अभिनेता शाहरूख खानचा बहुचर्चित ‘फॅन’ चित्रपट उद्या प्रदर्शित होतो आहे. शाहरूखला गेल्या २५ वर्षांपासून ओळखणारे चित्रपट निर्माते विवेक वासवानी यांनी हा चित्रपट शाहरूखच्या कारकीर्दीतील सर्वाधिक हिट ठरू शकतो, अशी शक्यता वर्तविली आहे. शाहरूखच्या ‘राजू बन गया जंटलमॅन’, ‘जोश’ या चित्रपटांची निर्मिती वासवानी यांनीच केली होती.
शाहरूख खानच्या सुरुवातीच्या काळातील चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाचे वेगळेपण ‘फॅन’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, आम्हाला ‘डर’, ‘राजू बन गया जंटलमॅन’मधील शाहरूख पुन्हा बघायला नक्कीच आवडेल, असे वासवानी यांनी सांगितले.
मनीष शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फॅन’मध्ये शाहरूखचा डबलरोल असून, सुपरस्टार आणि त्याच्यासारखा दिसणार त्याचा एक फॅन अशा आशयाचे या चित्रपटाचे कथानक आहे. शुक्रवारपासून हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे.
चित्रपट निर्मितीचा व्यवसाय आता पूर्णपणे बदलला असून, सध्यातरी आपण कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करू शकत नसल्याचे वासवानी म्हणाले. सध्या आपण चित्रपटकर्त्यांसाठी सल्लागार म्हणून काम करण्यातच आनंदी आहोत, असेही त्यांनी सांगितले.