दिलीप ठाकूर
राजकारणातील ‘मिठी’ प्रकरण सध्या खूप गाजतेय, चित्रपटाच्या जगात तर गालाला गाल लावतच एकमेकांना भेटणे (त्यालाच ‘hug’ करणे म्हणतात), सौम्य अथवा घट्ट मिठी मारून भेटणे हे तर केव्हाच रुजलयं, आता ते मराठी चित्रपटसृष्टीतही मुरतयं, अर्थात ते सगळेच एकमेकांशी नातेसंबंध कसे आहेत यावर अवलंबून असते. या चित्रपटसृष्टीतीलही काही गळाभेटी, मिठ्या वा आलिंगने भारीच गाजलीत. त्यावर एक फोकस टाकायला सध्याचे वातावरण एकदम झकास आहे.

फार पूर्वीची ही गोष्ट आहे, ‘अंजाना सफर'( १९७२) या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. विश्वजीत तेव्हा वहिदा रेहमान, माला सिन्हा, बबिता अशा आघाडीच्या अभिनेत्रींचा ‘नशिबवान नायक’ ठरला होता. असाच तो या चित्रपटाच्या सेटवर असतानाच या चित्रपटाची नायिका रेखा आली आणि तिने कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक विश्वजीतला आलिंगन देऊन सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. असे काही घडेल अशी विश्वजीतला जराही कल्पना नव्हती (म्हणे). सुरुवातीच्या काळातील रेखा अशाच काही कारणास्तव गॉसिप मॅगझिनमधून चर्चेत राहिली अथवा सनसनाटी निर्माण करे. त्या काळातील काही फिल्मी मासिके पराचा कावळा करीत. घडलेल्या झालेच तर न घडलेल्या फिल्मी गोष्टीत भरभरून तिखट मीठ मसाला घालून ते मिश्रण अधिकच चविष्ट करीत. या प्रकरणातही त्यांनी रेखाने विश्वजीतला हलकेसे चुंबन दिले असेच म्हटले. त्या काळातील हे ‘सर्वाधिक वाचक’ लाभलेले गॉसिप ठरले. इंग्रजीतून हे सगळेच प्रकरण अनेक भाषांमध्ये पसरले. या काळातच चित्रपट कलावंतांच्या लफडी, भानगडी, धाडसी फोटो सेशन याला जरा जास्तच महत्त्व आले होते.

अशीच एक भेट, खरे तर विदेशी प्रथेनुसारच पद्मिनी कोल्हापुरेने इंग्लंडचा राजपुत्र प्रिन्स चार्ल्स याचे ‘आहिस्ता आहिस्ता’ (१९८१)च्या सेटवर घेतलेले चुंबन प्रचंड गाजले. तेव्हा नेमके काय घडले तर, भारत भेटीवर येणार्‍या विदेशी पाहुण्यांना आपल्या चित्रपटसृष्टीची ओळख म्हणून मुंबईतील राजकमल कलामंदिर येथे भेट दिली जात असे. चित्रपती व्ही. शांताराम यांचा हा चित्रपट निर्मितीच्या सर्व सुविधा असणारा स्टुडिओ असल्याने विदेशी पाहुणे खूश होत. प्रिन्स चार्ल्स या स्टुडिओत आले तेव्हा इस्माईल श्रॉफ दिग्दर्शित ‘आहिस्ता आहिस्ता’चे शूटिंग सुरू होते आणि नंदा, पद्मिनी कोल्हापुरे इत्यादी कलाकार सहभागी झाले होते. अशातच विदेशात ज्याप्रमाणे हलकासा किस करून पाहुण्यांना वेलकम केले जाते अगदी तसेच पद्मिनी कोल्हापुरेने केले. पण ही भावना आणि भूमिका विचारात न घेताच या गोष्टीचा वाद निर्माण झाला. ‘ही आपली संस्कृती नाही’, ‘ही काय अमेरिका आहे काय?’ असे केवढे तरी उलटसुलट प्रश्न उपस्थित केले गेले. हा गदारोळ सुरू असतानाच प्रिन्स चार्ल्स इंग्लंडला गेलाही. या क्षणाचे छायाचित्र मोठ्याच प्रमाणात ‘व्हायरल’ झाले आणि बराच काळ ही चर्चा रंगली.

राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांचीही गळाभेट गाजलीय हे आजच्या पिढीला माहिती नसावे. पण असाही एक क्षण आला आणि मिडियाला भरपूर खाद्य मिळाले. ते कसे? तर राजेश खन्नापासून संसारातून वेगळे होत ‘सागर’ (१९८५) पुन्हा अभिनय क्षेत्रात आली. आता हे दोघे संसारात पुन्हा कधी बरे एकत्र येतील हे कोणीच सांगू शकत नव्हते. अशातच राजेश खन्नाने ‘जय शिव शंकर’ (१९८९) या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये पाऊल टाकले आणि या चित्रपटाची त्याची नायिका होती, चक्क डिंपल कपाडिया! या चित्रपटाच्या गोरेगावमधील चित्रनगरीमधील देवळात मुहूर्त असल्याचे आमंत्रण हाती आल्यापासून माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. राजेश खन्ना व डिंपल कपाडिया बर्‍याच काळानंतर एकत्र येणार,दिसणार ही मोठीच बातमी होती. विशेष म्हणजे यावेळी डिंपल अगोदर सेटवर आली आणि राजेश खन्ना नंतर आला (त्या काळात अशाही गोष्टींचा बाऊ केला जाई), पण दोघेही एकमेकांना गळाभेट देत-घेत भेटल्याची भरभरून चर्चा रंगली. अरे ते पती-पत्नी आहेत हे का विसरता? पण त्या काळात ते वेगळे राहत होते ना? म्हणून ही गळाभेट गाजली.

मिलिंद सोमण आणि मधु सप्रे यांचीही मिठी प्रचंड गाजली. पण ती बुटाच्या जाहिरातीमधील होती. ते दोघेही जणू नग्नावस्थेत आहेत असे वाटत होते म्हणूनच यावर प्रचंड टीका झाली. या दोघांनीही त्वचेच्या रंगाचे पातळ कपडे परिधान केले होते हे लक्षात न घेताच हा गदारोळ उठला होता. एकूण काय तर मिठी, गळाभेट गाजण्याची चित्रपटसृष्टीत मोठीच परंपरा आहे.