अनेक चित्रपटांचे चित्रीकरण स्वीत्र्झलड येथे करणाऱ्या यश चोप्रा यांच्या सन्मानार्थ स्वीत्र्झलड सरकारने कुरसाल गार्डन येथे त्यांचा पुतळा उभारला आहे. यश चोप्रा हे बॉलीवूडच्या प्रेमपटांचे बादशाह म्हणून ओळखले जात होते. अभिनेता रणवीर सिंग याने नुकतीच कुरसाल गार्डन येथील यश चोप्रा यांच्या पुतळ्याला भेट देऊन आदरांजली वाहिली.
यशराज फिल्मच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून रणवीरने हिंदी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. आपले करिअर घडविण्यात आणि पहिली संधी देण्यात यश चोप्रा आणि यशराज फिल्मचे मोठे योगदान असल्याचे रणवीरचे म्हणणे आहे.

‘अस्तित्व’ संस्थेतर्फे एकांकिका स्पर्धा
मुंबई, : ‘अस्तित्व’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘कल्पना एक- आविष्कार अनेक’ एकांकिका स्पर्धेसाठी यंदा लेखिका मेघना पेठे यांनी ‘जब जागो तब सवेरा..’ हा विषय सुचविला आहे. या विषयाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारी एकांकिका या स्पर्धेत स्पर्धकांनी सादर करावयाची आहे. ‘अस्तित्व’ आयोजित कै. मु. ब. यंदे पुरस्कृत ‘कल्पना एक..’ या स्पर्धेला यंदा अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे भक्कम पाठबळ लाभले आहे. रंगभूमीच्या अभिवृद्धीसाठी या स्पर्धेचे संयुक्त आयोजन करण्याचे उभय संस्थांनी ठरविले आहे.
खुल्या गटात होणाऱ्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार, ९ ऑक्टोबर रोजी, तर अंतिम फेरी माटुंगा येथील नाटय़ परिषदेच्या यशवंतराव चव्हाण संकुलात शनिवार, १५ ऑक्टोबरला संपन्न होणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज http://www.astitva.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १ ऑक्टोबर ही आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- रवी मिश्रा- ९८२१०४४८६२.

नाटकात गाणे
पुष्पराजन नायरनिर्मित आणि संचित वर्तक लिखित व दिग्दर्शित ‘टु बी कंटिन्युड’ या नाटकात एक गाणे असून त्याचे संगीत विशाल बोरुलकर यांचे आहे. हे गाणे हृषीकेश कामेरकर व डॉ. नेहा राजपाल यांनी गायले आहे. या नाटकात नयन जाधव, सीमा घोगळे-पारकर, मधु शिंदे, दर्शन बंगे, गौरी महाजन, समीर पेणकर हे कलाकार आहेत. पती-पत्नीमधील कौटुंबिक नातेसंबंध, त्यांच्यातील हरवलेला संवाद यातून निर्माण होणारे समज-गैरसमज आणि त्यावरील उपाय म्हणजे दोघांमधील सुसंवाद हा विषय या नाटकात मांडण्यात आला आहे.

‘झी टॉकीज’वर ‘नटसम्राट’
‘नटसम्राट- असा नट होणे नाही’ हा चित्रपट २१ ऑगस्ट रोजी ‘झी टॉकीज’ वाहिनीवरून प्रसारित केला जाणार आहे. हा चित्रपट दुपारी १२ आणि संध्याकाळी ६.३० वाजता दाखविला जाणार आहे. नाना पाटेकर, विक्रम गोखले, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, नेहा पेंडसे आदी कलाकार या चित्रपटात आहेत.

‘तू जिथे मी तिथे’ नवे प्रेमगीत
‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ आणि नेहा राजपाल प्रॉडक्शनच्या ‘फोटोकॉपी’ या आगामी चित्रपटात ‘तू जिथे मी तिथे’ हे आणखी एक नवे प्रेमगीत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पर्ण पेठे व चेतन चिटणीस या जोडीवर चित्रित झालेले हे गाणे स्वप्निल बांदोडकर व नेहा राजपाल यांनी गायले आहे. अश्विनी शेंडे यांनी लिहिलेले हे गाणे निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केले आहे.

‘बंधमुक्त’ नाटकाचा प्रीमिअर
जगदंब क्रिएशन निर्मित व ‘तिरकिटधा’ प्रस्तुत ‘बंधमुक्त’ या नाटकाचा प्रीमिअर नुकताच रवींद्र नाटय़मंदिर येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. विवेक आपटे लिखित आणि डॉ. अनिल बांदिवडेकर दिग्दर्शित हे नाटक ‘इच्छामरण’ या विषयावर आहे. प्रत्येक प्रयोगाला उपस्थित प्रेक्षकांची मते जाणून घेऊन नाटकाचा उत्तरार्ध निश्चित केला जाणार आहे. मराठी नाटकाचा प्रीमिअर रंगभूमीवर पहिल्यांदाच झाला. या प्रयोगाला चित्रपट, नाटक, साहित्य, राजकारण, वैद्यकीय, उद्योग आदी क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.