बॉलिवुडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून अभिनेत्री कंगना रणौतने निर्माता – दिग्दर्शक करण जोहरला चांगलेच सुनावले होते. घराणेशाहीचा झेंडा मिरवणारा करण हा ‘मुव्ही माफिया’च आहे, अशी सणसणीत टीका तिने केली होती. जवळपास वर्षभरानंतर आता बी टाऊनमधील या सर्वात गाजलेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे असे म्हणायला हरकत नाही. करण जोहरच्या ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’ या कार्यक्रमात कंगना हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येत आहे.

या कार्यक्रमात करण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी परीक्षक आहेत. तर अतिथी परीक्षक म्हणून कंगना हजेरी लावणार असून गुरुवारी सिटी स्टुडियो येथे याचे शूटिंग होणार आहे. यासंदर्भात ‘मुंबई मिरर’शी साधलेल्या संवादात कंगना म्हणाली की, ‘हा एक व्यावसायिक करार असून त्यासाठी मला मानधन मिळत आहे. माझ्या उपस्थितीमुळे करणची काहीच हरकत नसल्याने मला आनंद आहे.’ त्यामुळे करणच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमातून सुरु झालेल्या या बहुचर्चित वादाचा अखेर अंत झाला आहे असे म्हणायला हरकत नाही.

वाचा : …म्हणून करण मागणार आलियाची माफी

करणच्या या कार्यक्रमातून उदयोन्मुख कलाकारांसाठी संधी उपलब्ध होणार आहे. ‘ना खानदान..ना सिफारिश, बॉलिवुड को है सिर्फ टॉलेंट का इंतजार’ या कार्यक्रमाच्या टॅगलाइनकडे लक्ष वेधत ‘क्वीन’ कंगनाने पुढे म्हटले की, ‘स्वकर्तृत्वावर बॉलिवुडमध्ये मी माझे स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच अतिथी परीक्षकासाठी वाहिनीने माझी निवड केली आहे.’ तर कंगनाच्या हजेरीने माझी काहीच हरकत नसल्याने करणने स्पष्ट केले होते. आमचं हदय मोठं असून कार्यक्रमाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे करणने याआधी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. त्यावर कंगनानेही उपरोधिक टोला लगावला. ‘करण माझं स्वागत करतोय याचा मला आनंदच आहे, पण माझ्या मते मेहनतीच्या जोरावर मी बॉलिवूडमध्ये ओळख प्रस्थापित केली आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये मी हजेरी लावण्यात वावगं काय आहे? त्यासाठी कोणालाही माझ्यासाठी दरवाजे खुले ठेवण्याची गरज नाही. संधीचे सर्व दरवाजे खुले करण्यास मी समर्थ आहे, असा खोचक टोला क्वीन कंगनाने लगावला. करण आणि कंगनामधील ही शाब्दिक चकमक पाहता प्रेक्षकांनाही कार्यक्रमाच्या या भागाची उत्सुकता आहे.