सुहास जोशी

अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा सीआयए आणि त्यांनी जगभर केलेल्या बऱ्या वाईट कारनाम्यांवर आधारित चित्रपट, मालिका हा प्रकार आता भारतीय डिजिटल प्रेक्षकांना नवीन नाही. पण याच धर्तीवर भारतीय गुप्तवार्ता विभागाच्या कामगिरीवर बेतलेले कथानक प्रदिर्घपणे मांडलेले पाहायला मिळत नाही. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारचे चित्रपट चर्चेत राहिले, पण ते बहुतांशपणे केवळ नाटय़मयतेचाच आधार घेणारे होते. वेबसीरिजच्या माध्यमातून व्यापक पद्धतीने घटनाक्रम उलगडण्याचे प्रयत्न झाले नव्हते. त्या पाश्र्वभूमीवर ‘फॅमिली मॅन’ ही अ‍ॅमेझॉन प्राईमवरील वेबसीरिज तुलनेने या विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न करते. मात्र मालिकेत मांडलेला आशय आणि शीर्षक या दोहोंमधील विसंगती प्रकर्षांने जाणवत राहते.

भारतीय गुप्त वार्ता विभागात काम करणाऱ्या श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी) याच्याभोवती ही सारी कथा फिरते. श्रीकांतने त्याच्या कामाचे खरे स्वरुप कुटुंबियांना सांगितलेले नसते. त्यातच त्याच्या पगारातून चौघांच्या कुटुंबासाठी ठोस असं काही त्याला करता येत नसते आणि कामाच्या विचित्र स्वरुपामुळे घरच्यांना पुरेसा वेळ देखील देता येत नसतो. अशातच देशावर अतिरेकी हल्ला करण्याची योजना शिजत असल्याचा सुगावा लागतो. एकापाठोपाठ एक अशा अनेक घटना घडत जातात, संशयित पकडले जातात, काहींचा खून होतो तर  काहींना पकडताना गल्लत होते. त्यामुळे श्रीकांतला बदलीला सामोरे जावे लागते. पण बदलीचादेखील फायदाचा होतो. पण दुसरीकडे घरातील वातावरण आणखीनच बिघडते.

एकाचवेळी अनेक ठिकाणी होणाऱ्या हालचाली, त्यामुळे केवळ देशांतर्गतच नाही तर देशाबाहेरील कथानक यामध्ये येते. त्यातून एकसंध असे व्यापक चित्र हळूहळू रेखाटले जाते. अर्थातच ते होताना काही बाबी पुरेशा उलगडतात, काही अगदीच वरवर. मात्र सीरिजकर्त्यांनी हा सगळा पट व्यवस्थित उभा करण्याचे काम प्रभावीपणे केले आहे. त्या त्या परिसरातील वातावरण उभे करताना त्यात एक नैसर्गिकपणा जपला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सीरिजच्या निर्मितीमधील कौशल्य जाणवत राहते, वैगुण्य अत्यंत मर्यादित आहे. संवादातील अकृत्रिमपणा, वेगवेगळ्या टप्प्यांवरील पात्रांमधील बदल, तपासाचा रोख, त्यातील नाटय़मयता याची एक चांगली सांगड येथे घालण्यात आली आहे.

इतक्या सर्व चांगल्या बाबी असल्या तरी सर्वात मोठा दोष आहे तो संकल्पनेतील गोंधळाचा. फॅमिली मॅन या शीषर्कातून होणारा बोध हा कथेच्या आशयात अगदीच तोकडेपणाने मांडला आहे. श्रीकांत तिवारी हा कामात झोकून देणारा माणूस, पण त्यापायी त्याच्या कुटुंबाची मानसिक कुतरओढ होते हा मुद्दा पुरेसा प्रभावीपणे येत नाही. संपूर्ण दहा भागांमध्ये कौटुंबिक प्रसंग हे ज्या पद्धतीने येतात त्यांचे प्रमाण १० ते १५ टक्के इतकेच आहे. त्यातील काही प्रसंग टोकाला जाणारे आहेत हे नक्कीच मान्य करावे लागेल, आणि ते प्रभावीदेखील झाले आहेत. पण मूळ कथा ही अतिरेकी पकडणे आणि त्यांचा हल्ला परतवून लावणे याभोवतीच फिरते. किंबहुना त्याच कथेचा ओघ इतका वेगवान आणि प्रभावी आहे की मालिका पाहताना उत्सुकता लागते ती त्याच कथेची. श्रीकांतच्या कुटुंबाचा भाग हा अधूनमधून येतो म्हणून पाहिला जातो, त्यापलिकडे त्यातून हाताला फारसे काही ठोस लागत नाही.

सीरिजमधील सर्वोत्तम भाग म्हणजे मनोज वाजपेयी या कलाकाराचा वावर. मनोजची आजवरचे पडद्यावरची प्रतिमा ही अत्यंत वेगळी आहे, त्या मानाने त्याने साकारलेली ही भूमिका पूर्णत: वेगळी आहे. आणि या भूमिकेसाठी त्याने त्याच्या देहबोलीत जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसते. किंबहुना मनोजचा हा वेबसीरिजमधील पहिलाचा प्रयोग वेगळ्या पद्धतीने यशस्वी झाला आहे असे म्हणता येईल. मनोजची भूमिका ही नायकाप्रमाणेच मध्यवर्ती असल्यासारखी असली तरी आणि अनेक ठिकाणी नायकाला पूरक अशी परिस्थिती निर्माण करण्याचा नेहमीचा टिपिकल भाग येतो. अर्थात तो एकूण कथेच्या पटलावर फारसा टोचत नाही.

ही कथा काल्पनिक आहे, त्यामुळे काहीवेळा यातील काही करामतींवर वास्तवतेच्या कसोटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा मोह अनेकांना होतो, पण त्यात काही हशील नाही. उत्कंठा टिकवून ठेवणारी अशी ही सीरिज म्हणून पाहायला काहीच हरकत नाही. कथेचा शेवट अगदीच अधांतरी आणि लटकवून ठेवलेला आहे. अर्थातच दुसऱ्या सीझनची बीज यामध्ये आहे.

‘फॅमिली मॅन’

ऑनलाइन अ‍ॅप – अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ

सीझन – पहिला