DABANGG 3 salman khan. जवळपास ३० वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळवलेल्या सलमान खानच्या लोकप्रियतेविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. चित्रपट कोणताही असो, त्यात भाईजान सलमानची उपस्थिती असली म्हणजे त्या चित्रपटावर सुपरहिट असा शिक्का लागतोच. ‘रेस ३’च्या बाबतीतही असंच काहीसं पाहायला मिळालं. सलमानवरील प्रेमाखातर त्याच्या चाहत्यांनी ‘रेस ३’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली खरी. पण, या चित्रपटाने चाहत्यांचा हिरमोड केला.

कथाकनकापासून चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयापर्यंत बऱ्याच गोष्टींमुळे ‘रेस ३’ अक्षरश: प्रेक्षकांना डोकेदुखी वाटू लागला. या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांची तुलना करता तिसऱ्या भागाला चाहत्यांची तितकीशी पसंती मिळाली नाही. सलमानच्या याच ‘रेस ३’ ला अनुसरुन सोशल मीडियावर आता एका नव्या विषयाला वाचा फुटली आहे. तो विषयी म्हणजे त्याचा आगामी चित्रपट ‘दबंग ३’.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

‘रेस ३’चं अपयश पाहता, ‘दबंग ३ नको रे बाबा’, असं म्हणत ट्विटरवर अनेक चाहत्यांनी ट्विट करण्यास सुरुवात केली आहे. WE DONT WANT DABANGG3 असं म्हणत प्रत्येकानेच हा चित्रपट का साकारला जाऊ नये याची काही पटण्याजोगी कारणं दिली आहेत. त्यासोबतच डेझी शाह, साकिब सलिम यांसारख्या कलाकारांसोबत कधी काम करु नकोस, असंही चाहते सलमानला उद्देशून म्हणाले आहेत. आमचं सलमानवर प्रेम आहे, म्हणून ‘दबंग’ या चित्रपटाचा तिसरा भाग साकारण्याचा अट्टहास नको, असंच मत चाहत्यांनी मांडल्याचं पाहायला मिळत आहे. तेव्हा आता चाहत्यांचा या अट्टहास पाहून सलमान काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.