23 April 2019

News Flash

वरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का?

अखेर वरुणने त्या चाहतीची भेट घेतली आणि तिच्यामुळे नेमकी काय परिस्थिती उदभवली होती याविषयी सर्व माहिती दिली.

वरुण धवन

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची एकदा तरी भेट घेण्याची इच्छा प्रत्येक चाहत्याच्या मनात घर करुन असते. अर्थात काहीजणांची ही इच्छा या न त्या कारणाने पूर्ण होतेसुद्धा. पण, काही चाहते ही इच्छा पूर्ण करण्यासाठी असं काहीतरी कृत्य करतात ज्यामुळे अनेकदा त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींनासुद्धा अडचणींचा सामना करावा लागतो. अभिनेता वरुण धवनला सध्या अशाच परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. शनिवारी संध्याकाळी पोलिसांच्या हाती एक १४ वर्षांची मुलगी लागली. ती मुलगी सुरतहून आपल्या राहत्या घरातून पळून आली होती. तिचा मुंबईत येण्याचा एकच उद्देश होता. तो म्हणजे आपल्या आवडत्या अभिनेत्याची म्हणजेच वरुण धवनची भेट घेणं.

कापड व्यावसायिकाची ही मुलगी मुंबईत आल्यानंतर थेट वरुणच्या खार येथील घराच्या दिशेने गेली आणि रात्रभर त्याची भेट घेण्यासाठी घराखाली वाट पाहात राहिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रभर ती वरुणच्याच घराखाली ठाण मांडून बसलेली. वरुण घरी नसल्याचं त्याच्या सुरक्षारक्षकांनी तिला सांगूनही फक्त त्याची भेट घेण्याचाच ती हट्ट करत होती. सुरक्षा रक्षक बाहेर नेमकं काय घडत आहे, हे वरुणला सांगत नसल्याचं कळताच तिने तिथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

वाचा : बलात्कार करणाऱ्यांना जगण्याचा हक्क नाही; रेणुका शहाणे यांची जळजळीत पोस्ट

पोलीस तपासातून मिळालेल्या माहितीनुसार वरुणची ही फॅन मुळची सुरतची असून, तिचे वडील कापड व्यापारी आहेत. शुक्रवारपासून ती आपल्या घरातून पळून गेली होती. त्यानंतर तिच्या पालकांनी सूरतच्याच अमरोली पोलीस स्थानकात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. अखेर वरुणने त्या चाहतीची भेट घेतली आणि तिच्यामुळे नेमकी काय (अडचणीची)  परिस्थिती उदभवली होती याविषयी सर्व माहिती दिली. वरुणच्या जबरा फॅनची ही करामत आणि चाहत्यांप्रती वरुणच्या मनाच असणारी भावना या दोन्ही गोष्टी या प्रसंगातून सर्वांना पाहायला मिळाल्या.

First Published on April 16, 2018 1:53 pm

Web Title: fan surat girl was camping outside bollywood actor varun dhawan home for a chance to meet him