बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिम सुरू झाल्यापासून एकापाठोपाठ एक नामांकित व्यक्तींची नावं समोर येत आहेत. या यादीत आता बॉलिवूडच्या संस्कारी अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे एका अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. 1990 मधील गाजलेली मालिका ‘तारा’च्या निर्मात्या विनता नंदा यांनी आपल्या पोस्टमध्ये , 20 वर्षांपूर्वी  बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेतील ‘सर्वात संस्कारी अभिनेत्याने’ माझ्यावर बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. आपल्या संपूर्ण पोस्टमध्ये विनता नंदा यांनी त्या अभिनेत्याचं नाव लिहिलेलं नाही. मात्र, आपल्या पोस्टच्या अखेरीस त्यांनी ‘संस्कारी अभिनेता’ असा उल्लेख केला आहे, त्यामुळे त्यांचा रोख अलोक नाथ यांच्याकडे असल्याचं स्पष्ट होत आहे.

विनता यांनी लिहिल्यानुसार, जवळपास 20 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. या अभिनेत्याची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड होती. एक दिवस ती शहराबाहेर होती त्यावेळी त्याने मला एका पार्टीसाठी घरी आमंत्रित केलं. आमच्यासाठी ही सामान्य बाब होती. आमच्या थिएटर ग्रुपचे सर्व मित्र पार्टीत भेटत असतो. पार्टीमध्ये माझ्या दारुत काहीतरी मिसळण्यात आलं होतं. रात्री जवळपास दोन वाजेच्या सुमारास आम्ही त्याच्या घरातून बाहेर पडलो, त्यावेळी मला विचित्र वाटत होतं. मी माझ्या घराकडे निघाली. पार्टीतून निघताना मला कोणीही घरी सोडायला येण्याबाबत विचारलं नाही, याचं थोडं आश्चर्य वाटलं होतं. रस्त्यावर कोणीच नव्हतं आणि माझं घर दूर होतं. तेवढ्यात या अभिनेत्याची गाडी येऊन माझ्या बाजूला थांबली आणि त्याने मला घरी सोडण्याची ऑफर दिली. मी त्याच्या गाडीत बसले. गाडीत बसल्यावर  मला बळजबरीने आणखी दारु मला पाजण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी मी उठले त्यावेळी मला खूप त्रास होत होता. माझ्यावर केवळ बलात्कार झाला नव्हता तर माझं शोषण झालं होतं, मला क्रूर वागणूक दिली जात होती. मी माझ्या बेडवरुनही उठू शकत नव्हते. त्यानंतर मी याबाबत माझ्या मित्रांना सांगितलं, पण त्यांनीही मला झालेली घटना विसरु जा आणि पुढील जीवनाचा विचार कर असं सांगितलं. यानंतर माझी कंपनी बंद झाली पण मला एका चॅनलमध्ये संधी मिळाली. मात्र, या अभिनेत्याने त्या चॅनलमध्येही असं वातावरण तयार केलं की, मला दिग्दर्शक बनायचं नाहीये असं मला मालिकेच्या निर्मात्याला सांगावं लागलं. कारण मला त्या अभिनेत्याच्या आजुबाजूलाही राहायचं नव्हतं. पण माझ्यासाठी हे काम महत्त्वाचं होतं. कारण नोकरी सुटल्यानंतर मी खूप दडपणाखाली होते. मी जेव्हा त्या मालिकेसाठी कथानक लिहायला घेतलं त्यावेळी हा अभिनेता माझ्या घरी यायचा, पण त्यावेळी नोकरी आणि पैसे या दोन्ही गोष्टींची मला गरज होती. मोठी हिंमत एकवटून मी वेगवेगळ्या चॅनलसाठी लिहिण्याचं काम सुरू केलं. पण आता मला चित्रीकरणाची आणि त्या सेटची भीती वाटायला लागली होती. अखेर मी पराभव मान्य केला. मी प्रतिकार न केल्यामुळे अनेक बाबी आणखी वाईट झाल्या. त्यानंतर मला दारु आणि अंमलीपदार्थांचं व्यसन जडलं, अखेर 2009 नंतर माझ्या मित्रपरीवारामुळे माझं जीवन पुन्हा रुळावर यायला सुरूवात झाली. माझ्या आयुष्यातील 10 वर्ष धक्कादायक होते. या क्षणाची मी 19 वर्षांपासून वाट पाहत होते. तुम्ही देखील स्वतःला रोखू नका, ही वेळ बदल घडवण्याची आहे. दुःख एकच आहे की, हा व्यक्ती एक चांगला अभिनेता आणि बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेतील सर्वात संस्कारी व्यक्ती आहे. पाहा नंदा यांची फेसबुक पोस्ट –