वर्ष उलटून गेलं तरी करोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. देशातील विविध शहरातून करोनाचं संक्रमण वाढत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. करोनाच्या पेशंटचे वाढते आकडे नागरिकांची चिंता वाढवू लागले आहेत.

यातच आता बॉलिवूडची चिंता वाढतं असल्याचं चित्र दिसू लागलंय. रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या नंतर आता अभिनेता मनोज बाजपेयीला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार मनोज बाजपेयीच्या टीमने त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितल्यानं या वृत्तावर शिक्कामोर्तब झालंय. मनोजी बाजपेयीने स्वत:ला होम कॉरन्टाईन केलंय.

मनोज बाजपेयी सध्या त्याच्या आगामी ‘Despatch’ या सिनेमाचं शूटिंग करत होता. हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. कानू बहल या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून त्यांना देखील करोनाची लागण झाली आहे. कानू यांना करोनाची लागण झाल्यानंतरच मनोजला करोनाची लागण झाल्याचं लक्षात आलं. दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता दोघांनाही करोनाची लागण झाल्यानं काही दिवसांसाठी या सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलंय. तर मनोज बाजपेयीची प्रकृत्ती उत्तम असून त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याचं त्याच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, मनोज वाजपेयीच्या ‘फॅमिली मॅन-2’ या वेब सीरिजच्या प्रदर्शानाची सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. फेब्रुवारीमध्ये ही वेब सीरिज रिलीज होणार होती. मात्र तांडवच्या वादामुळे ‘फॅमिली मॅन-2’ चं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. तर लवकरच झी-5 या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या साइलेंस- कॅन यू हियर इट? या सिनेमातून मनोज एका पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. 26 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे.