X

‘गुण्यागोविंदाने’

व्यावसायिक रंगभूमीवर सादर होणाऱ्या कलाकृती या व्यावसायिकदृष्टय़ा किमान दर्जाच्या असणं अध्याहृत असतं

व्यावसायिक रंगभूमीवर सादर होणाऱ्या कलाकृती या व्यावसायिकदृष्टय़ा किमान दर्जाच्या असणं अध्याहृत असतं. तिथं प्रयोगशीलता असू नये असं अजिबात नाही. ती असायलाच हवी. परंतु ती निव्वळ हौसेच्या पातळीवर राहता नये. चंद्रलेखा निर्मित, महेंद्र तुकाराम कदम लिखित-दिग्दर्शित ‘गुण्यागोविंदाने’ या नाटकात नाटककर्त्यांला काहीतरी म्हणायचं आहे नक्की; परंतु ते कसं मांडावं याबद्दल पुरेसा अनुभव नसल्यानं म्हणा, वा व्यावसायिक रंगभूमीच्या अवकाशाचा अदमास न आल्यानं म्हणा, हा प्रयोग हौशी पातळीवरच सीमित राहिला आहे.
मालती-अतुल या जोडप्याच्या मुलाला शाळेतील त्याच्या एका मित्राने मारहाण केल्याने त्याचे दोन दात तुटले आहेत. ही गोष्ट त्याच्या पालकांच्या कानावर घालावी आणि त्यांच्याकरवी त्या मुलाला समज देऊन भांडण मिटवावं म्हणून ते मधुरा व सुनीलला आपल्या घरी बोलावतात. मालती समजूतदारपणे त्यांना घडल्या गोष्टीची जाणीव करून देते आणि त्यांच्या मुलानं आपल्या मुलाची माफी मागावी अशी मागणी करते. सुनील वकील असल्याने या प्रकारात समोरच्या मुलाचाही काहीतरी गुन्हा असणार, त्याशिवाय आपल्या मुलानं त्याला मारलेलं नाही, अशी भूमिका घेतो. मधुराही त्याच्या या युक्तिवादास दुजोरा देते. अतुलला खरं म्हणजे मुलांच्या भांडणात पालकांनी पडणं फारसं पसंत नसतं. परंतु बायकोच्या हट्टाखातर तो तिथं हजर असतो, इतकंच. मारूनच्या मारून वर आपल्याच मुलाला दोषी ठरवण्याच्या सुनील-मधुराच्या इराद्याने मालती भडकते. अतुल तिला शांत करू पाहतो. परंतु तिचा हेका कायम असतो, की त्यांच्या मुलानं माझ्या मुलाची माफी मागायलाच हवी. मुलांवरील सुसंस्काराचा हा प्रश्न आहे! सुनील-मधुराला आपला मुलगा किती आडमुठा आहे हे ठाऊक असल्यानं झाल्या प्रकाराबद्दल तो माफी मागेल हे संभवच नसतं. त्यामुळे ते मालतीचा आग्रह टाळू बघतात. परंतु मालती आपल्या म्हणण्यावर ठाम असते.
हा तिढा मग वाढतच जातो. त्यांच्यातील शांततामय तोडगा काढण्याच्या चर्चेचं गुऱ्हाळ मारूतीच्या शेपटासारखं वाढतच जातं. नवनवे मुद्दे चर्चेला फाटे फोडत जातात. एकमेकांवर हेत्वारोप करण्यापासून परस्परांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यापर्यंत मजल जाते. त्यांतून चौघांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि व्यक्तिगत आयुष्यावरही प्रकाश पडत जातो. एक दारुण समाजवास्तव त्यातून समोर येऊ पाहतं.
लेखक-दिग्दर्शक महेंद्र तुकाराम कदम यांना या नाटकातून जे मांडायचं आहे त्याबद्दल ते स्वत:च स्पष्ट नसल्यानं प्रयोग रडत-रखडत पुढं सरकतो. इतका, की त्या फाफटपसाऱ्याचा उद्वेग यावा. प्रथमार्धातलं निर्थक चर्चेचं गुऱ्हाळ इतकं सपक आणि पुनरावृत्त आहे, की नाटककर्त्यांला नेमकं म्हणायचंय तरी काय, असा प्रश्न पडतो. या रटाळ अंकाचं मध्यांतर झाल्याचंही नीटसं आकळत नाही. पुढच्या अंकात आणखीन काय वाढून ठेवलंय, अशा प्रश्नचिन्हांकित चेहऱ्यानं प्रेक्षक खुर्चीत स्थिरावतात. परंतु दुसरा अंकही ‘पहिले पाढे पंचावन्न’च्याच मार्गे पुढं सरकत जातो. मात्र, या अंकात दोन्ही जोडप्यांच्या आपापसातील विसंवाद उघड होत असल्यानं तो काहीसा सह्य़ होतो, इतकंच. नाटककर्त्यांला वर्तमान समाजवास्तवाकडे याद्वारे निर्देश करावयाचा आहे, हे त्यातून थोडंफार उमगतं. तथापि ते ज्या रीतीनं नाटकात मांडलं गेलं आहे, ते असह्य़ आहे. एक गणेश रेवडेकर वगळता यातले अन्य कलाकार व्यावसायिक रंगभूमीशी अपरिचित असल्यानं त्यांच्या कामांत व्यावसायिक सफाई दिसत नाही. (म्हणजे ते प्रामाणिकपणे काम करत नाहीत असं बिलकूल नाही. त्यांचा अनुभव तोकडा पडतो.) दिग्दर्शनाबद्दलही तेच म्हणावं लागेल. व्यावसायिक रंगभूमीचा अवकाश आणि त्यावर सादर करावयाचा प्रयोग याबद्दलची पुरेशी जाण त्यांना नसावी. परिणामी मामला हौसेच्या पातळीवरच सीमित राहतो. व्यावसायिक रंगभूमीचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या निर्माते प्रशांत दामले यांनी तरी त्याची जाणीव त्यांना करून द्यायला हवी होती. त्यांनाही नाटकातील त्रुटी व दोष ध्यानी आले नाहीत याचं सखेद आश्चर्य वाटतं. तांत्रिक बाबींतही ‘चलता है’ वृत्ती जाणवते.
मालतीच्या भूमिकेतील दिशा दानडे यांनी ‘गटणे’छाप कथित सुसंस्कृत, सुसंस्कारित गृहिणीचं अर्कचित्र आपल्या परीनं वठवायचा प्रयत्न केला आहे. गणेश रेवडेकर यांनी कोंडमारा झालेला अतुल त्याच्या घुसमटीसह नेमकेपणी व्यक्त केला आहे. नंतरचा त्यांचा विस्फोटही लक्षवेधी. सुवर्णा काळेंची मधुरा मात्र कच्ची आहे. रंगमंचावरील कलाकारांशी क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रतिक्षिप्त क्रियांची जी देवाणघेवाण आवस्यक असते, त्यात त्या खूपच कमी पडतात. किंबहुना त्यांना याची जाणीव आहे की नाही, असा प्रश्न पडतो. संचित वर्तक यांनी सुनीलचं सैराट व्यक्तिमत्व, मधेच उसळणारा वकिली खाक्या, बेफिकीरी, स्वकेंद्रितता यांचा आलेख बऱ्यापैकी दाखवला आहे. तथापि कुठल्याही प्रसंगाला टोक येण्याआधीच त्यातली हवा फुस्सकन् जाते. याचं कारण छोटय़ा छोटय़ा संवादांच्या चकमकी म्हणजे नाटक नव्हे, याची जाण दिग्दर्शकालाही नाहीए. प्रसंग फुलवत नेत, त्यांची पुढील घटनांशी सांगड घालत, त्यात आपलं म्हणणं मांडत नाटक आकारास यायला हवं. इथं तसं काहीच घडत नाही. परिणामी नाटक पार सपक झालं आहे. कुठल्याही प्रसंगात ते खिळवून ठेवत नाही. त्यामुळे हा हौसेचा मामला कितीही सहन करायचं म्हटलं तरी सहनशक्तीचाही अंत पाहतो.

20
READ IN APP
X