14 October 2019

News Flash

काय आहे Game of Thrones? जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे..

‘गेम ऑफ थ्रोन्स’ म्हणजे राजकीय ताकद मिळवण्यासाठी सुरू झालेला सत्तेचा खेळ होय.

‘गेम ऑफ थ्रोन्स’ म्हणजे राजकीय ताकद मिळवण्यासाठी सुरू झालेला सत्तेचा खेळ. या मालिकेच्या आठव्या सत्राचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला. मागील अनेक दिवसांपासून फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम स्टोरीज, व्हॉट्सअपवर या मालिकेची चांगलीच चर्चा सुरु होती. या मालिकेचे हे अखेरचे पर्व असल्याने अनेकांची उत्सुक्ता शिगेला पोहोचली आहे. तर दुसरीकडे अनेकांना GOT ( ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ) म्हणजे काय असा प्रश्न पडला आहे. म्हणूनच या १० मुद्द्यांच्या आधारे अगदी सोप्प्या भाषेत जाणून घेणार आहोत जगाला वेड लावणाऱ्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’बद्दल…

  • गेम ऑफ थ्रोन्स ही २०११  साली सुरु झालेली एक महामालिका आहे. जॉर्ज आर. आर. मार्टिन यांच्या ‘साँग ऑफ आइस अ‍ॅण्ड फायर’ या कादंबरीवरून या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.

 

  • ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही ‘वेस्टोरॉस’ नामक एका काल्पनिक साम्राज्याची कथा आहे. या साम्राज्याचे सर्वसाधारणपणे दोन भागांत विभाजन करता येते. उत्तरेकडे स्टार्क ऑफ विंटरफेल (रुल्स ऑफ नॉर्थ), ट्ली ऑफ रिव्हरन (रुल्स ऑफ रिव्हरलँड), अ‍ॅरेन ऑफ द एरी (रुल्स ऑफ व्हेल) आणि दक्षिणेकडे लॅनिस्टर ऑफ कॅस्टर्ली रॉक (रुल्स ऑफ द वेस्टरलँड), ब्रॅथॉन ऑफ स्टॉम्र्स एंड (रुल्स ऑफ द स्टॉर्मलँड), ट्रेल ऑफ हायगार्डन (रुल्स ऑफ द रिच), मार्टेल ऑफ सन्सस्पेअर (रुल्स ऑफ ड्रोन) या सात राज्यांची मिळून ‘वेस्टोरॉस’ या साम्राज्याची निर्मिती झाली आहे.

 

  • किंग्स लँडिंग ही या साम्राज्याची राजधानी असून वरील सात लहान राज्यांवर राज्य करणारा राजा ज्या सिंहासनावर बसतो त्याला ‘आयर्न थ्रोन’ असे म्हटले जाते. आणि या राज सिंहासनाभोवती या मालिकेचे कथानक फिरत असते.

 

  • या मालिकेच्या यशाचे प्रमुख कारण त्याची पटकथा व उत्कृष्ट दिग्दर्शन होय. ज्या प्रमाणे ‘महाभारत’ या पुराणकथेत भीष्म, कृष्ण, अर्जुन, कर्ण, द्रौपदी, अभिमन्यु, भीम यांसारख्या अनेक व्यक्तिरेखा आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेची स्वत:ची एक पार्श्वभूमी आहे. आणि त्याचा थेट परिणाम शेवटी हस्तिनापूरचे साम्राज्य मिळवण्यासाठी कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धात तो दिसून योतो. त्याचप्रमाणे ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये डॅनेरिस टारगॅरियन, जॉन स्नो, टीरियन लॅनिस्टर, सरसी लॅनिस्टर, आर्या स्टार्क यांसारखी अनेक पात्र आहेत. या प्रत्येक पात्राची स्वत:ची एक पार्श्वभूमी आहे. ही मंडळी आयर्न थ्रोनवर बसलेल्या राजाला हरवण्यासाठी सतत कुरापती करत असतात.

 

  • सध्या स्टार्क ऑफ विंटरफेल , लॅनिस्टर ऑफ कॅस्टर्ली रॉक व टारगेरिअन या तीनच घराण्यांभोवती गेम ऑफ थ्रोन्सच्या आठव्या सत्राचे कथानक फिरत आहे. लॅनिस्टर घराण्यातली सर्सी सध्या वेस्टोरॉसची राणी आहे.

 

  • या मालिकेत शेकडो पात्र आहेत. मात्र, त्यापैकी कोणीच पूर्णपणे सकारात्मक किंवा पूर्णपणे नकारात्मक भूमिकेत दाखवले गेलेले नाही. सर्व पात्रांच्या चांगल्या व वाईट दोन्ही बाजू दाखवण्यात आल्या आहेत. शिवाय यात कथानकाला पोषक असलेली हिंमत, उत्साह, अद्भुत कल्पना, युद्ध, अंधश्रद्धा, जादू व अक्राळ विक्राळ प्राणी देखील दाखवण्यात आले आहेत.

 

  • या मालिकेमध्ये इंटिमेट सीन्सचा भरणा असल्याचा आरोप करण्यात येतो. यातली अनेक पात्र एकमेकांशी, वेश्यांसोबत सेक्स करताना गप्पा मारत असतात. तसंच भाऊ-बहीण, मामा-भाचा अशा पवित्र नात्यांमध्ये देखील शारीरिक संबंध दाखवण्यात आला आहे. मात्र, हे शारीरिक संबंधच कथेचा महत्वाचा भाग आहे असे निर्मात्यांचे मत आहे.

 

  • प्रत्येक देशाला अंतर्गत वादांबरोबरच देशाबाहेरील सुलतानी संकटांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे वेस्टोरॉस या साम्राज्यालाही बाहेरील संकटांपासून धोका आहे. या संकटांना थोपवण्यासाठी उत्तरेला एक मोठी भिंत उभारण्यात आली आहे. त्याला ‘द वॉल’ असे म्हणतात. या भिंतीच्या पलीकडे राजाच्या शासनाखाली राहणे पसंत न करणारे लोक राहतात त्यांना ‘वाइल्ड लिंग्स’ असे म्हणतात. या लोकांना राज्यात येण्यापासून रोखण्यासाठी सैनिकांची विशाल फौज तैनात करण्यात आली आहे. त्यांना ‘नाइट्स वॉच’ म्हणतात.

 

  • गेम ऑफ थ्रोन्समधली कथा काल्पनिक युगात बेतलेली आहे. हे युग साधारणतः मध्ययुगाशी मिळतं-जुळतं आहे. त्या काळातल्या वस्तू, सेट उभं करणं हे मोठं आव्हान होते. त्यासाठी लागणारे कपडे, काठ्या, तलवारी, दागिने वगैरे गोष्टी भारतातून पाठवले जात होते.

 

  • टेलिव्हिजनच्या इतिहासातील अनेक यशस्वी मालिकांमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल एवढी या मालिकेची लोकप्रियता वादातीत आहे. ही मालिका ‘एचबीओ’ दूरदर्शन वाहिनी आणि इंटनेटवर ‘हॉट स्टार’ व ‘एचबीओ’ या वाहिन्यांवर प्रदर्शित केली जाते. इंटरनेटवर पाहण्यासाठी प्रत्येक भागामागे ७० अमेरिकी डॉलर्स खर्च करावे लागतात.

First Published on April 17, 2019 12:23 pm

Web Title: everything you need to know about game of thrones