18 April 2019

News Flash

विराट-अनुष्काच्या ‘परफॉर्मन्स’वर चाहत्यांच्या नजरा

बॉक्सऑफिसवर अनुष्काची तर धरमशालात कोहलीची 'कसोटी'

विराट आणि अनुष्का (संग्रहित छायाचित्र)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाच्या चर्चा तशा नव्या नाहीत. यापूर्वी विराटची खेळी पाहण्यासाठी अनुष्का मैदानात दिसली आहे. तर विराटने तिच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये सहभागी होऊन कथित प्रेयसीच्या अभिनयाला दाद दिल्याचे पाहायला मिळाले आहे. ही जोडी जेव्हा जेव्हा एकत्र दिसते तेव्हा तेव्हा अनेक चर्चांना उधाण येते. या जोडीला एकत्र पाहणे दोघांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच. काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का यांच्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर या दोघांनी पुन्हा एकत्र यावे, अशी त्यांच्या चाहत्यांची तेव्हा इच्छा होती. त्यामुळेच या दोघांच्या चाहत्यांसाठी या आठवड्याचा शेवट खासच.

आज अनुष्काचा बहुचर्चित ‘फिल्लौरी’ चित्रपट प्रदर्शित होत असून, याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. तर विराट ब्रिगेड शनिवारी ऑस्ट्रेलियासोबत चार हात करण्याच्या जोरदार तयारीत आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना जिंकून पाहुण्यांचा समाचार घेण्यासाठी मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियासोबतच्या कसोटी मालिकेत सध्या बॅकफूटवर असणाऱ्या विराट कोहलीकडून दमदार खेळीची अपेक्षा आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीतून सावरुन त्याने दमदार सुरुवात करावी, यासाठी त्याचा प्रत्येक चाहता नक्कीच प्रार्थना करत असेल.

एकूणच विराट-अनुष्काच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाच्या मेजवानीचा डबल धमाका या आठवड्यात असेल. बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन्हींचे वेड पाहता ‘फिल्लौरी’ आणि भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना यांना मिळणारा प्रतिसाद पाहणे निश्चितच रंजक ठरेल. अनुष्काच्या ‘फिल्ल्लौरी’बद्दल बोलायचे तर प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाशी विराटचे नाव जोडल्याचे पाहायला मिळाले होते. अनुष्काच्या या चित्रपटाची निर्मिती विराटने केल्याची जोरदार चर्चा रंगली होती. या चर्चेला तिने तिच्या अंदाजात उत्तर दिले होते. मी माझ्या चित्रपटाची निर्मिती करण्यास सक्षम असल्याचे सांगत तिने विराटचा याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

दरम्यान, अनुष्काने चित्रपटाची प्रसिद्धी अनोख्या अंदाजात केल्याचे पाहायला मिळतेय. अमेरिकेतील ऑस्कर पुरस्कारासह आमिर खानच्या ‘लगान’मधील सामना विजयावेळी शशी (चित्रपटात अनुष्का साकारत असलेली भूमिका) तेथे असल्याचे पुरावे तिने ट्विवटरच्या माध्यमातून दिले आहेत.  त्यामुळे तिचा हा फंडा कितपत यशस्वी ठरणार? या प्रश्नाचे उत्तर लवकरच आपल्याला मिळेल. आता ‘शशी’ सिनेमाप्रमाणे मैदानातही उतरून भारताला मालिका विजयासाठी मदत करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

First Published on March 24, 2017 9:46 am

Web Title: fans eyes on anushka sharmas phillauri and virat kohli test match