11 August 2020

News Flash

‘फॅमिली ड्रामा’ नात्यांची मेलोड्रॅमेटिक मांडणी

मानवी नाती ही एक अजब गोष्ट आहे. त्यांना तार्किक परिमाणे लावता येत नाहीत. त्यांची बुद्धिगम्य उकल काही अंशी शक्य असली तरीही त्याबाबत ठाम विधान करणं

| February 17, 2013 12:30 pm

मानवी नाती ही एक अजब गोष्ट आहे. त्यांना तार्किक परिमाणे लावता येत नाहीत. त्यांची बुद्धिगम्य उकल काही अंशी शक्य असली तरीही त्याबाबत ठाम विधान करणं काहीसं धाडसाचंच ठरावं. आयुष्यभर सान्निध्यात राहूनही आपल्या जवळचा माणूस आपल्याला पूर्णपणे कळतोच असं नाही. प्रदीर्घ सान्निध्यामुळे त्याच्याबद्दल काही ठोकताळे जरूर बांधता येतात, पण ते नेहमीच बरोबर ठरतील असं नाही. म्हणूनच लेखक, तत्त्वचिंतक, विचारवंत यांना मानवी नात्यांतील ही कोडी कायम भुरळ घालत आली आहेत. मानवी मनाचा तळ धुंडाळण्याच्या माणसाच्या अनिवार ओढीतूनच विविध कला व शास्त्रांचा जन्म झालेला आहे. तरीही मानवी नातेसंबंधांतलं अंतिम सत्य मात्र अजून कुणालाच सापडलेलं नाही. एकदंत क्रिएशन्स निर्मित, अद्वैत दादरकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘फॅमिली ड्रामा’मध्येही मानवी नात्यांतील या अगम्यतेचाच शोध आढळून येतो.
कुणाचा कुणाशी मेळ नसलेलं करमरकर कुटुंब. कुटुंबप्रमुख शशिकांत करमरकर हे काहीसे तुसडे, स्वकेंद्री गृहस्थ. त्यामुळे ते घरात असले की त्यांच्या हुकूमशाही वर्तनामुळे घरातलं वातावरण सतत तणावपूर्ण असतं. त्यांची बायको सुमती ही पारंपरिक चौकटीतली पक्की गृहिणी. घरकामाव्यतिरिक्तचा वेळ टीव्हीवरच्या मालिकांतल्या पात्रांच्या भानगडींत नको इतका रस असलेली. नोकरीच्या शोधात रोज मुलाखतींचा रतीब घालूनही कुठंच काही जमत नसल्यानं कावलेला त्यांचा मुलगा अजित घरपण हरवलेल्या घरातल्या वातावरणामुळे मित्रांमध्येच ओलावा शोधणारा. वडिलांचा आणि त्याचा जणू उभा दावा. परस्परांचा एक शब्दही ते खाली पडू देत नाहीत. त्यांच्या साठमारीत बिचाऱ्या सुमतीचं मात्र मधल्या मध्ये मरण होतं. अजितला एक थोरला भाऊही होता- रणजीत. आठ वर्षांमागे एका बारबालेबरोबर तो पळून गेला तो अद्यापि घरी परतला नव्हता. एक ना एक दिवस तो घरी परतेल, या वेडय़ा आशेवर सुमती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली.  
अशात एके दिवशी अजित हुबेहूब रणजीतसारख्याच दिसणाऱ्या त्याच्या एका मित्राला- सॅन्डीला घेऊन घरी येतो. त्यानं पूर्वाशी पळून जाऊन लग्न केलेलं असतं. त्या दोघांच्या लग्नाला पालकांचा विरोध असल्यानं ते आपल्या घरी जाऊ शकत नसतात. आणि लगेच घर घेण्याएवढे पैसेही त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे अजित मित्रकर्तव्याला जागून त्यांना आपल्या घरी आश्रय द्यायचं ठरवतो. परंतु यातला मोठा अडसर असतो तो अजितच्या जमदग्नी वडिलांचा! ते पळून लग्न केलेल्या या जोडप्यास आपल्या घरात ठेवणं शक्यच नसतं. पण तरीही त्यांना पटवण्यासाठी सॅन्डी हा (त्यांचा मुलगा) रणजीतच असल्याचं भासवायचं आणि तो पश्चात्ताप होऊन घरी परतल्याचं नाटक करायचं, असा प्लॅन अजित आखतो. या कटात तो आईलाही सामील करू इच्छितो. कारण त्याशिवाय हा बनाव बाबांच्या पचनी पडणार नसतो. पण सुमती त्यास साफ नकार देते. नवऱ्याशी खोटं बोलणं म्हणजे पाप समजणाऱ्या तिला हे जमणंच शक्य नसतं. अजित मोठय़ा मिनतवारीनं तिला कशीबशी राजी करतो. पण आयत्या वेळी या ‘नाटका’त आपण कच खाऊ अशी साधार भीती तिला वाटत असते. अजित तिला धीर देतो. त्यासाठी तिच्याकडून बाबांना कसं सामोरं जायचं, या ‘नाटका’ची रंगीत तालीमही करून घेतो.  
अर्थात अशा तऱ्हेनं पढवलेली सुमती किती काळ किल्ला लढवणार? तिची व्हायची ती फजिती होतेच. मात्र, अजित प्रसंगावध राखून प्राप्त परिस्थिती चलाखीनं हाताळतो आणि तो रणजीतच असल्याची खात्री पटल्यासारखी वडिलांची संभ्रमित अवस्था करून पडत्या फळाची आज्ञा घेत त्या दोघांना ‘दादा-वहिनी’ म्हणून अखेर घरात स्थानापन्न करतोच. परंतु तो रणजीतच असल्याची वडिलांची खात्री पटलेली असते का? आणि असं ‘नाटक’ किती काळ यशस्वी होणार? ते उघड झाल्यावर घरात होणाऱ्या विस्फोटाचं काय? आणि समजा, दरम्यान खराखुरा रणजीतच अचानक प्रकटला तर काय होणार?.. या आणि अशा प्रेक्षकांच्या मनाला भुंगा लावणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकात शोधणंच उचित ठरेल.  
लेखक अद्वैत दादरकर यांनी नाटकाच्या शीर्षकाशी इमान राखत हा बेतीव ‘फॅमिला ड्रामा’ रचला आहे. सॅन्डीच्या डिट्टो रणजीतसारखं दिसण्यापासूनच या बेतलेपणाची सुरुवात होते. नाटकात पहिल्याच प्रवेशात एका टीव्ही मालिकेतील घटनांशी समांतर असं ‘मसाला नाटय़’ करमरकर कुटुंबातही घडत असल्याचं दाखवून लेखकानं टीव्ही मालिका आणि प्रत्यक्षातलं वास्तव यांच्यातला विरोधाभास दाखवायचं ठरवलंय की काय असं सुरुवातीला वाटतं खरं; पण हे साधम्र्य तिथंच सोडून देत प्रत्यक्षातील नात्यांतल्या नाटय़ावरच पुढे त्यांनी भर दिला आहे. टीव्हीतील पात्रांच्या बेगडी समस्यांशी आपल्या कुटुंबातील असल्या-नसलेल्या समस्यांची सांगड घालून घरात नस्ता क्लेश निर्माण करणाऱ्यांबद्दल हे नाटक काही सांगू पाहतंय असं प्रारंभी वाटतं. खरं तर हाच धागा पुढे नेत लेखकाला नात्यांच्या अद्भुत विणीची ही गोष्ट दुपेडी करता आली असती. टीव्हीच्या नशेने निर्माण केलेल्या कौटुंबिक-सामाजिक प्रश्नांची यानिमित्ताने चर्चा करता आली असती. परंतु लेखकाने ही संधी वाया दवडली आहे. पुढचं सगळं नाटक रीतसर कोल्हटकरी-कानेटकरी वळणानं गेलं आहे. संवादशैली आणि विषयाच्या हाताळणीमुळे वरकरणी वेगळ्या वाटणाऱ्या या नाटकात नातेसंबंधांची जी उकल दाखविली आहे ती अजिबातच नवी नाही. काही वेळा तर कृतक प्रसंगांची भरमार आढळते. त्यांतही वास्तवापेक्षा अट्टहासच अधिक जाणवतो. यातली पात्रंही साचेबद्ध आहेत. सुमती पापभिरू, नवऱ्याच्या दहशतीनं गुदमरलेली; पण अंतरंगी वेगळं व्यक्तिमत्त्व जपणारी. शशिकांत करमरकर हे पात्र पूर्वसंस्कारांमुळे (‘खलनायकी’) तसं घडलेलं. त्यांचीच आवृत्ती म्हणजे अजित. तोही आई-बाबांशी ज्या उर्मटपणे वागतो, त्यांचा पदोपदी पाणउतारा करतो, तेही खलनायकी रूपातच मोडतं खरं तर. असो. एक मात्र खरंय, की शेवटाकडे नाटय़ांतर्गत तिढय़ाची कशी सोडवणूक होणार, याची उत्सुकता मात्र प्रेक्षकांच्या मनात दाटून येते. रणजीतच्या रहस्यावरील पडदा हटल्यावर तर वडील-मुलामधल्या नात्याचं एक आगळं, धीरोदात्त दर्शन घडतं. इथं नाटकाला एक वेगळी मिती प्राप्त होते.
मुळात हे बेतलेलं नाटक; त्यामुळे त्याची संयमित हाताळणी आवश्यक होती. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी तशी ती केल्यामुळे प्रारंभी नाटकाशी फटकून असलेला प्रेक्षक पुढे त्यात हळूहळू गुंतत जातो. मधे प्रसंगोपात केलेला धक्कातंत्राचा वापरही त्याला गुंतवून ठेवतो. तथापि यातल्या पात्रांचं व्यक्तिरेखेत रूपांतर होऊ शकलेलं नाहीए. याचं कारण संहितेतच ती त्रुटी आहे. ‘फॅमिली ड्रामा’मधील ‘ड्रामा’लाच त्यामुळे महत्त्व प्राप्त झालं आहे. दिग्दर्शकाने प्रमुख पात्रांच्या छोटय़ा छोटय़ा लकबींवर चांगलं काम केलं आहे; ज्यामुळे नाटकातला प्रेक्षकांचा रस वाढत जातो. उपलब्ध सर्व नाटय़स्थळांचा चोख वापर करत विजय केंकरे यांनी यातलं ‘नाटय़’ खुलवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
नेपथ्यकार राजन भिसे यांनी करमरकरांचं टु बेडरूम हॉल किचनचं घर यथातथ्य साकारलं आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेद्वारे तसंच अशोक पत्की यांनी पाश्र्वसंगीतातून यातले ‘नाटय़’पूर्ण प्रसंग अधोरेखित केले आहेत. बाकी पात्रांची वेशभूषा व रंगभूषा ठीक असली तरी शशिकांत करमरकर यांचं दर्शनी रूप मात्र त्यांच्या नाटय़गत व्यक्तिमत्त्वाशी विसंगत असल्याचं आढळतं. अजित भुरे यांनी शशिकांत करमरकरांचं आत्मकेंद्री रूप संवादांतून ठाशीवपणे प्रकट केलेलं असलं तरी त्यांचं बाह्य़रूप आणि अंतरंग यांच्यातलं द्वंद्व नाटकात सूचकतेनंही येत नाही, हे चांगलंच खटकतं. दिसतं ते त्यांचं अकस्मात बदललेलं रूप! त्यांची मानसिक-भावनिक आंदोलनं एकांतातही नीटशी व्यक्त होत नाहीत. सुमतीच्या कथनातून केवळ ती जाणवतात.  अजित भुरे भूमिकेत मुरत नाहीत. काठाकाठावरच राहतात. सुकन्या कुलकर्णी यांनी सुमतीचं दडपलेलं, कोंडमारा झालेलं व्यक्तित्व आणि त्या घुसमटीवर तिनं मनातल्या मनात शोधलेला विनोदाचा उतारा भन्नाट आहे. तिनं नवऱ्याबद्दल सांगितलेल्या गोष्टी मात्र शशिकांत करमरकर यांच्या नाटय़गत व्यक्तिमत्त्वाशी मेळ खात नाहीत. खरंच तशी स्थिती असेल तर मुलाच्या मनातील वडिलांची खलनायकी प्रतिमा खोडून काढण्याचा सुमती कधीच का प्रयत्न करत नाही? त्यांच्यामधला तणाव इतक्या टोकाला ती का जाऊ देते? असे काही प्रश्न त्यामुळे पडतात. त्यांची तर्कसंगत उत्तरंही नाटकात सापडत नाहीत.
घरातल्या वातावरणापायी एकांगी, एकारलेला झालेला, ज्वालामुखीगत सदा खदखदणारा, परंतु मित्रांना मात्र कुठल्याही थराला जाऊन मदत करणारा, पुढे वडिलांचं सर्वस्वी अपरिचित रूप समोर आल्यावर आपलं असमंजसपण खिलाडूपणे मान्य करणारा अजित- अद्वैत दादरकर यांनी कमालीच्या ऊर्जेनं साकारला आहे. सरळमार्गी पूर्वाची आपल्या स्वार्थासाठी खोटं वागता-बोलतानाची होणारी घालमेल, अजितच्या घरात भावनिक जिव्हाळा अनुभवल्यावरचं तिचं निर्भरपण भक्ती देसाई यांनी छान दाखवलं आहे. निखिल राऊत यांचा सॅन्डीही चोख.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2013 12:30 pm

Web Title: family drama makeup of melodramatic relationship
टॅग Entertainment
Next Stories
1 एका प्रेमाचा सांस्कृतिक गुंता!
2 सरधोपट चकवा
3 प्रतिबिंब
Just Now!
X