06 July 2020

News Flash

गिरणगावची पोरं सुपरस्टार!

मुंबईचे ‘गिरणगाव’ अशी ओळख असलेल्या लालबाग, परळ, नायगाव या परिसराचा आता कायापालट झाला आहे.

| December 4, 2014 01:56 am

मुंबईचे ‘गिरणगाव’ अशी ओळख असलेल्या लालबाग, परळ, नायगाव या परिसराचा आता कायापालट झाला आहे. गगनचुंबी इमारती, मोठमोठी हॉटेल्स आणि कॉर्पोरेट कार्यालयांमुळे हा परिसर गजबजून गेला आहे. याच गिरणगावाने मेळे, भारूड, दशावतार, नाटक, चित्रपट, भजन, कीर्तन या कलांच्या माध्यमातून मराठी संस्कृती जोपासली, जतन केली, अनेक कलाकारही घडविले. गिरणगावच्या श्रमिक कलावंतांना मानाचा मुजरा करण्यासाठी १९ ते २५ डिसेंबर या कालावधीत ‘गिरणगावची पोरं हुशार’ या विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भरत जाधव एन्टरटेन्मेंट आणि मुक्ता कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्या उपक्रमातील कार्यक्रम लालबाग येथील भारतमाता चित्रपटगृह, परळ येथील दामोदर नाटय़गृह आणि डिलाईल रोड येथील श्रमिक जिमखाना येथे होणार आहेत. भारतमाता येथे कलाकारारांच्या उपस्थितीत चित्रपट महोत्सव होणार असून ‘चित्रपटातील चाळ संस्कृती- वास्तव-अवास्तव’, ‘गिरणगावाने आम्हाला काय दिले’ या विषयावर परिसंवाद, प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांची सुलेखन कार्यशाळा, प्रश्नमंजूषा, यातील भाग्यवान विजेत्यांना कलाकारांसोबत पंचतारांकित हॉटेलमध्ये मेजवानी असे विविध कार्यक्रम या महोत्सवात होणार आहेत.
अभिनेता भरत जाधव आयोजक, संतोष परब यांची संकल्पना असलेल्या या उपक्रमाचे सल्लागार दिग्दर्शक केदार शिंदे हे आहेत. महोत्सवात मा. भगवान, व्ही. शांताराम, शाहीर अमर शेख, दादा कोंडके, शाहीर साबळे, जयंतराव साळगावकर, पंढरीनाथ सावंत, राजा मयेकर, नामदेव ढसाळ, सुबल सरकार, मधुकर नेराळे, एकनाथ सोलकर, शिवाजी साटम, सुहास भालेकर आणि विविध क्षेत्रातील अन्य गिरणगावकरांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफीत दाखविली जाणार आहे. मूळचे गिरणगावात लहानाचे मोठे झालेले आणि आता विविध क्षेत्रांत नावलौकिक कमाविलेले अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2014 1:56 am

Web Title: famous actors invention of entertainment
Next Stories
1 सलमान, आमीर आणि शाहरूख खान अवतरले एकाच मंचावर!
2 अनुराग कश्यपपेक्षा माझ्या वडिलांचे चित्रपट अधिक उजवे- पूजा भट्ट
3 मराठी चित्रपटांना इंग्रजीची फोडणी!
Just Now!
X