20 October 2019

News Flash

पहिल्यांदाच अमेरिकेत घुमणार मराठी पॉप गाण्यांचे सूर

रंगणार अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, जुईली जोगळेकर यांच्या सुरांची मैफल

महाराष्ट्रातल्या सांगीतिक परंपरेचा ठेवा सातासमुद्रापार नेत तिथल्या मराठी जणांना अस्सल मराठी मातीतल्या गाण्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘सुरेल क्रिएशन’ व ‘३एएमबीझ’ यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेत ‘अवधूत गुप्ते- स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉनसर्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने अमेरिकेतील १२ वेगवेगळ्या शहरांत पहिल्यांदाच मराठीतील पॉप गाण्यांचे लाइव्ह सूर घुमणार आहेत.

‘पोर्टलॅण्ड’, ‘डॅलस’, ‘सॅक्रामेंटो’, ‘सेंटलुईस’ ‘वॉशिंग्टन डीसी’ ‘फिलाडेल्फीया’, ‘न्यू जर्सी’, ‘बोस्टन’, ‘सॅन होजे’, ‘क्लीव्हलॅंड’, ‘नॅशवील’,’अटलांटा’ या शहरांचा हा कार्यक्रम होणार आहे. गायक अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, जुईली जोगळेकर आदी गायक सुरांची ही मैफल रंगवणार असून त्यांच्यासोबत लाइव्ह म्युझिशियनचा ताफा त्यांना साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन मानसी इंगळे यांचे आहे.

अमेरिकेतल्या मराठी रसिकांसाठी हा एक आगळा-वेगळा शो असून मराठी सुमधुर गाण्यांचा खजिना अवधूत गुप्ते- स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉनसर्ट’ च्या निमित्ताने उलगडणार आहे. २६ एप्रिल ते १९ मे असे शुक्रवार ते रविवार सलग चार आठवडे हे शोज रंगणार आहेत. अमेरिकेतील मराठी रसिकांसाठी सुरेल संगीताची ही अनोखी मेजवानी असून आम्ही सुद्धा या शोजसाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया गायक अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, जुईली जोगळेकर यांनी दिली. वेगळं काहीतरी करण्याच्या उद्देशाने

‘अवधूत गुप्ते- स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉनसर्ट’ या खास शोज चे प्रयोजन केल्याचे दिग्दर्शिका मानसी इंगळे यांनी सांगितले.
अमोल जोशी व मीनल जोशी या शो चे युएस प्रमोटर आहेत तर ‘स्वरसुधा’ या अमेरिकेतल्या कंपनीने या विशेष शो साठी सहकार्य केले आहे. डॅलस येथील शो साठी जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स हे असोशिएट स्पॉन्सर आहेत. ‘सुरेल क्रिएशन’ च्या मानसी इंगळे यांनी या शोजच्या संयोजनाची जबाबदारी सांभाळली आहे.

First Published on April 26, 2019 4:53 pm

Web Title: event and musical concert in america