||तेजश्री गायकवाड

आपल्या दैनंदिन व्यवहारांवर मनोरंजन विश्वाचा मोठा प्रभाव पडत असतो. दिवसभराच्या कामानंतर विश्रांती म्हणून आपण टीव्हीची हमखास मदत घेतो. मात्र केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने लावलेल्या या टीव्हीवरच्या सकाळ-संध्याकाळच्या मालिका आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग कधी होतात हेच आपल्या लक्षात येत नाही. या मालिकांच्या कथा, त्यातली पात्रं, कलाकार हे आपल्या घरातलेच झालेले असतात. आपण प्रत्येक गोष्टीत त्यांचे अनुकरण करू लागतो. एखादं पात्रं उभं करताना त्याच्या नावापासून ते त्याची भाषा, मेकअप, कपडे एकंदरीत संपूर्ण लूक याकडे आपण बारकाईने लक्ष देतो. आणि अशातूनच एखाद्या पात्राची खास फॅशन तयार होते, ट्रेण्डमध्ये येते. यात ड्रेसेस, साडय़ा, दागिने, मंगळसूत्र यापलीकडे टिकून राहिलेली गोष्ट म्हणजे नायिकांच्या कपाळावरची टिकली!

आपण वर्षांनुवर्षे ज्या मालिका बघतो आहोत, त्यात प्रत्येक मालिकेमध्ये साधारण नायक-नायिका, तिचे सासू-सासरे, भाऊ बहीण आणि एखादा खलनायक किंवा खलनायिका असतेच. या पात्रांचा मेकअप करताना एका ठरावीक पद्धतीनेच मेकअप केला जातो. अनेकदा या मेकअपवरून संबंधित व्यक्तिरेखा चांगली की वाईट हे सहज ओळखता येतं. त्यासाठी मेकपअपच्या बाबतीत काही ठोकताळे असतात. खरंतर आपल्याकडच्या मालिका या नायिकाप्रधान असल्याने स्त्री व्यक्तिरेखांचा लूक, फॅ शन यावर प्रचंड मेहनत घेतली जाते. तिचं नायिका किंवा खलनायिका असणं हे अनेकदा तिच्या पेहरावातून, व्यक्तिमत्त्वातून ठसवण्याचा प्रयत्न केला जातो. एकंदरीतच आपल्याकडील नायिकेच्या लूकवर नजर टाकली तर प्रामुख्याने नजरेत भरते ती तिच्या कपाळावरची टिकली. या टिकलीने फार काय परक पडतो, असा प्रश्न सहज मनात येऊ शकतो. मात्र मालिकांच्या बाबतीत केवळ टिकलीवरून तुमच्यासमोरची स्त्री ही नायिका आहे की खलनायिका हे प्रेक्षक सहज सांगू शकतात. व्यक्तिरेखेनुसार टिकली निवडली जाते, असे म्हणण्यापेक्षा टिकलीच्या स्वरूपानुसार व्यक्तिरेखा ठरते असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

बारीकशी  खडय़ाची किंवा काळ्या रंगाची टिकली ही हमखास लग्नाचं वय झालेल्या मुलीच्या पात्रासाठी मालिकेत वापरली जाते. तुम्हाला नुकतीच संपलेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका आठवतेय? त्यातल्या इशा निमकर ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या गायत्री दातारला लग्नाच्या आधी बारीकशी काळी रंगाची टिकली लावलेली दाखवली होती. लग्नानंतर त्या टिकलीमध्ये बदल करण्यात आला. अशी अनेक उदाहरणे हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषिक मालिकांमध्ये दिसतील. अशीच छोटीशी लहानशी खडय़ांची टिकली एखाद्या नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी किंवा घरातल्या लहान सुनेच्या पात्रासाठी आवर्जून वापरली जाते. तरुण मुलगी आणि लहान सुनेनंतर महत्त्वाचं पात्र असतं ते म्हणजे घरातली मोठी सून. ही सून अनेक वेळा एकदम सोशिक, समजूतदार आणि सुशील अशीच दाखवलेली असते. या अशा मोठय़ा सुनेसाठी लाल रंगाची छोटी आणि त्यावर थोडेसे खडे असलेली टिकली किंवा चंद्रकोर दाखवली जाते. मोठय़ा सुनेच्या व्यक्तिरेखेप्रमाणे यात थोडेफार बदल होतात. अनेकदा नुसत्या लाल रंगाच्या टिकलीमध्ये तुम्हाला एकदम गरीब घरातली शांत स्वभावाची सून नक्कीच दिसेल.

सासूच्या व्यक्तिरेखेसाठी तर हिंदी आणि मराठी दोन्हीकडे टिकलीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डेली सोप या सासूविना पूर्णच होऊ  शकत नाहीत. काही वेळा सासू ही फार गोड दाखवलेली असते तर कधी कधी अगदीच खडूस स्वभावाची. एकदम प्रेमळ स्वभावाच्या सासूच्या पात्राला नेहमी मध्यम आकाराची काळी किंवा लाल टिकली तुम्हाला दिसेल. तर एकदम खडूस सासूच्या कपाळावर मोठी लांब अशी टिकली लावलेली दिसते. सासूच जर खलनायिकेच्या भूमिकेत असेल तर गोष्ट आणखीनच वेगळी. इथे एकता कपूरच्या ‘कहीं किसी रोज’ या मालिकेतील रमोला सिकंद या व्यक्तिरेखेला कसं विसरता येईल. भुवयांपासून ते वर कपाळापर्यंत मोठीच्या मोठी कधी खडय़ांची, कधी सरळ रेषा ओढलेली अशा विचित्र, मोठय़ा टिकल्या खरं म्हणजे रमोला या व्यक्तिरेखेने लोकप्रिय केल्या होत्या. प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी ही रमोलाची भूमिका साकारली होती. या सगळ्या पात्रानंतर येते ती मालिकेमधली खलनायिका. खलनायिकेवर नेहमीच मालिकेतून विशेष मेहनत घेतली जाते हे दिसून येईल. नायक-नायिकेपेक्षाही खलनायिका ठसणं महत्त्वाचं असतं. तिचं महात्म्य वाढलं नाही तर मालिकेतील नाटय़ सपक होतं. त्यामुळे खलनायिकेचे कपडे, तिचा वावर जसा हटके असतो तसंच त्यांच्या कपाळावरच्या टिकल्याही हटके असतात. या पात्रांसाठी खास मोठय़ा डायमंडच्या वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्या डिझाइन केलेल्या असतात. तर कधी गंधाने वेगवेगळी डिझाइन्स टिकलीच्या जागी काढल्या जातात. याचं उत्तम उदाहरण एकता कपूरच्या नव्या आणि जुन्या ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील खलनायिका कोमोलिका. जुन्या कोमोलिकाच्या कपाळावर खडे असलेली मोठय़ा आकाराची टिकली असायची तर आताच्या कोमोलिकाच्या कपाळावर तुम्हाला गंधाने डिझाइन केलेली  टिकली दिसेल. मालिकेमधील भूमिकेनुसारही कधी कधी खास टिकल्या डिझाइन केल्या जाता. ‘नागीण’सारख्या मालिकेसाठी सापाच्या आकाराची टिकली फार ट्रेण्डमध्ये आलेली आहे. किंवा सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर पौराणिक, ऐतिहासिक मालिकांना उधाण आलं आहे. पौराणिक मालिकांमध्ये त्या त्या देवी-देवतांच्या कथांनुसार टिकली डिझाइन केलेली दिसते. ‘लक्ष्मी नारायण’ असो वा झी मराठी वाहिनीवर दीर्घकाळ चाललेली ‘जय मल्हार’ ही मालिका असो. यात तर बानू आणि म्हाळसा दोघींसाठी वेगळ्या प्रकारचे गंध कपाळावर रेखाटण्यात आले होते. बानूसाठी गोल, पिवळे गंध आणि त्यात लाल रंगाचा ठिपका दिला गेला होता. तर म्हाळसेला आडवे गंध आणि त्यात गोल लाल रंगाचा गंध रेखाटण्यात आला होता. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतील जिजाऊंच्या कपाळावरची मोठी पसरट चंद्रकोरही तशीच लक्ष वेधून घेते. ‘बाळूमामा’ मालिकेत धनगर समाजाच्या स्त्रिया म्हणून त्यांच्या कपाळावर रेखाटलेलं ठसठशीत गोल लाल रंगाचं कुं कू आणि त्यातूनच जाणारी कुंकवाची सरळ रेष हाही वेगळा प्रकार बघायला मिळतो.

जितक्या गोष्टी, तितक्या व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव आणि त्यानुसार रेखाटली जाणारी टिकली किंवा चमकणारी बिंदिया हा पिढ्यान्पिढय़ा स्त्रियांसाठी औत्सुक्याचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे मालिकेतील नायिका आणि खलनायिका यांच्या लूकमध्येही पहिल्यांदा चमकते ती ही टिकली किंवा बिंदियाच.!