून हा सिनेमा निराश करणार नाही.