कुमुदिनी लाखिया यांची कृतज्ञ भावना

कथक या नृत्यप्रकाराला रोहिणीताई भाटे यांनी केवळ स्वतंत्र स्थान प्राप्त करून देण्यासाठी योगदान दिले असे नाही, तर कथकसाठी त्यांनी आयुष्य वेचले, अशी कृतज्ञ भावना ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू कुमुदिनी लाखिया यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू पंडिता रोहिणी भाटे यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी ‘नादरूप’ संस्थेतर्फे आयोजित ‘संस्मरण’ या तीनदिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन कुमुदिनी लाखिया यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी आणि भाटे यांच्या गुरुभगिनी पद्मा शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू शमा भाटे यांनी सर्वाचा सत्कार केला.

कथकसाठी आपला वेळ देणाऱ्या रोहिणीताईंनी नृत्य कलाकारांच्या पिढय़ा घडविल्या. त्यांच्या अथक प्रयत्नाने पुणे हे कथकचे माहेरघर झाले आहे, असे सांगून कुमुदिनी लाखिया म्हणाल्या, रोहिणीताईंचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला त्यांना नृत्य शिकविण्यासाठी विद्यार्थिनी मिळविताना खटाटोप करावा लागला होता.

समाज कलाकार घडवत नाहीत, तर कलाकार समाज घडवतो. पुण्यामध्ये नृत्यसंस्कृती रुजण्यामध्ये रोहिणीताईंच्या समर्पणवृत्तीने केलेल्या विद्यादानाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

कथक हे केवळ नृत्यतंत्र नाही तर ते तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे नृत्याचा आत्मा आणि नृत्याचे वैभव जपण्याचे भान ठेवा, असा संदेशही कुमुदिनी लाखिया यांनी नवोदित कलाकारांना दिला.

नृत्यनिष्ठा, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता असा त्रिवेणी संगम रोहिणी भाटे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होता, असे सांगून वाजपेयी म्हणाले, परंपरेचा धागा जपतानाच त्या वेगळे प्रयोग करीत असत. कथक हे नृत्याचे शास्त्र असले तरी ते लिखित स्वरूपात नाही. मात्र, कोणताही दावा न करता वैदिक काव्याचे सौंदर्य रोहिणीताईंनी आपल्या नृत्य सादरीकरणातून प्रभावीपणे उलगडले. कथकला संस्कृत भाषासौंदर्याची जोड देण्याचे श्रेय हे नक्कीच रोहिणीताईंना द्यावे लागेल.

मुंबई येथील भातखंडे संगीत विद्यालयात गुरू पं. मोहनराव कल्याणपूर यांच्याकडे नृत्य शिकत असतानाचे रोहिणीताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू पद्मा शर्मा यांनी आपल्या मनोगतातून उलगडले.