काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खानला अखेर जामीन मंजूर झाला आहे. सलमानला जामीन मंजूर होताच मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटबाहेर जमलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. चाहत्यांनी सलमानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली तर काहीजण ढोल- ताशांच्या पथकासह तिथे उपस्थित होते.

सलमानला जामीन मंजूर झाल्याचे वृत्त कळताच विविध ठिकाणांहून आलेल्या या चाहत्यांनी ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटबाहेर ढोल-ताशांचा गजर केला. त्याच्या जामीनावर आज सुनावणी असल्याने अनेकजण सकाळपासूनच अपार्टमेंटबाहेर जमले होते.

वाचा : काळवीट शिकारीसाठी ‘त्या’ दोघींनी सलमानला प्रवृत्त केलं; प्रत्यक्षदर्शीचा दावा

काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या सलमानला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर करताना कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत. सलमानला ७ मे रोजी कोर्टात यावं लागेल, तसेच देश सोडण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल, या दोन अटी कोर्टाने सलमानला घातल्या आहेत. कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करुन सलमान संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत तुरुंगाबाहेर येईल अशी शक्यता आहे. रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान तो वांद्रे येथील आपल्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचू शकतो.