सध्या ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलीवूड व्हाईव्हज’ हा कार्यक्रम खूपच चर्चेत आहे. यात बॉलीवूड कलाकार-दिग्दर्शकांच्या बायका कशा पद्धतीने जीवन जगतात तसेच त्यांना दैनंदिन जीवनात कोणत्या अडचणींना सामना करावा लागतो याचे चित्रण करण्यात आले आहे. यात अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे, समीर सोनीची पत्नी अभिनेत्री नीलम कोठारी, तसेच अभिनेता-दिग्दर्शक सोहैल खानची पत्नी सीमा खान यांच्या वास्तव आयुष्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. मात्र प्रदर्शनाबरोबरच हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या शोचे शीर्षक चोरले असल्याचा आरोप दिग्दर्शक मधुर भांडारकरने करण जोहरवर केला होता. चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या पत्नींचे आयुष्य कसे असते यावर आधारित ‘बॉलीवूड वाईव्हज’ या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर करत आहेत. हा चित्रपट गौरी खान, मीरा राजपूत आणि डिम्पल खन्ना यांच्या जीवनावर आधारित आहे. करणच्या शोमुळे आपल्या चित्रपटाचे नुकसान झाल्याची भूमिका भांडारकर यांनी घेतली होती.

याच दरम्यान करण जोहरचा ‘फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलीवूड वाईव्हज’ हा कार्यक्रम प्रदर्शित झाला आहे. मी समान शीर्षकाची चित्रपटाची निर्मिती करत असून, अपूर्व मेहता आणि करण जोहरने त्याच नावाने कार्यक्रम आणणे हे चुकीचे आहे. माझ्या चित्रपटाचे नुकसान करू नका, असे सांगत मधुर भांडारकर यांनी कार्यक्रमाचे शीर्षक बदलण्याची मागणी केली होती. याप्रकरणी त्यांनी ‘इंडियन मोशन पिक्चर्स प्रोडय़ुसर्स असोसिएशन’ (आयएमपीपीए) यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या शीर्षकाची त्यांनी सेन्सॉरकडे नोंदणीही केली आहे. यावर प्रोडय़ुसर्स गिल्डने हे शीर्षक धर्मा प्रॉडक्शनच्या नावाने नसल्याचे स्पष्ट केले. यावर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने या सगळ्याप्रकरणी मधुर भांडारकर यांना त्रास झाल्याबद्दल आम्ही माफी मागतो, अशा शब्दांत समाजमाध्यमांवरून माफी मागितली. हा वेगळा कार्यक्रम असून समाजमाध्यमावर त्याचे बॉलीवूड व्हाईव्हज या हॅशटगने प्रसिद्धी केली जात आहे, असे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण जोहरने केला आहे.