News Flash

ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी दाखवली जातेय; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

"ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भातील नियम नुकतेच जारी करण्यात आलेत. या प्रकरणामधील..."

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: अल्ट बालाजी आणि झी फाइव्हवरुन साभार)

सर्वोच्च न्यायालयाने ओटीटी म्हणजेच ‘ओव्हर द टॉप’ प्लॅटफॉर्म्सवर दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी दाखवली जात आहे. ओटीटीवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचंही स्क्रीनिंग होणं गरजेचे आहे,” असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालय ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात केंद्र सरकारने तयार केलेली नियमावली पाहणार आहे. त्यानंतर न्यायालय पुढील सुनावणी शुक्रवारी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅमेझॉन प्राईमच्या अपर्णा पुरोहित यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटसंदर्भात चिंता व्यक्त करणारं वक्तव्य केलं आहे. अ‍ॅमेझॉन प्राईमवरील ‘तांडव’ या वेब सीरीजमुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अपर्णा पुरोहित यांच्यासहीत अनेक कलाकार आणि निर्देशकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने अपर्णा पुरोहित यांची अटकपूर्व जामीनासंदर्भातील याचिका फेटाळली आहे. यानंतर अपर्णा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलीय.

अपर्णा यांच्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर आज न्यायालयामध्ये केवळ दोन मिनिटांची सुनावणी झाली. सुनावणीच्या सुरुवातीला न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचीही स्क्रीनिंग झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं. म्हणजेच ज्याप्रमाणे सेन्सॉर बोर्ड चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो पाहून त्यामधील बदल सुचवतं तसं ओटीटीवरील कंटेंटसाठीही अशाप्रकारचं प्रदर्शानापूर्वीचं स्क्रीनिंग झालं पाहिजे. हा कंटेट दाखवण्यासंदर्भातील परवानगी मिळाल्यानंतर तो दाखवण्यात आला पाहिजे असं न्यायमूर्तींना सूचित करायचं होतं.

अपर्णा पुरोहित यांच्याकडून बाजू मांडताना मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला, “ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भातील नियम नुकतेच जारी करण्यात आलेत. या प्रकरणामधील अर्जदार या केवळ अ‍ॅमेझॉनच्या एक कर्मचारी आहेत. ज्यांनी ही सीरियल बनवली आहे त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला पाहिजे. आमच्याविरोधात १० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,” अशी भूमिका मांडली. याच भूमिकेवर भाष्य करताना न्या. भूषण यांनी आजकाल ज्या गोष्टी ओटीटीवर दाखवल्या जातात त्यामध्ये कधी कधी पॉर्नोग्राफीही असते, असं मत नोंदवलं. न्या. भूषण यांनी केलेलं हे वक्तव्य तांडव या वेब सीरीजसंदर्भात नव्हतं तर ते सर्वसामान्यपणे वेब सीरीज या प्रकारासाठी होतं.

अपर्णा यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती न्यायालयाला देतानाच अद्याप नियम बनवण्यात आलेले नाही असंही स्पष्ट केलं. तसेच आम्हाला या नियमावलीची काहीही अडचण नसून ही नियमावली येण्याआधी तांडव तयार करण्यात आली होती, असंही रोहतगी म्हणाले. मात्र वेळ कमी असल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी शुक्रवारी करणार असल्याचं स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 3:30 pm

Web Title: even pornography is being shown on ott platforms some balance needed supreme court scsg 91
Next Stories
1 ‘माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा’, गौहर खानवर कोसळला दु:खाचा डोंगर
2 ‘दसवी’मध्ये अभिषेकचा थाट, गंगारामचा रुबाब तर पहा!
3 ‘स्कॅम 1992’ नंतर आता ‘स्कॅम 2003…’
Just Now!
X