13 December 2017

News Flash

कथा पडद्यामागच्याः ‘२३ वर्षांनंतरही राशीचक्रच्या प्रयोगाला ‘हाऊसफुल्ल’ची पाटी लागते’

पतीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून त्या माझे आभार मानायला आलेल्या

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 12, 2017 1:39 AM

शरद उपाध्ये

रंगभूमीवर आतापर्यंत अनेक नवनवीन प्रयोग होत राहिले आहेत. कधी ते पसंत पडतात तर कधी ते फसतात. पण फसलेला प्रयत्नही नवीन काही तरी शिकवून जातो. कारण रंगभूमी कोणालाच अशिक्षीत ठेवत नाही. ती प्रत्येकाला काही ना काही शिकवत असते. गेली २३ वर्ष सातत्याने राशीचक्रचे प्रयोग करणाऱ्या शरद उपाध्ये यांच्या आयुष्यातले अनुभवाचे गाठोडेही अनेक किस्स्यांनी भरले आहे. त्यातील काही किस्से त्यांनी लोकसत्ता ऑनलाइनशीही शेअर केले.

आतापर्यंत राशीचक्रचे ५०७५ प्रयोग झाले आणि अजूनही याचे प्रयोग अविरत सुरू आहेत. राशीचक्रची खासियतच ही आहे की यात कोणतंही भविष्य नसून हा फक्त तीन तासांचा निखळ मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. पण प्रत्येक राशीच्या स्वभावाच्या काही गंमती असतात, लोकांना त्याच गंमती ऐकायला अधिक आवडतात. म्हणून तर गेली २३ वर्ष राशीचक्रचे प्रयोग सुरू असतानाही मी हाऊसफुल्लची पाटी आजही पाहू शकतो ही खरेतर मराठी रसिक प्रेक्षकांचीच कृपा असल्याचे उपाध्ये म्हणाले.

राशीचक्रला खरी दाद ही लोकांच्या प्रतिसादाचीच मिळते. राशीचक्रच्या प्रयोगांवेळी रंगमंचावर नेपथ्य, कलाकार, प्रकाश योजना असे काहीच नसते, फक्त बोलण्यावर या सर्व गोष्टींची मदार असते. प्रत्येक प्रयोगावेळी मी किस्सेही वेगवेगळे सांगत जातो. त्यामुळे आधीच्या प्रयोगाला आलेल्या प्रेक्षकाला नंतरचा प्रयोग फार वेगळा वाटतो. रसिकांचा वसंत ऋतू होतो म्हणून शरद उपाध्ये कोकिळा बनतो हे माझं वाक्य मी अनेकदा म्हणतो.

ठाण्याला माझा प्रयोग सुरु असताना पहिल्या रांगेत एक जोडपे बसले होते. धनू राशीचबद्दल सांगत असताना अचानक सभागृहात गोंधळ सुरू झाला. जनरल लाइट्स लावल्यानंतर कळलं की एक मनुष्य खाली पडला होता. त्याला बाहेर नेण्यात आलं आणि प्रयोग पुन्हा सुरू करण्यात आला. प्रयोग संपल्यानंतर त्या माणसाची बायको मला भेटायला आणि त्यांनी जे काही सांगितलं ते मी आजपर्यंत विसरु शकलेलो नाही. त्या म्हणाल्या की, ‘धनू राशीबद्दल तुम्ही सांगत असताना माझे पती एवढे हसत होते की त्यांना हसतानाच हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेईपर्यंत त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. माणूस आज ना उद्या मरणार हे तर नक्कीच आहे. पण माझा नवरा हसत हसत गेला म्हणून मी तुमचे आभार मानायला आले.’ पतीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून त्या माझे आभार मानायला आलेल्या ही घटना माझ्या मनावर फार परिणाम करुन गेली.

तर दुसरीकडे माझा कल्याणला प्रयोग असताना एका हॉटेलमध्ये मी सहकाऱ्यांसोबत खाण्यासाठी बसलो होतो. खाऊन झाल्यावर जेव्हा बिल मागितलं तेव्हा मी कोणी दिलं असं विचारलं तेव्हा त्यांनी एका कुटुंबाकडे हात दाखवला. एक मनुष्य बायको आणि मुलांसोबत त्या हॉटेलमध्ये बसला होता. त्यांना मी भेटायला गेलो तेव्हा ते म्हणाले की, ‘माझ्या बायकोची अॅसिडीटी, रक्तदाब तुमचा प्रयोग बघितल्यावर इतकं कंट्रोलमध्ये आलंय की आता तिला काहीही त्रास झाला की ती राशीचक्राच्या प्रयोगाला येते आणि खूप हसते. त्यामुळे तिचे सगळे आजारही आता बरे होत आहेत. तुमचे ऋण तर फेडू शकत नाही पण फूल ना फुलाची पाकळी म्हणून तुमच्या जेवणाचं बिल मला भरु द्या.’ त्या गरिब माणसाने आमचं ४००-५०० रुपयांचं बिल भरलं. लोकांची मनं किती मोठी असतात याचा अनुभव मी राशीचक्राच्या प्रयोगांदरम्यान सतत घेत आलोय.

रंगभूमी हा एक जिवंत अनुभव आहे. प्रेक्षकांच्या समोर आपली कला सादर करण्यासारखा आनंद इतर माध्यमांमध्ये मिळत नाही. राशीचक्रचे एपिसोडही केले पण त्यात काही तांत्रिक कारणांमुळे किंवा रिटेकमुळे एकच गोष्ट रेंगाळत राहते शिवाय तिथे प्रेक्षकही नसतो. रंगभूमीवर मात्र तसं होत नाही. इथे येणारा प्रेक्षक हा चोखंदळच असतो. तुम्ही चांगलं दिलं तर तो तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा असतो. त्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादामुळेच मी आजही एका दिवशी तीन तीन तासांचे दोन प्रयोग करतोय.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com

First Published on April 12, 2017 1:39 am

Web Title: exclusive katha padyamagchi sharad upadhye talks about his experience in rashichakra