नाटकाचे प्रयोग कुठे आहेत, यासाठी वर्तमानपत्राचं पान चाळलं जातं. त्यातही नाटकांची जाहिरात ज्या पानावर असते त्या पानाचे रकानेच्या रकाने तपासले जातात. आपल्या आवडीचं नाटक जर जवळच्या नाट्यगृहात असेल, तर सोने पे सुहागाच! मग त्या नाटकाची हवी त्या रांगेतील तिकीट काढणं, नाटक सुरु व्हायच्या आधी पोहोचणं आणि तिसऱ्या घंटेबरोबर शिगेला पोहोचलेली उत्सुकता… वगैरे. हे सर्व नाट्यप्रेमी महिन्यातून किमान एकदा तरी अनुभवत असतो. या नाट्यप्रेमींना असाच आनंद देता यावा म्हणून नाटक वेडे कलाकार नाटकांचे प्रयोग करत असतात. याच कलाकारांपैकी एक म्हणजे लेखक, दिग्दर्शक गणेश पंडित.

एकांकिका, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक असा प्रत्येक टप्पा पार करत गणेशने आज आपलं नाव कमवलंय. २००२ मध्ये ‘पांडुरंग फुलवाले’ या नाटकातून त्याने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. या नाटकात गणेशने अभिनय केला होता. पण याआधीपासूनच त्याची नाळ रंगभूमीशी जोडली गेली होती. गणेशची सुरूवात अभिनेता म्हणून जरी झाली असली तरीही आज लेखक दिग्दर्शक म्हणून त्याने त्याची वेगळी ओळख बनवली आहे. आज ‘कथा पडद्यामागची’मध्ये गणेश उलगडणार आहे त्याची पडद्यामागची गोष्ट…
मराठी रंगभूमीशी माझा परिचय उशीराच झाला. मराठीत काम करण्याआधी मी हिंदी, उर्दू, गुजराती भाषांमध्ये काम केले होते. उर्दू भाषेतील माझ्या पहिल्या नाटकाला उत्कृष्ट लेखकाचे पारितोषिकही मिळाले होते. तेव्हा मला मी थोडेफार चांगले लिहू शकतो, याची जाणीव झाली. नंतर मग लेखन, दिग्दर्शनाचा प्रवास टप्याटप्प्याने सुरू झाला.

दिग्दर्शनाची सुरूवात ‘नॅशनल पार्क ते ज्युरासिक पार्क’ या बालनाट्याने झाली. तेव्हा हे बालनाट्य फार गाजलेलं. नाटक, मालिका, सिनेमा या तिघांचं लिखाण केल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे नाटकाचं लिखाण अधिक आव्हानात्मक असतं. कारण नाटकामध्ये रंगमंच ठरलेला असतो. जे काही तुम्हाला सांगायचे आहे, दाखवायचे आहे ते त्याच चौकटीत दाखवायचे असते. मालिका आणि सिनेमांमध्ये असं होत नाही. तिथे तुमच्या भोवती कॅमेरा फिरत असतो. पण नाटकांमध्ये प्रेक्षक एकाच जागी बसलेला असतो. त्यामुळे तुम्हाला फिरावं लागतं, त्याला सांगावं लागतं. त्या पद्धतीने लिखाण करावं लागतं. ‘पंचेस’वर काम करावं लागतं. अनेक ड्राफ्टवर काम केल्यानंतर नाटकाची संहिता तयार होते.

सिनेमाचं लिखाणं झालं, तो टेक ओके झाला की त्यात बदल करता येत नाहीत. अगदी सिनेमा एडिट करायला बसताना एखादी गोष्ट कमी पडली तरी त्यात फारसं काही करता येत नाही. पण नाटकामध्ये असं होत नाही. प्रेक्षकांसाठी जसा प्रत्येक प्रयोग वेगळा असतो त्याचप्रमाणे तो सादर करणाऱ्यांसाठीही वेगळा असतो. एखाद्या प्रयोगाला अमुक एखादी गोष्ट खटकत असेल तर नंतरच्या प्रयोगाला ती सुधारली जाऊ शकते. नाटकांच्या तालीममध्ये अनेक गोष्टी बदलल्या जातात. एवढेच काय तर एखाद्या कलाकाराचे कपडे आधी बरोबर व्हायचे पण आता घट्ट होतात म्हणूनही बदलले जातात. यावरूनच अंदाज आला असेल की रंगभूमीही जागती आहे. इथे कायमस्वरुपी असं काहीच नसतं. सतत बदल होत असतात आणि ते तसेच असावे असं मला वाटतं.

नाटक केल्यामुळे मनाला एक आनंद मिळतो. मालिका, सिनेमा यांचं लिखाण, दिग्दर्शन यांच्यामध्ये ब्रेक म्हणून मी नाटकाच्या लिखाण, दिग्दर्शनाकडे बघतो. इथे फक्त अभिनेत्याचाच कस लागतो असं नाही तर नाटकासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचा कस लागतो. अलिप्त राहूनही संवाद कसा साधायचा हे रंगभूमी तुम्हाला शिकवते. पण त्याचप्रमाणे स्वतःचं सर्वस्व देऊन ती व्यक्तिरेखा जगण्याचं बळंही रंगभूमीच देते. चेहऱ्यावर एकदा रंग चढला की तो उतरेपर्यंतची मजा जो अनुभवतो त्यालाच रंगभूमी कळली.

‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ नाटकाचा अत्रे नाट्यगृहात एक प्रयोग होता. तो माझा या नाटकासाठीचा पहिला प्रयोग होता. जितेंद्र जोशीची ‘रिप्लेसमेंट’ म्हणून मी त्या नाटकात काम करणार होतो. प्रयोगाच्या आदल्या रात्री मी पुण्यावरून प्रवास करून मुंबईला आलो होतो. प्रवासात मला झोप लागत नाही, त्यामुळे पूर्ण रात्र मी जागून काढली होती. त्यातच दुसऱ्या दिवशी साडेतीन वाजता नाट्यगृहात पुन्हा एकदा माझी तालीम घेण्यासाठी संपूर्ण टीमला बोलवलं होतं. मी दोनच्या सुमारास तिथे पोहोचलो होतो. पण तेव्हा फक्त नाटकाचा टेम्पो आला होता. कलाकार कोणीच आले नव्हते. त्यामुळे मी एका खोलीत जाऊन झोपलो आणि ‘कोणी आलं तर मला उठव…’ असं मी प्रॉपर्टी लावणाऱ्यांपैकी एकाला सांगून ठेवले. मला साधारणपणे ३.०५ ला जाग आली आणि मी बाहेर जाऊन पुन्हा बघून आलो की कोणी आलंय का? पण कोणीच आलं नव्हतं. मी पुन्हा एकदा त्या मुलाला सांगितले की, ‘कोणी आलं तर मला उठव…’ प्रयोग ४.३० वाजता सुरू होणार होता आणि मला ४.२० ला जाग आली. बाहेर आल्यावर पाहिलं तर सगळेच चिंताग्रस्त. माझ्या रिप्लेसमेंटसाठी अनेकांना फोन लावले जात होते. अजून काही वेगळं करता येईल का, याचा विचार करत होते. ‘बोंबिलवाडी’च्या संपूर्ण टीमने ती एक खोली सोडून बाकी सगळीकडे मला शोधलं होतं आणि मी आलोच नाही असा ग्रह करून घेतला होता.

प्रयोगाला सुरूवात झाली आणि तो प्रयोग तुफान रंगला. प्रेक्षकांनी तो प्रयोग अक्षरशः डोक्यावर घेतला. त्या प्रयोगाला मी घामाने पूर्ण भिजलो होतो. प्रयोग संपल्यावर मेकअप रुममध्ये मी गंजी आणि टॉवेलवर होतो. प्रयोग संपल्यावर अनेक प्रेक्षक अभिनंदन करायला बॅकस्टेजला येतात. नाटकातल्या इतर पात्रांचे अभिनंदन करायला प्रेक्षक आले असतील असा अंदाज मी बांधला. पण काही क्षणांतच २५-३० जण माझ्याभोवती गोळा झाले आणि माझ्या सह्या घेऊ लागले होते. त्यांना माझं काम आवडलं होतं आणि मीही त्यांना टॉवेल आणि गंजीवरच आनंदाने सह्या दिल्या होत्या. तो क्षण मी आजही विसरू शकत नाही… विसरला जाणार नाही…

शब्दांकन- मधुरा नेरूरकर
madhura.nerurkar@indianexpress.com