चित्रपटांमध्ये हाणामारीचे चित्रपट, प्रेमकथापट, रहस्यमय, साहसपट असतात त्याचप्रमाणे ‘इरॉटिक थ्रिलर’पटही असतात. हमखास प्रेक्षक मिळविण्याचा हा आपल्याकडील २००० च्या दशकात आलेला फॉम्र्युला ‘हेट स्टोरी’ या चित्रपटाने यशस्वी करून दाखवला. त्यामुळे या मूळ चित्रपटाचा सीक्वेल असलेल्या ‘हेट स्टोरी २’ बद्दल स्वाभाविकपणे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. परंतु, प्रेक्षकांच्या उत्सुकता आणि उत्कंठेला सुरुंग लावण्याचे काम दिग्दर्शक-लेखक-संगीतकार यांनी एकत्र येऊन केले आहे.
‘कामुक थरारपट’ गटातला हा चित्रपट आहे हे मूळ गाजलेल्या चित्रपटावरून आणि या चित्रपटाच्या पोस्टरवरून लगेचच समजते. त्यामुळे कामुक दृश्यांची किमान अपेक्षा ठेवून प्रेक्षक चित्रपटगृहात शिरतो. परंतु, त्याची सपशेल निराशा होते. त्याला पाहावी लागते फक्त एक सूडकथा. चित्रपटाच्या इंग्रजी शीर्षकावरून सूडकथा आहे हे अध्याहृत आहेच.
सोनिका ही मंदार म्हात्रे या क्रूर राजकारण्याची ठेवलेली बाई. सोनिकाच्या आजीला ओलीस ठेवून मंदार म्हात्रे तिला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडतो. हळूहळू मंदार म्हात्रे तिच्या आयुष्यावर कब्जा करतो. तिचे जगणे मुश्किल करतो आणि तिचा अतोनात छळ करतो. सत्तांध, कामांध आणि क्रूर अशा या राजकारण्याचा सोनिका सूड घेते. सुरुवातीलाच सोनिका एका पुरलेल्या पेटीतून बाहेर येते आणि रुग्णालयात दाखल होते. ती शुद्धीवर येते तोपर्यंत तिला मारण्याचा प्रयत्न एक पोलीस अधिकारी करतो. त्यातून बचाव करत करत ती भानावर येते आणि मग क्रूर राजकारण्याचा सूड घेण्याचे मनसुबे आखते.
कामुक थरारपट म्हणताना सोनिका-मंदार म्हात्रे यांचे संबंध, सोनिका छायाचित्रण कला शिकायला जाते तिथे तिचे प्रेम जमते त्या अक्षयबरोबरचे तिचे संबंध यावर भर न देता दिग्दर्शक व लेखिकेने फक्त सोनिका सूड घेते एवढय़ाच कथानकावर भर दिला आहे. सूड घेण्यासाठी आवश्यक असलेली कारणे म्हणचे मंदार म्हात्रेने केलेल्या हत्या, अत्याचाराच्या घटना दाखविणे क्रमप्राप्तच होते. त्यामुळे ते दाखवले आहे. परंतु, पोस्टर पाहून चित्रपटागृहात गेलेला प्रेक्षक त्यामुळे वैतागतो. विशेषत: मूळ गाजलेला चित्रपट पाहिलेले प्रेक्षक अधिक कंटाळतात.
सोनिकाची भूमिका साकारणाऱ्या सुवरिन चावला या लोकप्रिय टीव्ही मालिकांमधील अभिनेत्रीने तिच्या परीने सोनिका चांगली साकारली असली तरी ‘कामुक थरारपट’ गटातल्या चित्रपटात हवी तशी नायिका म्हणून ती पडद्यावर अजिबात शोभून दिसत नाही. सोनिकाच्या प्रियकराच्या भूमिकेतील जय भानुशालीला फारसे कामच नाही. त्यामुळे मंदार म्हात्रे हा खलनायक साकारणारा सुशांत सिंग हा टीव्ही कलावंतच वरचढ ठरला आहे. खलनायकाच्या अत्याचारांना बळी पडणाऱ्या नायिकेला प्रेक्षकांची आपोआपच सहानुभूती मिळायला हवी ती मात्र सोनिका या व्यक्तिरेखेला मिळत नाही. त्यामुळे सुशांत सिंगने साकारलेला क्रूरकर्मा मंदार म्हात्रे हाच प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. मुळात मोजकी कामूक दृश्ये आणि तीही परिणामकारकरित्या न दाखविल्यामुळे चित्रपट फक्त सूडकथा म्हणूनच पाहावा लागतो. पुढे काय घडणार याची कल्पना प्रेक्षकाला येत असल्यामुळे अनेकदा पडद्यावर आणि इंग्रजी चित्रपटातून पाहिलेला सूडकथाच पाहणे प्रेक्षकाच्या नशिबी येते. त्यामुळे उत्कंठारहित एवढेच वर्णन या चित्रपटाचे करावे लागेल.
हेट स्टोरी २
निर्माते – भूषण कुमार, विक्रम भट्टॉ
दिग्दर्शक – विशाल पंडय़ा
पटकथा – माधुरी बॅनर्जी
संगीत – मिथुन, मीट ब्रॉस अंजान, आकरे मुखर्जी, रशीद खान, लक्ष्मीकांत प्यारेलाल
छायालेखन – राजू खान आणि स्वरूप
संकलन – कुलदीप मेहान
कलावंत – सुवरिन चावला, सुशांत सिंग, जय भानुशाली, मिका सिंग.