14 December 2018

News Flash

धावत्या गाडीतील प्रसुतीवर फेसबुकचा लघुपट!

आई-बाळाचा जीव धोक्यात असल्याचे बघत त्याने प्रसूतीचा निर्णय घेतला.

लघु चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमेरिकेतून आलेल्या पथकासह मेडिकलचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर.

मेडिकलच्या डॉक्टरची कामगिरी जगभर पोहोचणार

अहमदाबाद पुरी एक्सप्रेसमध्ये चित्रलेखा राय (२१, रा. बालोदा बाजार, छत्तीसगड) यांना सात एप्रिल २०१७ ला प्रसूती वेदना सुरू झाली. या कठीण प्रसंगी मेडिकलचे डॉ. विपीन खडसे या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने व्हॉट्सअपवर इतर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या आयुष्यातील पहिली यशस्वी प्रसूती केली. एका नवजात बाळ व आईला जीवदान मिळाल्याची दखल फेसबूकने घेतली आहे. त्यावर ते लघूपट करीत असून मंगळवारी अमेरिकेतील चार तज्ज्ञांनी मेडिकलच्या विविध विभागात चित्रीकरण केले.

मूळचे रायपूरच्या व हल्ली कामानिमित्त अहमदाबादला राहात असलेल्या चित्रलेखा राय प्रसूतीसाठी रायपूरला अहमदाबाद- पुरी एक्स्प्रेसने साधारण डब्यातून सात एप्रिल २०१७ ला जात होत्या. सकाळी १० वाजताच्या सुमारास बुटीबोरीत गाडी आली असता त्यांना वेदना सुरू झाल्या. तिकीट निरीक्षकाने गाडी थांबवत डॉक्टरचा शोध घेतला. याच गाडीतून मेडिकलचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर विपीन खडसे हा तरुण प्रवास करीत होता. त्याला एकाही प्रसूतीचा अनुभव नव्हता. त्याला याबाबत विचारले असता त्याने नकार दिला. परंतु आई-बाळाचा जीव धोक्यात असल्याचे बघत त्याने प्रसूतीचा निर्णय घेतला.

गाडीतील पाणी विक्रेत्यांपासून इतरांचीही त्याला मदत मिळाली. डॉक्टराने बाळाला गर्भातून बाहेर काढले. बाळ रडत नसल्याने त्याचा श्वासोच्छ्वास बघितला असता बंद असल्याचे पुढे आले. परंतु ह्रदयाचे ठोके काही प्रमाणात सुरू होते. दूरध्वनीवर कुणा एका वरिष्ठ डॉक्टरांना मदत मागण्यात वेळ घालवण्याऐवजी त्याने एकाच वेळी जास्त डॉक्टर सदस्य असलेल्या निवासी डॉक्टरांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट करून मदत मागितली. तातडीने निवासी डॉक्टरांनीही प्रतिसाद देत त्वरित बाळाला तोंडाव्दारे कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दुसऱ्याने बाळाला उलटे करून त्याला हलकेसे हाताने दाबत घासण्याचा सल्ला दिला. त्यानुसार बाळाचा श्वासोच्छ्वास सुरू होऊन ते रडायला लागले. डॉ. खडसेच्या या उल्लेखनीय कामाची दखल मेडिकल प्रशासनासह महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानेही घेत त्याचा गौरव केला.

दरम्यान, फेसबूकनेही या विद्यार्थ्यांने केलेल्या कामाची दखल घेतली. या घटनेवर लघुपट करण्याचे निश्चित केले. त्याकरिता मंगळवारी अमेरिकेतील पोटलॅन्डमधून चित्रीकरणासाठी रेमंड सँग, जोएफ, हॅडले, झॅक या चौघांचे पथक नागपूरच्या मेडिकलला आले. चौघांनी वसतिगृह क्रमांक ३, शस्त्रक्रिया विभागाचा आकस्मिक विभाग, वार्डचे चित्रीकरण केले. याप्रसंगी या चमूने प्रसूतीच्या प्रसंगाबाबत डॉ. विपीन खडसे आणि मार्डचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. दिनेश शर्मा यांची मुलाखत घेतली. जगातील दुर्गम व मागास भागात डॉक्टरांचा तुटवडा असल्यास व्हॉट्सअपच्या मदतीनेही कशा पद्धतीने डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध होणे शक्य आहे, यावरही या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार आहे.

‘‘फेसबूककडून चार महिन्यांपूर्वी प्रसूतीच्या घटनेवरील लघुपट तयार करण्याबाबत संपर्क करण्यात आला. चित्रीकरणाला मेडिकल प्रशासनाने मंजुरी दिल्यामुळे अमेरिकेतून आलेल्या चौघांनी त्याचे चित्रीकरण व घटनेची माहिती घेतली. हा चित्रपट जागतिक स्तरावर प्रदर्शित केल्या जाणार असून त्यात व्हॉट्सअपचे महत्त्व सांगण्यात येणार आहे.’

– डॉ. विपीन खडसे, प्रशिक्षणार्थी डॉक्टर, मेडिकल

First Published on November 15, 2017 4:23 am

Web Title: facebook make short film on mbbs student first delivery in moving train