|| रेश्मा राईकवार

‘न्यूटन’ चित्रपटाची नायिका म्हणून सध्या अभिनेत्री अंजली पाटीलचं खूप कौतूक होतं आहे. सगळ्या जगाने तिची नोंद घेतली आहे मात्र ‘न्यूटन’ हा काही तिचा पहिला चित्रपट नाही. अंजलीने मराठी, तेलुगू, मल्याळम, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमधूनही काम केलं आहे. सध्या बॉलीवूडमध्ये जो कास्टिंग काऊचचा वाद सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर वैयक्तिकरीत्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाला सामोरे जावे लागले नसले तरी सुरुवातीच्या संघर्षांच्या काळात अशा वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जावं लागतं, असं ती म्हणते. बॉलीवूडमध्ये नायिका बनायचे असेल तर ‘गोरा’ रंग अजूनही महत्त्वाचा ठरतो. रंगामुळे आणि दिसण्यामुळे मला अनेक चित्रपट सोडावे लागले आहेत, असं तिने स्पष्ट केलं. ‘मेरी निम्मो’ या आनंद राय यांची निर्मिती असलेल्या ‘इरॉस इंटरनॅशनल’च्या चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर येणार आहे.

हिंदी चित्रपट अभिनेत्री म्हणून ‘न्यूटन’नंतर तिच्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र त्याआधी तिने प्रकाश झा यांच्या ‘चक्रव्यूह’, राकेश ओमप्रकाश मेहरांच्या ‘मिर्झिया’सह चांगल्या हिंदी चित्रपटांमधून काम केलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला की कलाकार म्हणून आपलं जग बदलतं, असा समज असेल तर तो चुकीचा आहे, असं अंजली स्पष्ट करते. मला २०१३ मध्ये तेलुगू चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता ‘न्यूटन’ चित्रपटाला पुरस्कार मिळाला, तो ‘ऑस्कर’साठी पाठवला गेला यामुळे त्याची जास्त चर्चा झाली. मात्र तुमच्या नावाची चर्चा वगैरे या गोष्टी त्या तेवढय़ापुरती होणारी प्रसिद्धी असते. त्यापलीकडे तुमचं जग बदलत नाही. त्यामुळे माझं यश हे या चित्रपटांवर अवलंबून नाही. चित्रपट, फिल्म फेस्टिव्हल आणि मग त्यातून मिळणारा लोकांचा प्रतिसाद यावर मी माझं यशाचं गणित कधीच ठरवलेलं नव्हतं. अर्थात, तुम्हाला पुरस्कार मिळाला की आनंद होतो. तुमचं काम करण्यासाठी तुम्हाला आणखी उत्साह येतो पण मी माझ्या आनंदासाठी चित्रपट करते आहे, असं ती सांगते.

तिने आत्तापर्यंत हिंदी किंवा मराठी अशी एकच एक वाट निवडून चित्रपट केले नाहीत त्यामागचं कारण स्पष्ट करताना मला साचलेल्या पाण्यात छप-छप करायला आवडत नाही, अशा स्पष्ट शब्दांत तिने आपलं मत व्यक्त केलं. एक कलाकार म्हणून मला ज्या ज्या चित्रपटात पोषक वातावरण असेल, भूमिका असेल तिथे तिथे जाऊन मी चित्रपट करणार. आत्तापर्यंत मी स्वत: माझे चित्रपट निवडत गेले. मला ज्या पटकथा आवडल्या त्यांना भाषेचा किंवा हा मुख्य प्रवाहातील चित्रपट आहे, तो समांतर आहे असा कुठलाही भेदभाव न करता मी ते स्वीकारले. आणि अशाच पद्धतीने माझं काम वाढत गेलं, हे सांगणाऱ्या अंजलीने आपण करिअर म्हणून कधीच अभिनयाचा विचार केला नव्हता असं सांगितलं. शिक्षण संपल्यानंतर ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ मध्ये आणि त्यानंतर ‘ललित केंद्रा’त शिकत असतानाही आपण पुढे जाऊन ‘स्टार’ होणार असा विचार कधीच केला नव्हता, असं सांगणाऱ्या अंजलीने खरं म्हणजे चित्रपट दिग्दर्शनाचा प्रशिक्षणक्रम ‘एनएसडी’तून पूर्ण केलं आहे. त्यामुळे एकच एक पर्याय समोर ठेवून कधीच काम केलं नाही, असं ती सांगते. मी चित्रपटांची खासकरून अभिनयाची वाट निवडली आहे. ज्यामुळे मला फिरता येतं, जगभरातील लोकांशी एक कलाकार म्हणून संवाद साधता येतो, शिवाय मी माझी कथा लिहिते आहे. आता त्या कथेवर दिग्दर्शक म्हणून काम सुरू आहे. असं विविधांगी पद्धतीने आपल्याला चित्रपट माध्यमातून काम करायचं असल्याचे तिने स्पष्ट केले. आताही ती रजनीकांत यांच्याबरोबर ‘काला’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

रजनीकोंत यांचा उल्लेख झाल्यानंतर त्यांच्याबरोबरच अनुभव हा खूप काही शिकवून जाणारा आहे, असं ती म्हणते. रजनीकांत असतील किंवा ‘न्यूटन’मध्ये राजकुमार राव असेल या सगळ्यांमधला सारखा गुण कोणता असेल तर ती त्यांची विनम्रता. इतके यश मिळवूनही या माणसांचे पाय जमिनीवर आहेत. कलाकार म्हणून त्यांचे मोठे असणे हे रुपेरी पडद्यापर्यंत स्तिमित आहे. त्यापलीकडे ती अगदी साधेपणाने जगणारी माणसं आहेत. त्यांच्याबरोबर कामाचा अनुभव घेतल्यानंतर मलाही माझ्या आयुष्यात हाच साधेपणा कायम टिकवायचा असल्याची खूणगाठ मनाशी पक्की बांधल्याचे तिने सांगितले. या कलाकारांमध्ये जी सत्याची आस आहे, त्यांच्यातील माणुसकी आहे त्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे अनेकदा बॉलीवूडमध्ये गोरा रंग नाही  म्हणून चित्रपट नाकारले जाण्याचे कटू अनुभव येतात. मला तर अजूनही गावातल्या मुलींच्याच भूमिकांसाठी विचारलं जातं. मात्र अशा वेळी मी ते माझं दुर्दैव मानत नाही. उलट, त्या कास्टिंग डिरेक्टर्सचं हे दुर्दैव आहे. माझ्यातील सौंदर्य काय याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे या लोकांनी नकार दिल्याने माझं नुकसान होणार नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि रजनीकांतसारख्या मोठय़ा कलाकारांच्या विनम्र वागण्याने मला माझी वाटच योग्य आहे याची खात्री पटली आहे, असं तिने सांगितलं. आता तिचा ‘मेरी निम्मो’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. ‘इरॉस इंटरनॅशनल’च्या डिजिटल वाहिनीवर तो पाहायला मिळणार आहे. ‘मेरी निम्मो’मध्ये एका २४ वर्षांची तरुणी आणि आठ वर्षांचा मुलगा यांच्यात बहरत गेलेलं प्रेमाचं नातं पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना आपण लहानपणी कोणाच्या ना कोणाच्या तरी खूप प्रेमात पडलेलो असतो. ती व्यक्ती आपल्याला खूप आवडत असते, तिचा आधार वाटत असतो. ते प्रेमाचं नातं या चित्रपटातून पाहायला मिळेल, असं तिने सांगितलं. डिजिटल वाहिन्यांचा महिमा सध्या वाढला असला तरी वेब सीरिज करण्यात आपल्याला फारसा रस नसल्याचे तिने सांगितले. मला चित्रपटच करायचे आहेत अर्थात डिजिटल वाहिन्यांमुळे ते चित्रपट भरपूर लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्याचं महत्त्व जास्त असल्याचं तिने सांगितलं. तिला आता स्वत:च्या चित्रपट दिग्दर्शनासाठी वेळ द्यायचा आहे. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित केलं आहे, असं ती सांगते. ‘मेरी निम्मो’ नंतर ‘काला’, ‘मेर प्यारे प्राइम मिनिस्टर’ आणि मृण्मयी देशपांडेचे पहिले दिग्दर्शन असलेल्या ‘के सरा सरा’ या मराठी चित्रपटातून ती प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसणार आहे.

रजनीकांत असतील किंवा ‘न्यूटन’मध्ये राजकुमार राव असेल या सगळ्यांमधला सारखा गुण कोणता असेल तर ती त्यांची विनम्रता. इतके यश मिळवूनही या माणसांचे पाय जमिनीवर आहेत. कलाकार म्हणून त्यांचे मोठे असणे हे रुपेरी पडद्यापर्यंत स्तिमित आहे. त्यापलीकडे ती अगदी साधेपणाने जगणारी माणसं आहेत. त्यांच्याबरोबर कामाचा अनुभव घेतल्यानंतर मलाही माझ्या आयुष्यात हाच साधेपणा कायम टिकवायचा आहे. अनेकदा बॉलीवूडमध्ये गोरा रंग नाही  म्हणून चित्रपट नाकारले जाण्याचे कटू अनुभव येतात. मला तर अजूनही गावातल्या मुलींच्याच भूमिकांसाठी विचारलं जातं. मात्र अशा वेळी मी ते माझं दुर्दैव मानत नाही. उलट, त्या कास्टिंग डिरेक्टर्सचं हे दुर्दैव आहे. माझ्यातील सौंदर्य काय याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे या लोकांनी नकार दिल्याने माझं नुकसान होणार नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे.   – अंजली पाटील